महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक ओळखले जाते. स्थान महात्म्यामध्ये सर्वच देवतांचे वास्तव्य येथे असल्याचे सांगितले जाते. वनवासकाळात लक्ष्मण व सीतेसह श्रीराम नाशिकमध्ये वास्तव्याला होते. कलियुगात होणाऱ्या स्वैराचारापासून धर्माचे रक्षण करण्यासाठी पार्वतीने नाशिक क्षेत्री गणेशाला पाठविले, असा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळेच अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणेशाची येथे अनेक स्थाने आहेत. येथील नवशा गणपती, मोदकेश्वर, महोत्कट गणेश, तिळा गणपती, लोथेंचा गणेश हे गणपती प्राचीन मानले जातात.
नाशिकमध्ये तेराव्या शतकापासून गणेशाची निश्चित स्थाने आहेत. त्यामध्ये गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान म्हणजे येथील जागृत नवशा गणपती मंदिर. नवसाला पावणारा म्हणून या गणेशाचे नामकरणही तसेच झाले आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर गंगापूर रोडवर हे मंदिर उभे आहे. सध्या असलेले मंदिर हे पेशवेकाळात बांधलेले आहे. त्यामुळे या मंदिराला ३०० ते ३५० वर्षांचा इतिहास आहे.
येथील चावंडस हे श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या. १५ ऑगस्ट १७६४ मध्ये राघोबा दादा व आनंदीबाईंना मुलगा झाला, त्याचे नाव विनायक. त्याच्या जन्मानंतर चावंडसचे नाव आनंदीबाईंच्या नावावरून ‘आनंदवल्ली’ असे ठेवण्यात आले. राघोबादादांनी आनंदवल्ली येथे मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस नवशा गणपतीचे स्थान होते. राजवाड्यातूनच या वास्तूचे दर्शन व्हावे, यासाठी इ. स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. पेशवाई गेल्यानंतरही परिसरातील काही मंदिरे शाबूत राहिली. त्यात नवशा गणपती मंदिराचा समावेश आहे.
गंगापूर रोडवरील मुख्य रस्त्यापासून आजूबाजूला असलेल्या गर्द झाडीतून नदी पात्राकडे पायऱ्या उतरून गेल्यावर हे मंदिर दिसते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे सभामंडप प्रशस्त आहे. यामध्ये दोन्ही बाजूला अष्टविनायकांची स्थापना करण्यात आली आहे. सभामंडपाचे खांब हजारो छोट्या-मोठ्या पितळी घंटांनी भरून गेले आहेत. नवसपूर्तीनंतर भाविकांकडून येथे रंगीत दोरे अथवा पितळी घंटा बांधण्याची पद्धत आहे.सभामंडपाच्या पुढे गर्भगृह, गर्भगृहाला घुमटाकार शिखर आहे. मुकुटधारी चतुर्भुज गणेशाच्या वरील दोन हातांत पाश आणि फुले, तर खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूला चांदीची सजावट आहे.
नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे या मंदिराला सतत पुराचा तडाखा बसत होता. तेव्हा आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी १९८८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९९० मध्ये संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिराच्या सभामंडपात अष्टविनायकांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक मंगळवारी, संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस येथे हजारो भाविक दर्शासाठी येत असतात. मंदिर प्रशासनातर्फे या दिवशी सुमारे पाच हजार किलो महाप्रसादाचे वाटप केले जाते.
नवशा गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच ‘हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद’ दरगाह आहे. दरगाह व मंदिर शेजारी-शेजारी असले तरी आजतागायत येथे कधीही वाद झालेला नाही. या दोन्ही संस्थांनी मिळून ‘रामरहिम’ मित्र मंडळ स्थापन केले आहे. या मित्र मंडळातर्फे अनेक सामाजिक कार्ये केली जातात.
निरव शांतता व निसर्गरम्य परिसर यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांचीही येथे कायम रेलचेल असते. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भाविक या गणेशाचे दर्शन घेऊ शकतात.