दुर्गा देवी शाक्त पंथीयांची उपास्य देवता असून तिची विविध वैशिष्ट्य असलेली नऊ रूपे पुजली जातात. तिच्या एकाच मूर्तीत नऊ गुणांचे पूजन करण्याची प्रथा असल्याने तिला नवदुर्गा म्हणून संबोधले जाते. सौम्य, मध्यम व उग्र महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या तीन देवतांची पूजा देखील नवदुर्गा म्हणून केली जाते. या नवदुर्गेचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर गोव्यातील मडकई गावी आहे. या देवीची मान काहीशी तिरपी दिसत असल्याने देवीस वक्रग्रीव्हा नावानेही संबोधले जाते. ही देवी जागृत आहे व नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. ही देवी मुळची ‘गावांशी’ गावाची असून ती पोर्तुगीज काळात प्रथम रेडी येथे नेण्यात आली व तेथून ती येथे आली, अशी अख्यायिका प्रचलीत आहे. परंतु याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. पुरातत्त्व खात्याने या मूर्तीचे परीक्षण केले आहे, त्यानुसार गंडकी पाषाणातील ही मूर्ती सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असल्याचे त्यांनी सांगितले.
मडकई गावातील सातव्या वाडीत हे मंदिर स्थित आहे. गावापासून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर स्वागतकमान आहे. या कमानीपासून मंदिरापर्यंत येणारा रस्ता वळणदार व उताराचा आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती असलेल्या तटबंदीत मोठे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे सात पायऱ्या चढून प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन चौथरे आहेत. चौथऱ्यावर प्रत्येकी दोन नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांवरील सज्जावर मध्यभागी गजलक्ष्मी देवीची मूर्ती आहे. सज्जावर डाव्या व उजव्या बाजूला सिंह शिल्पे आहेत. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात तटबंदीला लागून भक्त निवास, भोजनालय, देवस्थानचे कार्यालय व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. प्रांगणात ग्रामपुरुष सभागृह आहे. येथे संस्कृतिक कार्यक्रम व विवाह सोहळे आयोजित केले जातात.
मंदिरासमोर पिरॅमिड संरचनेच्या तीन थरांच्या चौथऱ्यावर सात थरांची अष्टकोनी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या शीर्षभागी शिखर व कळस आहे. दीपमाळेच्या बाजूला दोन तुलसी वृंदावने आहेत. प्रांगणात गोड्या पाण्याची विहीरही आहे.
सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर पत्र्याचे छत असलेले रांगमंडप आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात प्रत्येकी सात गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ कक्षासनात आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभांवर वरच्या मजल्याचा सज्जा आहे. मधल्या रांगांतील स्तंभांच्या मध्यभागी असलेली जमीन काही इंच खोलगट असून हे कोकणी स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. स्तंभांवर कावी शैलीतील चित्रनक्षी रंगविलेली आहे. पुढे सुमारे तीन फूट उंच बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर चार पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांत द्वारपाल शिल्पे आहेत. मुख्य सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. अंतराळाचे प्रवेशद्वार मुख्य सभामंडपापेक्षा सुमारे एक फूट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत.
द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. अंतराळात गोलाकार स्तंभांच्या दोन रांगा आहेत व प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले आहेत. सर्व स्तंभ अष्टकोनी स्तंभपादावर उभे आहे. अंतराळात भिंतींवर गणदेवी, दामिनी शनी, यक्ष, पांडुरंग, देवाहुती कपिल, सूर्य, वरुणी-वरुण आदी देवी देवतांची उठाव शैलीतील शिल्पे आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंती चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या देवकोष्टकांत द्वारपाल शिल्पे व द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर नवदुर्गा देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूपातील शाळीग्राम पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीने महिषासुराच्या देहावर पाय ठेवला असून त्रिशूल व तलवारीने त्याच्यावर वार केलेला आहे. देवीच्या एका हातात पानपात्र आहे. देवी दुसऱ्या हाताने महिषासुराच्या देहातून देवदेह खेचून बाहेर काढीत आहे.
विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि चेहऱ्यावर सोन्याचा मुखवटा आहे. देवीचा वाहन असलेल्या सिंहाने महिषासुरावर हल्ला केलेला आहे.
मूर्तीवर असलेल्या सोन्याच्या मुखवट्याबाबत अख्यायिका अशी की मंदिरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर सोनारांच्या घरात देवीच्या नवसाने मुलीचा जन्म झाला होता. ती मुलगी दहा वर्षाची झाल्यावर मुलीच्या चेहऱ्याचा सोन्याचा मुखवटा तयार करून सोनाराने देवीस अर्पण केला. त्यानंतर मुलीचे देहावसान झाल्याने सोनारास फार दुःख झाले. तेव्हा वर्षातून एक दिवस तुझी मुलगी म्हणून आपण स्वतः तुझ्या घरी राहण्यास येऊ, असे देवीने सोनारास वचन दिले. त्यानुसार आजही वर्षातून एक दिवस देवीची मूर्ती या सोनाराच्या घरी नेली जाते.
देवीची मान कललेली असल्याबाबत अख्यायिका अशी की प्राचीन काळी देवीचा कर्नाटक राज्यातील एक भक्त गंभीर आजाराने ग्रासला असताना त्याने देवीस आरोग्य प्राप्तीसाठी हजार सोनचाफ्याची फुले वाहण्याचा नवस केला. तो देवीच्या दर्शनासाठी आला तेव्हा सोनचाफ्याचा बहर ओसरला असल्याने माळ्याकडे एकच फुल मिळाले. त्याने हजार फुलांचे मोल देऊन माळ्याकडून एक फुल विकत घेतले व देवीस अर्पण केले.
परंतु आपण नवस पूर्ण करू शकलो नाही, याची खंत त्याच्या मनाला वाटू लागल्याने त्याने अन्न-पाण्याचा त्याग करून देवीसमोर बैठक मारली. जोवर देवी स्वतः आपला नवस पूर्ण झाला, असे सांगत नाही तोवर जागेवरून उठायचे नाही असा त्याने प्रण केला. तेव्हा त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने तुझा नवस पूर्ण झाला आहे, या अर्थाने मान वळवली. तेव्हापासून देवीची मान वाकडी असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या मुख्य सभामंडपावर अष्टकोनी कौलारू शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. अंतराळाच्या दोन्ही बाजूने उतरत्या असलेल्या छतावर मागे व पुढे असे दोन कळस आहेत. दोन्ही मुखमंडपाच्या छतावर चौकोनी व वर निमुळते होत गेलेली शिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील थर अष्टकोनी आणि वरील थर गोल घुमटाकार आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.
शारदीय नवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. परंतू येथे घटस्थापना केली जात नाही हे येथील वैशिष्ट्य आहे. नवरात्रोत्सवात नवचंडी यज्ञ, होमहवन व नवमीच्या दिवशी नऊ केळ्याच्या गाभ्यांची पूजा केली जाते. नऊ दिवस वेगवेगळ्या वाहनावर आरुढ देवीची मखर पूजा बांधली जाते. याच दिवशी देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. पहाटे उगवत्या सूर्याच्या किरणांचा देवीस अभिषेक करून नवरात्री उत्सवाची सांगता केली जाते. कार्तिक कृष्ण अष्टमी या दिवशी देवीची मूर्ती सोनाराच्या घरी माहेरास नेली जाते. तेथून पालखीत बसून वाजत गाजत देवी माघारी फिरते व पुन्हा मंदिरात स्थापना होते. दुसऱ्या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवीसमोर अंतराळात अठ्ठावीस भल्या मोठ्या पानांत भात, वडे, भाजी, भाकरी व वरण वाढून देवीस अर्पण केले जाते. यास ‘उफान’ म्हणतात.
कार्तिक कृष्ण नवमीस देवीचा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवी रथात बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. सर्व गावकरी मिळून रथ ओढतात. रथोत्सवाने देवीच्या जत्रोत्सवाची सांगता होते. नवरात्रोत्सव व जत्रोत्सवात परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मंदिरात येतात. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव या मंदिरात साजरे केले जातात.