थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेराननजीक, नेरळ–माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गावर असलेले निसर्गराजा गणपतीचे स्थान पर्यटक व भाविकांमध्ये अतिशय प्रिय आहे. २०१८ मध्ये आकारास आलेला व ५२ फूट उंचीचा हा ‘निसर्गराजा गणपती‘ माथेरानमधील महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन ठरले आहे. डोंगराच्या उंच कड्याला तासून गणपतीचा आकार दिलेला असल्यामुळे याला ‘कड्यावरचा गणपती‘ असेही म्हटले जाते. या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या पेब किल्ल्यावर ‘प्रति गिरनार’ अशी ओळख असलेले दत्त मंदिर आहे.
डोंगरमाथ्यावरील दाट अरण्य म्हणजेच माथ्यावरील रान या अर्थाने या भागास माथेरान हा शब्द रूढ झाला असे सांगण्यात येते. या भागातील धनगर समाजाच्या समजुतीनुसार धनगरांचे आद्य माता–पिता याच जंगलात मरण पावले. त्यामुळे त्यास मातेचे रान असे म्हटले जाऊ लागले. तेच पुढे माथेरान झाले. या परिसरास प्रागैतिहास काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. आदिवासी, कातकरी हे येथील आद्य रहिवासी होते. मात्र याची गिरिस्थान ही ओळख झाली ती इंग्रजांमुळे. मे १८५० मध्ये मुंबईचे एक सनदी अधिकारी ह्यू मॅलेट यांनी प्रथम माथेरानला भेट दिली. त्यानंतर ते येथे झोपडी बांधून काही काळ राहिले आणि हे स्थान लष्करी आरोग्यधामास योग्य असल्याची शिफारस त्यांनी केली. त्यावेळी माथेरानचे
रितसर सर्वेक्षण करण्यात आले. पुढे १८५८ ते १८८५ या काळात लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी एक हजार डॉलर (तत्कालीन दहा हजार रुपये) खर्चून नेरळ ते माथेरान हा रस्ता बांधला. सन १९०४ ते १९०७ या काळात अब्दुल हुसेन आदमजी पीरभाय यांनी तत्कालीन एक लाख ६० हजार रुपये खर्चून नेरळ ते माथेरान रेल्वे सेवा सुरू केली. येथील याच रेल्वे सेवेतील एका कर्मचाऱ्यामुळे निसर्ग राजा गणपतीचे स्थान लोकांसमोर आले.
या देवस्थानाच्या निर्मितीची कहाणी अनोखी आहे. असे सांगितले जाते की नेरळ माथेरानदरम्यान धावणाऱ्या मिनीट्रेनचे चालक राजाराम खडे यांना प्रत्येक फेरीमध्ये येथे असलेल्या एका उंच कड्यातून गणपती आपल्याकडे पाहतोय, असा भास होत असे. अनेकदा त्यांना स्वप्नातही येथील गणेशाचे दर्शन होत असे. या कड्याचा आकारही काहीसा तसाच होता. १९९८ पासून ते या मार्गावर कर्तव्यास होते. २००४ मध्ये नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर असताना नेरळ स्थानकात माथेरानसाठी गाडी सुटणार इतक्यात इंजिनमध्ये अचानक उंदीर घुसला. काही केल्या तो तेथून बाहेर पडेना. अखेरीस ट्रेन सुरू करून ते पुढे निघाले आणि ज्या ठिकाणी आता गणपतीचे स्थान आहे त्या ठिकाणी येऊन त्या उंदराने इंजिनमधून टुणकन खाली उडी मारली. हा दैवी संकेत मानून त्यांनी त्या कड्याकडे पाहिले असता तेथे गणपती त्यांना आशीर्वाद देतोय, असा भास झाला.
श्री. खडे यांनी नेरळ व माथेरानमधील काही ग्रामस्थांना व रेल्वेमधील सहकाऱ्यांना या घटनेबाबत सांगितले. गणेशाने आपल्याला दिलेला हा संकेत असून या ठिकाणी महागणपतीची प्रतिकृती उभारण्याची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानुसार २००४ मध्ये राजाराम खडे यांच्यासह सर्वांनी या कड्याला गणपतीचा आकार देण्याची मोहीम सुरू केली. येथील खडकांवर घाव घालून त्यातून गणेशाचे मुख साकार करण्यात आले. त्यानंतर हात आणि हातांमध्ये असणारी आयुधे खडकांना तासून तयार करण्यात आली. २००४ मध्ये सुरू केलेले हे अत्यंत कष्टाचे व जिकीरीचे काम चौदा वर्षांनंतर २०१८ साली पूर्णत्वास आले. त्यानंतर डोंगरावरच्या कड्यामध्ये ही ५२ फूट उंचीची भव्य गणपतीची मूर्ती आकारास आली. निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे या गणेशाला ‘निसर्गराजा गणपती’ हे नाव देण्यात आले.
