निलकंठेश्वर मंदिर,

पंचवटी, ता. नाशिक, जि. नाशिक

पंचवटी हे नाशिक शहरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच परिसरात गोदावरी नदीच्या काठावर निलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. महादेवांनी ज्या ठिकाणी विषप्राशन केले होते, ते हे स्थान असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. पद्मपुराणातील ‘नाशिक पंचवटी गोदा महात्म्य’मध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई नाशिक मुक्कामी असताना निलकंठेश्वराच्या दर्शनाला नियमित येत असत, असे ऐतिहासिक संदर्भही सापडतात.

मंदिराची आख्यायिका अशी की देव व असुर यांनी समुद्रमंथन करून त्यातील अमृत व अनमोल रत्ने काढायचे ठरविले. मंथनासाठी त्यांनी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी सापाचा दोर केला. सर्व देव हे शेपटीच्या बाजूने व राक्षस मुखाच्या बाजूने रवी समुद्रात घुसळत होते. या मंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, रंभा, ऐरावत, अमृत, विष, उच्चैःश्रवा नावाचा घोडा, कामधेनू, शंख व हरिधनू अशी १४ रत्ने निघाली; परंतु देव व असुरांकडून वासुकी सापाचा वापर दोर म्हणून केल्यामुळे त्याच्या मुखातून हलाहल (विष) बाहेर पडत होते. त्या विषाच्या उष्णतेचा सर्वांना त्रास होऊ लागला, तेव्हा महादेव ते विष घेऊन नाशिक क्षेत्री आले व गोदातीरावर बसून ते त्यांनी प्राशन केले होते. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. ज्याठिकाणी महादेवांनी विष प्राशन केले ती जागा म्हणजे आताचे निलकंठेश्वर मंदिर होय.

पंचवटीतील गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या दशश्वमेध कुंडासमोर निलकंठेश्वर मंदिर स्थित आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून ते कोणी बांधले याबाबत ठोस पुरावा नाही. असे सांगितले जाते की रामराज्यानंतर आलेल्या चंद्रचूड राजाने या मंदिराची स्थापना केली होती. दुसऱ्या संदर्भानुसार, नारोशंकर राजे बहाद्दर यांचे भाऊ लक्ष्मण शंकर यांनी १७४७ साली हे मंदिर बांधले असून त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला होता. मोगलांच्या काळात औरंगजेबाच्या सैनिकांनी या मंदिराची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. त्यात मंदिराच्या दोन दगडी खांबांचे नुकसान झाले; परंतु निलकंठेश्वराच्या प्रचितीमुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न थांबविले व मंदिर सुरक्षित राहिले.

पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर संपूर्ण पाषाणाचे आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती व वेसरा अशा दोन्ही शैलींनुसार आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये या शैलीचा जास्त प्रभाव असतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अखंड पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण नंदी आहे. प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम असून त्यावर विविध प्रकारची फुले कोरलेली आहेत. तेथून मंदिरात गेल्यानंतर सभामंडपात एका चौथऱ्यावर आणखी एक संगमरवरी नंदी पाहायला मिळतो. या मंदिराची आतील रचना अष्टकोनी आहे. मंदिरातील सभामंडप, अंतराळ व गर्भगृहात जागोजागी कोरीव कलाकुसर केलेली आहे. विविध फुलांच्या आणि भौमितिक रचनांच्या साह्याने भिंती नटलेल्या आहेत. गर्भगृहात प्रवेश करताना द्वारपट्टीकेवर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहात पांढऱ्या व काळ्या अशा दोन्ही दगडी पाषाणात घडविलेले दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे. गर्भगृहात असलेल्या दोन खिडक्यांमधून त्यातून गोदातीराचे दृश्य दिसते.

पंचवटीचा संपूर्ण परिसर वर्दळीचा असला तरी या मंदिरात शांतता अनुभवता येते. मंदिरातील प्रत्येक भिंतीला कमानीयुक्त कोनाडे व खिडक्या आहेत. मंदिराला प्रदक्षिणा घालताना बाह्य भिंतीवरील कमानीयुक्त कोनाडे व खांबांवरील कलाकुसर पाहायला मिळते. गर्भगृहासह या मंदिराला दोन घुमट आहेत व बाहेरील मुखमंडपावरील आकार घुमटाकारच आहे. त्यावर मिश्र धातूचे तीन कळस आहेत.

मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा हे उत्सव साजरे होतात. महाशिवरात्रीला मध्यरात्रीपासूनच भाविकांची येथे गर्दी असते. नवसाला पावणारा महादेव म्हणून निलकंठेश्वराची भाविकांमध्ये ख्याती आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक येथे त्रिपुरारी वाती प्रज्वलित करून नवसपूर्ती करतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे महापूजा होते. सकाळी अभिषेक व त्रिकाळ पूजा केली जाते. लघुरुद्र होऊन प्रसादाचे वाटप करण्यात येते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळीही या मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. हे मंदिर प्राचीन असल्याने महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणू्न ते घोषित केले आहे.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • पंचवटीसाठी नाशिक महापालिका बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
Back To Home