निलांबिका देवी नील पर्वत

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक


धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वतावर निलांबिका देवीचे मंदिर आहे. ‘नवसाला पावणारी देवी’ अशी या देवीची ख्याती आहे. असे सांगितले जाते की, त्र्यंबकेश्वरमध्ये शिवासोबत शक्तीचाही वास असल्याने त्र्यंबकेश्वराबरोबरच भाविकांनी या देवीचे दर्शन घेतल्याने त्र्यंबकेश्वर यात्रा पूर्ण होते.

या देवीची आख्यायिका अशी की तीर्थाटन करत करत भगवान परशुराम श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तपश्चर्येकरिता आले. बराच कालावधी लोटल्यामुळे त्यांना मातेच्या भेटीची आस लागली होती. मातेचा विरह असह्य झाल्याने त्यांनी नील पर्वतावरून मातेचा धावा सुरू केला. मातेने त्यांना दृष्टान्त देत सांगितले, ‘मी जमिनीतून पूर्णपणे वर येईपर्यंत तू नेत्र उघडू नकोस.’ त्याप्रमाणे परशुराम डोळे मिटून ध्यानस्थ बसले. माता जमिनीतून वर येऊ लागली. मातेचे दर्शन घेण्याची परशुरामांना घाई झाली होती. त्यांनी काही क्षणांनंतरच डोळे उघडले. मात्र तोपर्यंत मातेचे फक्त मानेपर्यंतचे शरीर जमिनीतून वर आले होते. मातेचे पूर्ण शरीर वर येण्याआधीच परशुरामांनी डोळे उघडल्यामुळे रेणुकामाता अर्थात निलांबिकेचा मानेपर्यंतचाच मुखवटा बाहेर आला. त्यामुळे तेथे देवीची तशीच स्थापना झाली.

हे मंदिर डोंगरावर असल्याने येथे जाण्यासाठी सुमारे २०० पायऱ्या आहेत. मात्र आता पायऱ्यांसोबतच मंदिरात जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराजवळ वाहन जाऊ शकते. मंदिर परिसरात खाण्या-पिण्याची किंवा पूजा सहित्याची दुकाने नाहीत. मात्र खाली, पर्वताच्या पायथ्याशी अनेक दुकाने पाहायला मिळतात. वर गेल्यावर काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते. पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडतो. निलांबिका देवीच्या मंदिरासोबतच या ठिकाणी मटांबा देवी मंदिर आणि देवीची नऊ रूपे असणारी नऊ मंदिरे आहेत.येथून खाली पाहिल्यास त्र्यंबक शहराचे दर्शन होते. मंदिर परिसरात नीळकंठेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरेदेखील आहेत. तसेच तेथे १५० फुट उंचीचे त्रिशूळ आहे.

निलांबिका देवीचे मंदिर छोटेखानी व दगडी आहे. हे मंदिर सोनेरी आणि चंदेरी रंगात रंगविले असल्याने सूर्यप्रकाश पडताच ते चमकू लागते. मंदिर कौलारू असून त्याला आतून लाकडी मंडप आहे. मंदिरासमोर यज्ञकुंड आहे, तसेच वाघाची मूर्तीदेखील आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर शेंदूर लावलेली दगडी मूर्ती पाहायला मिळते. देवीची रोज शृंगार पूजा केली जाते. तसेच तिच्यापुढे रोज फुलांची सजावटदेखील केली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात बाराही महिने नंदादीप (अखंडपणे चालू असणारा दिवा) जळत असतो. हे स्थान शक्तिपीठ असून पार्वतीचे रूप असल्याचे मानले जाते. हे मंदिर प्राचीन आहे, मात्र याचे बांधकाम नेमके कुठल्या काळात झाले, याबद्दलचे तपशील उपलब्ध नाहीत.

त्र्यंबकेश्वर ही शिवाची भूमी मानली जात असल्याने येथे शक्तीचाही वास असल्याचे सांगितले जाते. चैत्र महिन्यात व शारदीय नवरात्रात येथे देवीचा मोठा उत्सव होतो. आश्विन शुद्ध अष्टमीला त्र्यंबकेश्वर नगरीतील कोलांबिका, निलांबिका व भुवनेश्वरी या तीनही देवींच्या मंदिरांमध्ये त्र्यंबकेश्वर संस्थानाच्या वतीने नवचंडी यज्ञ केला जातो.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरापासून २९ किलोमीटर अंतरावर
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून त्र्यंबकेश्वरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home