देशातील प्राचीन १६ जनपदांमधील वत्स जनपद म्हणजेच आजचे वाशिम शहर. या शहरास प्राचीन काळी वत्सगुल्म असे म्हणत. ‘वत्सगुल्म माहात्म्य’ या ग्रंथामध्ये वाशिममधील १०८ पवित्र तीर्थांची माहिती दिली आहे. एकूण ३९ अध्याय असलेल्या या ग्रंथाच्या पहिल्या आठ अध्यायांत केवळ दोनच तीर्थांची माहिती आढळते. त्यातील एक करुणेश्वर महादेव तीर्थ व दुसरे पद्मतीर्थ. जुन्या वाशिम भागातील हे पद्मतीर्थ भगवान विष्णूंनी स्थापित केल्याची आख्यायिका आहे. ब्रिटिश काळात येथून वाशिमला पाणीपुरवठा केला जात असे.
‘वत्सगुल्म माहात्म्य’ या अर्वाचीन स्थानमाहात्म्य ग्रंथातील अध्याय क्र. २३, २४, २५ आणि २६ मध्ये ‘पद्मतीर्थोपाख्यान’ कथन केले आहे. या तीर्थाची आख्यायिका अशी की एकदा भगवान विष्णू मध्य देशातील (सध्याचा मध्य प्रदेश, विदर्भ आदी भाग) वत्सारण्यात (म्हणजे वत्स जनपदातील अरण्यात) त्यांचे वाहन असलेल्या गरुडाचा शोध घेण्यासाठी आले. बराच कालावधी उलटून गेल्यावरही गरूडाचा पत्ता लागेना. एके ठिकाणी हातातील पद्म (कमळ) खाली ठेवून ते गरुडाचा शोध घेत होते.
काही वेळाने परत येऊन पाहिले तर ते पद्म अदृश्य झाले होते. त्या ठिकाणी खणले असता तेथे एक जलाशय निर्माण झाला. हेच पद्मतीर्थ होय. येथे विष्णूने पद्मेश्वर लिंगाची स्थापना केली.
वत्सगुल्म माहात्म्यातील पद्मतीर्थाची एक कथा दधीची या वैदिक ऋषींशी निगडित आहे. दधीची ऋषींचे पिता अथर्वण ऋषी, तर माता कर्दम ऋषींची कन्या चित्ती होती. पौराणिक कथेनुसार, वृत्रासुर या असुराशी लढण्यासाठी इंद्रास अत्यंत प्रभावी व अजिंक्य असे अस्त्र हवे होते. तेव्हा दधीची ऋषींनी इंद्रास आपल्या अस्थी दान केल्या. त्या अस्थींपासून इंद्राचे वज्र व अन्य अस्त्रे तयार करण्यात आली. (परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी शौर्यपदकावर दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेले वज्र कोरण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशावरून ‘परमवीर चक्र’ हे सर्वोच्च शौर्यपदक देण्यात आले. त्याची रचना सावंतवाडी संस्थानातील प्रतिष्ठित परिवारातील मेजर जनरल विक्रम खानोलकर यांची पत्नी सावित्री खानोलकर यांनी केली होती.) वृत्रासुराच्या वधानंतर विष्णूने दधीची ऋषींच्या अस्थींपासून तयार केलेल्या शस्त्रांचे विसर्जन पद्मतीर्थात केले. असे मानले जाते की या तीर्थातील पाण्यात अस्थी विरघळण्याची क्षमता होती. त्यावेळी विष्णूने येथे शिवलिंग स्थापन केले.
आजही वाशिम शहरातील दशक्रिया विधी या तीर्थाजवळील एका वटवृक्षाखाली केले जातात.
