निळकंठेश्वर मंदिर

साखरपेठ, सोलापूर, ता. जि. सोलापूर

भारतात शैव संप्रदायाची परंपरा अतिप्राचीन आहे. भगवान शंकर या संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. शंकराच्या अनेक नावांपैकी नीलकंठेश्वर हे एक लोकप्रिय नाव आहे. सृष्टीच्या रक्षणाकरीता विषप्राशन केल्याने महादेवाचा कंठ निळा पडला व त्यामुळे महादेवास निळकंठ हे नाव पडले. पुढे त्यास ‘ईश्वर’ जोडून नीलकंठेश्वर नाव मिळाले. सृष्टीचे रक्षण करणाऱ्या या नीलकंठेश्वराची देशात हजारो मंदिरे आहेत. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर सोलापूर शहरात साखरपेठ येथे आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर १९४२ साली बांधलेले आहे. त्यावेळी काशीहून आणलेल्या शिवपिंडीची मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यामुळे येथे दर्शन घेतल्याने काशी यात्रेचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील नंदी साडेपाच फूट उंच व नऊ फूट लांब आहे. सोलापुरातील साखरपेठ भागातील गजबजलेल्या परिसरात हे मंदिर आहे. मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर गोलाकार आणि वर निमुळते होत गेलेले नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांवर चौकट व त्यावर पानाफुलांच्या नक्षी आहेत. चौकटीत महिरपी तोरण व तोरणाखाली देवकोष्टक आहे. देवकोष्टकात महादेवाची मूर्ती आहे.
मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून इमारती आहेत. त्यात सेवेकऱ्यांची निवासस्थाने, सभागृह, देवस्थानचे कार्यालय, शाळा व इतर विविध प्रयोजनाचे कक्ष आहेत. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. हा सभामंडप अलिकडील काळात बांधल्याचे जाणवते. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात दोन्ही बाजूला प्रत्येकी सहा गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. स्तंभ व त्यावरील तुळई सुवर्ण रंगाने रंगवलेल्या आहेत. वितानावर चक्राकार नक्षी व छताला पितळी घंटा आहेत.
सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती आहे. मूर्ती सुमारे नऊ फूट लांब व साडेपाच फूट उंच आहे. नंदीच्या पाठीवरील झुल, घंटीमाळा व गळ्यात घुंगरमाळा कोरलेल्या आहेत. पुढे सभामंडपापेक्षा काही इंच उंच असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास चार नक्षीदार पाषाणी स्तंभ व त्यावर कणी आहेत. कणीवरील चारही वामनस्तंभ एकमेकांना तीन महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथे मेजावर पद्मपादुका आहेत.
पुढे गर्भगृहाचे रजतपटल आच्छादित प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर वेलबुट्टी व पद्मनक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर तोरण आणि मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व त्यावर चांदीची मिनाकारी सजावट केलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी दोन फूट उंच शिवपिंडी आहे. या पिंडीवर चांदीची आभूषणे व छत्र धरलेला पितळी नाग आहे. बाजूला त्रिशूल आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावरील मखरात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात हवा येण्यासाठी जाळीदार गवाक्ष आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर नंदी शिल्पे आहेत. मध्यभागी गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखरावर खालील बाजूस पद्मदलमंडळ व वर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी जिल्हाभरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
श्रावण महिन्यात सर्व सोमवारी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी चांदीच्या रथात महादेवाचा मुखवटा ठेवून मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिण केली जाते. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात. श्रावण महिन्यात येणारे नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी आदी सण विशेष करून साजरे केले जातात. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • सोलापूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home