नेरळ येथून माथेरानला जाण्याच्या मार्गावर माथेरानच्या आधी साधारणतः दोन किमी अंतरावर, रेल्वे ट्रॅकवरून या गणपतीच्या स्थानापर्यंत पायी येता येते. साधारणतः अर्धा तास चालल्यानंतर या भव्य कड्यावरच्या गणपतीचे दर्शन होते. हे स्थान म्हणजे निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेली सुंदर कलाकृती समजली जाते. भाविकांना या गणपतीचे दर्शन घेणे सोयीचे व्हावे यासाठी या भव्य गणपतीच्या पायाजवळ २०२० मध्ये एका लहानशा गुहेत मंदिराची उभारणी झाली. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू हातात घेतलेला भव्य मूषकराज व आत निसर्गराजा गणपतीची लहान प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. माथेरानमध्ये येणारे अनेक पर्यटक आवर्जून या कड्यावरच्या गणेशाच्या दर्शनासाठी येथे येतात.
निसर्गराजा गणपतीपासूनच सुमारे दीड तास डोंगरांमधील अवघड वाट चालून पेब म्हणजेच विकटगड या किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. असे सांगितले जाते की या किल्ल्यावरील गुहेचा वापर मराठा कालखंडात धान्य कोठारांसाठी केला जात असे. या किल्ल्यावरच्या सर्वोच्च टोकाला एक छोटेखानी दत्त मंदिर आहे. गिरनारच्या दत्त मंदिराप्रमाणे याचे स्थान असल्याने ते ‘प्रति गिरनार’ म्हणून प्रसिद्ध आहे.
मिनीट्रेनचा ट्रॅक सोडल्यावर तेथून एक डोंगर खाली उतरून पुन्हा दुसऱ्या डोंगराच्या वरील पठारावर यावे लागते. छातीत धडकी भरवणारा मार्ग, एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशी अरुंद वाट, एका बाजूला खोल दरी, काही ठिकाणी तर दोन्ही बाजूने खोल दरी व मधून रस्ता, तीन ते चार ठिकाणी लोखंडी शिडीवरून चढावे व उतरावे लागते, अशा अवघड मार्गावरून किल्ल्यावरील या दत्त मंदिरात यावे लागते. या मंदिराचे स्थान हे किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरील उंचवट्यावर आहे. येथून नेरळ शहराचे विहंगम दृश्य दिसते. छोटेखानी असलेल्या या मंदिराला भिंती नाहीत. चार खांबांवर उभारलेल्या या मंदिरात अखंड दगडापासून बनविलेली एकमुखी दत्ताची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. या मूर्तीला सहा हात आहेत. मूर्तीच्या समोरील बाजूस पादुका आहेत. दत्त मूर्तीच्या एका बाजूला हनुमंताची, तर दुसऱ्या बाजूला गणपतीची छोटी मूर्ती आहे.
या मंदिराला प्रदक्षिणा मार्ग आहे. हा प्रदक्षिणा मार्ग अशा पद्धतीने बांधलेला आहे की येथून खाली पाहिल्यास केवळ खोल खोल दरीच दिसते. केवळ एका बाजूने मंदिरात येण्यासाठी रस्ता आहे. हे देवस्थान डोंगराच्या सर्वात उंच स्थानावर आहे. येथे येण्यासाठी मार्ग कठीण असला तरी अनेक ट्रेकर्स, पर्यटक व भाविकांची या मंदिरात बाराही महिने ये–जा असते. दत्त जयंतीला येथे उत्सव साजरा केला जातो. या मंदिराच्या परिसरात १०० मीटर अंतरावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. तेथे पाण्याची तीन नैसर्गिक कुंडे आहेत. या कुंडांमध्ये बाराही महिने पाणी असते. याशिवाय येथे स्वामी समर्थ मठ आहे. तेथे काही वेळ विश्रांती करता येते. येथे असलेली नैसर्गिक गुहा ही किमान १०० माणसे एकावेळी बसू शकतील एवढी मोठी आहे. असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी अनेक साधू येथे ध्यानधारणेसाठी येत असत.
गिरनारच्या प्रसिद्ध दत्त मंदिराचे स्थान ज्या प्रमाणे टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी आहे, तसेच हेही स्थान आहे. याशिवाय तेथे ध्यानधारणा करण्यासाठी विशिष्ट जागा आहे, तशीच येथेही आहे. गिरनारप्रमाणे येथेही महादेवाचे स्थान आहे. शिवाय उंचीवर असूनही मुबलक पाण्याची सोय या बाबींमुळे भक्तांमध्ये हे स्थान ‘प्रति गिरनार’ म्हणून प्रसिद्ध आहे.