अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत, पैनगंगेच्या पात्रात विसावलेले दुधा-ब्रह्मपुरी येथील ओलांडेश्वर मंदिर हे विदर्भ व मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील स्वयंभू शिवलिंग पाच हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते. नदीचा प्रवाह ओलांडून या मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घ्यावे लागत असल्याने त्यास ‘ओलांडेश्वर’ हे नामाभिधान प्राप्त झालेले आहे. विदर्भाचे राजे भीष्मक यांनीही या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याची आख्यायिका प्रचलित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे होणारा शिव-पार्वती विवाहसोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. या उत्सवाच्या वेळी भाविकांना सुमारे दीडशे क्विंटल महाप्रसादाचे वाटप केले जाते.
येथे प्रसिद्ध असलेल्या लोककथांनुसार, प्राचीन काळी हा मंदिर परिसर दंडकारण्याचा भाग होता. अनेक ऋषी-मुनींनी येथे तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्र वडाळीकडे जाताना येथे मुक्कामी होते. येथून सुमारे एक किमी अंतरावरील रानमठ येथे गिलाणदेव भारती नावाचे योगीपुरुष वास्तव्य करायचे. ते या मंदिराजवळील नदीपात्रातील खडकावर स्नान करून येथील महादेवाचे दर्शन घेत असत.
या खडकाजवळ येण्यासाठी नदी त्यांना वाट करून देत असे. ते संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देत असत. नदीपात्रातील एका छोट्या बेटावर हे मंदिर वसलेले आहे. या नदीला पूर आला की येथील शिवलिंग पाण्याखाली जाते. मात्र, या पुराच्या पाण्यामुळे शिवलिंगाची कोणतीही हानी होत नाही किंवा पिंडीजवळील नंदीची छोटी मूर्ती कधीही वाहून गेलेली नाही. पूर्वी हे शिवलिंग खुल्या जागेत होते. परंतु काही वर्षांपूर्वी येथे दुमजली वास्तू बांधण्यात आली. राज्य सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिलेला आहे.
हिवरा आश्रम येथून जवळच असलेल्या या मंदिराचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मंदिरापासून नजीकच एक कुंड आहे आणि एका गोमुखातून त्यात निरंतर जलधारा पडत असते. या गोमुखाच्या खालील भागात गणेशाचे शिल्प आहे. ओलांडेश्वराचे मंदिर काही खांबांवर उभे आहे.
अन्य मंदिरांप्रमाणे गर्भगृह, सभामंडप अशी या मंदिराची रचना नाही. या वास्तूच्या खालील भागात, स्तंभांच्या मधोमध असलेल्या चौथऱ्यावरील शाळुंखेमध्ये ओलांडेश्वर महादेवाचे स्वयंभू पाषाणी लिंग आहे. त्यावर नागाने छत्र धरले आहे. शिवलिंग असलेल्या स्थानाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आलेले आहे. मंदिराबाहेरील खुल्या जागेत नंदीची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या वरच्या मजल्यावर बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. मंदिर परिसरात हनुमान आणि शनिदेवाचेही स्थान आहे.
या मंदिरापासून काही पावलांवर ‘ओलांडा’ नावाचे विशेष स्थान आहे. या स्थानाजवळ असलेल्या एका झाडाच्या खोडाच्या खालच्या भागातून अनेक भाविक आरपार जातात. तसे केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच अनेक बाधा दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. लहान मुलांचे जावळही येथे काढण्याची प्रथा आहे. जागृत देवस्थान असा लौकिक असल्याने शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नदीपात्रात स्नान केल्यानंतर ओल्या वस्त्रानिशी हळद-कुंकू, अक्षता व बेलपत्र अर्पण करून अनेक भाविक ओलांडेश्वर महादेवाची पूजा करतात. येथील शिवशंकरांना हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दिला जातो. नवस करणारे अनेक भाविक इतर भाविकांनाही या नैवेद्याचे वाटप करतात.
येथे वर्षभर होम-हवन, भजन-कीर्तन, भागवत सप्ताह यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दर सोमवारी तसेच प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा व अमावस्येला येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असतो. यावेळी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या दिवशी रात्री बारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिवशंकर व पार्वतीचा विवाहसोहळा विधिवत पार होतो. या उत्सवाच्या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे १०० क्विंटल गव्हाच्या पुऱ्या व ५० क्विंटल वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारीही येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्यातील चारही सोमवारी अनेकांकडून येथे अन्नदान करण्यात येते. मंदिर व्यवस्थापनातर्फे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात बालसंस्कार वर्गाचाही समावेश आहे. परिसरातील अनेक निर्धन कुटुंबातील मुला-मुलींचे विवाहही मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे लावून दिले जातात. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी परिसरात भक्तनिवासही उभारण्यात आले आहे.