वत्सगुल्म माहात्म्यात या तीर्थाविषयीची आणखी एक आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशी की धर्मगुप्त नामक एका श्रीमंत व दानशूर वैश्यास गुहा नावाची पत्नी होती. तरुण व सुंदर असलेली गुहा वृत्तीने व्यभिचारी होती. तिला विवाहबाह्य संबंधातून विभावसू नावाचा पुत्र प्राप्त झाला होता. पुत्रप्राप्तीनंतरही ती तिच्या प्रियकरास भेटत असे. एकदा धर्मगुप्ताने तिला व्यभिचार करताना पकडले. त्याने तिला मारहाण केली. तेव्हा तिने व तिच्या प्रियकराने धर्मगुप्ताची हत्या केली व दोघे विभावसूला मागे ठेवून पळून गेले. पळून जात असताना जंगलात तिच्या प्रियकराला एका वाघाने ठार मारले. अखेर तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिला वेश्यालयात जावे लागले. इकडे तिचा मुलगा विभावसू याचे त्याच्या काकाने पालनपोषण केले. तारुण्यात एकदा काकाशी भांडून तो घर सोडून गेला. योगायोगाने तो त्याच वेश्यालयात पोहोचला. तेथे त्याचा स्वतःच्याच मातेशी शरीरसंबंध झाला. बोलता बोलता त्यांना आपले नाते समजले आणि त्यांना आपल्या कृत्याची घृणा वाटली.
त्यांनी स्वतःस पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी शरीरास आग लावली, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचा देह अर्धवट जळाला. त्यांना मरण मात्र आले नाही, पण त्या जखमांनी त्यांचे शरीर सडू लागले. मात्र त्यांनी पद्मतीर्थात नित्य स्नान केल्यामुळे त्यांच्या जखमा बऱ्या झाल्या. अशा प्रकारे पद्मतीर्थ हे पापांपासून आणि वेदनांपासून मुक्ती देणारे तीर्थ आहे, असा माहात्म्यकारांचा अभिप्राय आहे.
जुन्या वाशिम शहराच्या दक्षिण भागात पद्मतीर्थ हा पवित्र तलाव आहे. वत्सगुल्म माहात्म्यानुसार हा तलाव घनदाट जंगलात होता, मात्र आता त्याभोवती लोकवस्ती झालेली आहे. पावसाळ्यात हा तलाव काठोकाठ भरतो. तलावाच्या मधोमध पद्मेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी जेट्टीसारखा सिमेंटचा कठडा असलेला पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या प्रवेशद्वारानजीक एका बाजूस भला मोठा धातूचा त्रिशूळ उभारण्यात आला आहे.
तलावाच्या मधोमध पद्मेश्वराचे छोटेसे अष्टकोनी मंदिर स्थित आहे. या मंदिरात अष्टकोनी प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर छताकडील भागावर शंकराची मूर्ती विराजमान आहे. मांडीवर पार्वती आणि पुत्र गणेशास घेतलेल्या रूपातील ही मूर्ती आहे. मंदिरास घुमटाकार शिखर आहे. त्यावर शंकूच्या आकाराचा आमलक व त्यावर कलश आहे. मंदिरात जमिनीवर पद्मेश्वराची पिंडी आहे. या पिंडीची शाळुंका संगमरवरात घडवलेली आहे. त्यावर काळ्या गुळगुळीत पाषाणाचे लिंग आहे. शिवपिंडीसमोर नंदीची छोटी संगमरवरी मूर्ती आहे. पिंडीवर पंचधातूचे मोठे अभिषेकपात्र आहे. आतील भिंतीमधील देवकोष्ठांत अन्नपूर्णा देवी, गणेश आणि दत्तात्रय यांच्या सुबक मूर्ती विराजमान आहेत. पद्मतीर्थाच्या बाजूला, मुख्य मंदिराकडून येणाऱ्या पुलाच्या समोरच्या भागात सिद्धिविनायक भालचंद्र गणपती मंदिर आहे. त्यात गणेशाची अनघड पाषाणमूर्ती विराजमान आहे. या मंदिराच्या बाजूला नागदेवतेचे तसेच महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी या तीर्थ परिसरात नारायण महाराज, झिंगरे महाराज व रानडे बाबा अशा ऋषितुल्य संतांची समाधीस्थळे आहेत.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पद्मतीर्थावर मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यावेळी विद्युत रोषणाईने पद्मतीर्थ परिसर सजविला जातो. या दिवशी अनेक भाविक या तीर्थावर स्नानाची पर्वणी साधतात. याशिवाय येथे दर सोमवारी आणि शिवरात्रीसही भक्तांची मांदियाळी जमते.