महाराष्ट्रात गणेशाची अडीच शक्तिपिठे असल्याची मान्यता आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील मोरगाव आणि जालना जिल्ह्यातील राजूर येथे दोन स्वतंत्र शक्तिपिठे व एरंडोल येथील पद्मालय मंदिर हे अर्धपीठ मानले जाते. पद्मालय म्हणजेच कमळांचा तलाव. त्याशेजारी असलेले हे गणेशाचे स्थान पद्मालय गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य असे की येथील गर्भगृहात एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची अशा दोन गणेशमूर्ती आहेत. पौराणिक माहितीनुसार, कृतवीर्य पुत्र कार्तवीर्य म्हणजेच सहस्त्रार्जुन व शेष या दोघांनी एकाच ठिकाणी या मूर्तींची स्थापना केलेली आहे.
गणेश पुराणातील उल्लेखानुसार, कृतवीर्य राजाने संततीप्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थी व्रत केले. त्यामुळे त्या दाम्पत्याला पुत्र झाला. परंतु त्यास हातपाय नव्हते. राजाने या बालकाचे नाव अर्जुन असे ठेवले. अर्जुन बारा वर्षाचा झाल्यानंतर एकदा दत्ताची स्वारी राजदरबारात आली व त्यांनी राजाकडे राजपुत्रास पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जुनाला पाहिल्यावर ते म्हणाले की संकष्ट चतुर्थीला जागरण करताना तू जांभई दिलीस व आचमन केले नाहीस. त्यामुळे तुझ्या मुलामध्ये हा दोष राहून गेला. हा दोष निवारण्यासाठी दत्तात्रेयांनी अर्जुनाला गणेशमंत्र दिला. अर्जुनाच्या विनंतीवरून राजा कृतवीर्याने त्याच्यासाठी जंगलात पर्णकुटी उभारली. त्या ठिकाणी अर्जुनाने घोर तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे त्यास सहस्र हातांएवढे बाहुबल व दोन्ही पाय प्राप्त झाले व तो सहस्रार्जुन बनला.
सहस्रार्जुनास जेथे गणेशाने दर्शन दिले त्याच ठिकाणी त्याने प्रवाळ रत्नरूपी गणेशाची स्थापना केली. या गणेशास प्रवाळ गणेश असेही म्हणतात. पौराणिक उल्लेखानुसार, परशुरामाचे पिता जमदग्नी व माता रेणुका यांची हत्या याच सहस्रार्जुनाने केली. येथील शेषस्थापित गणेशाबाबत पौराणिक आख्यायिका अशी आहे की एकदा कैलास पर्वतावर महादेवांच्या दर्शनासाठी सर्व देव आले होते. ते पाहून शेषाला गर्व झाला की महादेवांना सर्व देव नमस्कार करत आहेत. परंतु मी त्यांच्या गळ्याभोवती विराजमान आहे. त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे. शेषाच्या मनातील विचार महादेवांना कळाले व त्यांनी एका झटक्यात शेषाला कैलासावरून जमिनीवर आपटले. त्यामुळे त्यास मोठी दुखापत झाली. त्याच्या फण्यांतून रक्त वाहू लागले. वेदनेने हैराण झालेल्या शेषाला वेदनामुक्त होण्यासाठी नारदांनी गणेशमंत्र दिला. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणेशाने त्यास विराट दर्शन देऊन पीडामुक्त केले. गणेशाच्या कृपेने शेष विष्णू व महादेवांना प्रिय झाला. त्यामुळे आनंदित झालेल्या शेषाने गणेशाने जेथे दर्शन दिले, तेथेच धरणीधर गणेशाची स्थापना केली. सहस्त्रार्जुन व शेष या दोघांना गणेशाने पद्मालय क्षेत्री दर्शन दिले. त्यामुळे दोघांनीही बाजूबाजूला गणेश मूर्तींची स्थापना केली. असे सांगण्यात येते, की या दोघांना गणेशाने पद्मालय सरोवरातून प्रकट होऊन दर्शन दिले. त्यामुळे या सरोवरातील कमलपुष्पांना विशेष महत्व आहे.
मंदिरासमोर असलेल्या कमल पुष्पांच्या तलावामुळे हा भाग पद्मालय म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील वाईचे गोविंदशास्त्री बर्वे हे जळगाव जिल्ह्यातील तळई या गावात स्थायिक झाले. तिथे त्यांनी मठ उभारला होता. एकदा काही भाविकांसोबत ते पद्मालय क्षेत्री आल्यावर त्यांना हा परिसर भावला. १२ वर्ष त्यांनी येथे तपश्चर्या केली. भगवंताचा साक्षात्कार होवून त्यांना पद्मालय मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकेत मिळाला. त्यानुसार १९०४ मध्ये गोविंदशास्त्रींनी मंदिराचा मूळ ढाचा न बदलता जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम सुमारे नऊ वर्षे सुरू होते.
वाहनतळापासून काही अंतरावर पद्मालय मंदिर आहे. या मार्गावर पूजासाहित्य तसेच प्रसादविक्रीची अनेक दुकाने व उपहारगृहे आहेत. येथून पुढे एका कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे डावीकडे एक मोठा तलाव आहे. ज्यात बाराही महिने कमळाची फुले उमललेली असतात. या पद्मालय तलावाच्या एका बाजूला गणपती मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. काहीशा उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिरातील काही पायऱ्या चढून बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी मूर्ती आहे. भाविकांच्या सोयीसाठी सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे गणेशाच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावरही शेंदरी रंगातील गणपतीची मूर्ती आहे.
गर्भगृहात एकाच वज्रपिठावर गणेशाच्या तांदळा स्वरूपातील दोन मूर्ती आहेत. त्यापैकी उजव्या सोंडेची मूर्ती सहस्त्रार्जुन म्हणून ओळखली जाते, तर दुसरी डाव्या सोंडेची शेषनाथ या नावाने ओळखली जाते. त्यांच्यावर चांदीचे छत्र आहे. मूर्तींच्या मस्तकांवर चांदीचे मुकूट आहेत. या गर्भगृहावर असलेल्या कळसाचा आतील भाग हा तब्बल ९० फूट उंचीचा आहे. या पद्मालय देवस्थानाच्या समोरील बाजूस गोविंद महाराजांच्या पादुकांचे स्थान आहे. या पादुकांजवळ एक मोठी जुनी घंटा टांगलेली आहे. या घंटेवर गणेशाची चित्रे आहेत. घंटेचे वजन ४१० किलो आहे. असे सांगितले जाते की गोविंद महाराजांच्याच आज्ञेवरून बाळकृष्ण वामन कुलकर्णी–नेरीकर यांनी ही घंटा अकराशे रूपये खर्चून काशीक्षेत्री बनवून घेतली होती. या घंटेचा आवाज तीन मैलांपर्यंत दूर जात असे. परंतु कालपरत्वे घंटेस हानी होऊ नये म्हणून काही वर्षांपूर्वी वजनदार लोलकाऐवजी त्यात लाकडी लोलक लावण्यात आला आहे.
याशिवाय मंदिराच्या आवारात बालगणेश व महादेव यांची मंदिरे आहेत. माघ शुद्ध चतुर्थीला येथे गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाही उत्सव होतो. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस येथे यात्रा असते. कार्तिकस्वामी आपला धाकटा बंधू गणेशाच्या भेटीला यादिवशी येथे येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकी चतुर्थीला याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी एरंडोल येथून मंदिरापर्यंत एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जातात.