भारतात शैव संप्रदायाची परंपरा अतिप्राचीन आहे. भगवान शंकर या संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. शंकराच्या अनेक नावांपैकी नीलकंठेश्वर हे एक लोकप्रिय नाव आहे. सृष्टीच्या रक्षणाकरीता विषप्राशन केल्याने महादेवाचा कंठ निळा पडला व त्यामुळे महादेवास नीलकंठ हे नाव पडले. पुढे त्यास ‘ईश्वर’ जोडून नीलकंठेश्वर नाव मिळाले. सृष्टीचे रक्षण करणाऱ्या या नीलकंठेश्वराची देशात हजारो मंदिरे आहेत. त्यातील एक प्राचीन मंदिर सेनगाव तालुक्यातील उटी येथे आहे. येथील नीलकंठेश्वराच्या दर्शनाने काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
केलसुला, रिसोड व उटी हा भाग पूर्वी उमारण्य म्हणून प्रसिद्ध होता. लोणार येथील सच्चिदानंद स्वामी यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या ‘उमारण्य माहात्म्य’ या पोथीत या मंदिराची कथा आहे, ती अशी की अगस्ती ऋषी उमारण्यात कायम वास्तव्याला आले होते. त्यावेळी त्यांना काशी विश्वेश्वराची आठवण येऊ लागली. काशी विश्वेश्वराचे नित्य दर्शन होत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अगस्ती ऋषींनी शंकरांस काशीहून येथे येण्याची विनंती केली. त्यावेळी शिवशंकर अगस्तींसाठी येथे आले. तेच हे स्थान नीलकंठेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.
अगस्ती ऋषींनी त्यांच्या पूजेसाठी येथे एक कुंड निर्माण केले. त्याला अगस्ती कुंड म्हणतात. आजही हे कुंड या मंदिर परिसरात आहे.
उटी गावाच्या वेशीवर नदीकिनारी नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. हेमाडपंती स्थापत्यरचना असलेल्या या मंदिरावर व आतील भागांत वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात उजवीकडे नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर व डावीकडे ब्रह्मचारी मठ आहे. या ब्रह्मचारी मठाच्या समोरील बाजूला नागनाथ मंदिर आहे. उंच जोत्यावर असलेल्या नीलकंठेश्वर मंदिराची नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना आहे. मंदिरासमोर असलेल्या अर्धखुल्या स्वरूपाच्या नंदीमंडपात मध्यभागी चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची प्राचीन मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या अर्धभिंतीत असलेल्या स्तंभांच्या वरील भागात भारवाहक यक्षप्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यावर नंदीमंडपाचे दगडी छत आहे. नंदीमंडपाच्या बाह्य भिंतींवरही कलाकुसर केलेली आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. कनीलकंठेश्वर मंदिराच्या डावीकडे दोन समाधी मंदिरे आहेत.
ही समाधी मंदिरे ब्रह्मचारी मठ म्हणूनच परिचित आहेत. असे सांगितले जाते की या मठाचे आजपर्यंतचे सर्व मठाधिपती हे ब्रह्मचारी होते. साधारणतः २०० वर्षांपूर्वी रामानंद महाराज नावाचे साधू येथे येऊन राहू लागले. ते ब्रह्मचारी होते. ते जेवत नसत; केवळ दूध व फलाहार घेत असत. त्यांचे चार शिष्य होते, तेही ब्रह्मचारी होते. त्यांपैकी शिवानंद हे नंतर गादीवर बसले. सध्या येथे जी दोन समाधी मंदिरे आहेत, ती रामानंद महाराज व शिवानंद महाराज यांची आहेत.
महाशिवरात्र व गुरूपौर्णिमा हे येथील मुख्य उत्सव आहेत. महाशिवरात्रीला येथे शिवलिंगाला अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. याशिवाय प्रत्येक श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आदी सण व उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरे केले जातात. गुरूपौर्णिमेलाही अनेक भाविकांची येथे गर्दी असते.
मानाकार प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपातील स्तंभांवर चारही बाजूंकडून कोरीव शिल्पे व वरील बाजूला भारवाहक यक्षशिल्पे आहेत. सभामंडपाच्या छतावरही शेकडो लहान-मोठी शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागी दगडी झुंबराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर दगडी कासवमूर्ती आहे. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. द्वारशाखांच्या खालील बाजूला द्वारपाल मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला मंडोवर आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर नक्षीदार तोरण कोरलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी व त्याभोवती वेटोळे घातलेली धातूची नागदेवता आहे.
या पूर्वाभिमुख मंदिरासमोर हेमाडपंती रचनेचे आणखी एक महादेवाचे मंदिर आहे. नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पश्चिमाभिमुख मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील गर्भगृहात पिंडीशेजारी असलेल्या एका भिंतीत साधारणतः एक ते दीड फूट खोलीचे व दोन फूट व्यासाचे दगडी भांडे आहे. या गर्भगृहातील भिंतीतून जाणाऱ्या जिवंत झऱ्यातून या दगडी भांड्यात पाणी येत असते. असे सांगितले जाते की, कोणत्याही ऋतूमध्ये या पाण्याची पातळी कमी वा जास्त होत नाही. या भांड्यातील पाणी काढले तरीही काही वेळाने पुन्हा त्यातील पाणी नेहमीच्या पातळीवर येते. मंदिराशेजारी असलेली नदी आटली तरी येथील झरा मात्र कायम वाहता असतो.