
अलिबाग तालुक्यातील सध्याचे महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन असलेले नागाव हे पूर्वी ‘नागग्राम’ किंवा ‘नागुम’ म्हणून प्रसिद्ध होते. कोकणात प्राचीन काळी नागवंशीय लोक मोठ्या प्रमाणावर राहात असत. कोंकण हे नावही येथील नागांच्या एका पराक्रमी कुळाच्या नावावरून पडलेले आहे. त्याची स्मृती म्हणून अनेक ठिकाणी नागांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा केली जाते. नागाव हे त्यापैकीच एक गाव. येथे नागांचे मंदिर आहे व त्यात नागांच्या दगडी प्रतिमा आहेत. या नऊनाग मंदिरामुळे या गावाची ओळख नागाव अशी झाल्याचे सांगितले जाते.
पुरातनकाळी पातालात किंवा रसातलात नागलोक राहात, अशी समजूत होती. महीतल हा याचाच एक भाग. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कोंकण व नागलोक’ या संकीर्ण निबंधात (राजवाडे लेखसंग्रह, भाग २, पा. २२९–२३५) असे म्हटले आहे की महीतलाच्या प्रदेशाला किंवा प्रदेशाच्या काही भागाला पुढे अपरान्तक असे नाव पडले. नागांची नाना कुळे होती. वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालीय, कुकुण ही त्यातीलच काही. कुळांच्या या संस्कृत नावावरून पुढे मराठीत आडनावे आली. वासुकीवरून वासे, भासे, तक्षकवरून तखे, तिखे, कर्कोटकवरून कोकटे, गोकटे, कालीयवरून काळियै, काळ्ये, काळे, तसेच कुकुणवरून कोंकणे अशी नावे पडली. यातीलच कुकुण या नागकुलातील एका पराक्रमी व्यक्तीवरून कोंकण हे नाव पडले.
नागकुळांचा मूळ राहण्याचा प्रदेश नागलोक ऊर्फ महीतल ऊर्फ अपरान्त ऊर्फ कोंकण होते व तेथून ते चोहींकडे पसरले. काही काळ अन्य लोकांशी नागलोकांचा मोठा संघर्ष झाला. मात्र महाभारतात अर्जुनाचा विवाह ऊलूपी या नागकन्येशी झाला होता. त्यावरून नागवंशीय लोकांशी अन्य लोकांचे चांगले संबंध होते असे दिसते. नागाव, पाल, नागोठणे, तळे वगैरे प्रदेशात गोवर्धंब्राह्मण अद्यापही आढळतात. ते नागांच्या पातालात राहात असलेल्या गोव्रत नामक ब्रह्मर्षीचे वंशज असावेत, असेही इतिहासचार्य राजवाडे यांनी म्हटलेले आहे. या नागावमध्ये नागवंशाच्या प्राचीन खुणा आजही अस्तित्वात आहेत. नऊ नागांचे मंदिर ही त्यातील प्रमुख खूण आहे. ते नागावचे मूळ दैवत असल्याचे सांगण्यात येते. येथे नागेश्वर मंदिरही आहे.
मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या परिसरास प्राचीन काळी रायगडमधील अष्टागरांचा परिसर म्हणून ओळखले जाई. नागाव हे या अष्टागरांतील एक महत्त्वाचे व इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे गाव आहे. पोर्तुगीज प्रवाशी डिकॅस्ट्रो याच्या १५३८ मधील प्रवासवर्णनात नागावचा उल्लेख येतो. त्यानुसार पूर्वी हा भाग मुख्य भूमीपासून समुद्रात ‘गनशॉटच्या’ अंतरावर म्हणजे तत्कालीन तोफेचा गोळा जाऊन पडेल एवढ्या अंतरावर होता. ते एक लांबच लांब व अरुंद असे बेट होते. या परिसरात पूर्वी अनेक बेटे होती. लोकसंख्येत झालेल्या वाढीमुळे यांमधील असलेल्या खाड्या भराव घालून बुजविण्यात आल्या व हे बेट मूळ जमिनीला जोडले गेले. या गावात फिरताना येथील शिलालेख, मंदिरे व मोठमोठे वृक्ष त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. आज नागाव हे एक समुद्रकिनाऱ्यावरील नारळी–पोफळीच्या बागांमध्ये वसलेले टुमदार गाव म्हणून पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या परिसरातील काही शिलालेखांचे वाचन केले आहे. त्यानुसार भीमेश्वर मंदिराजवळ सापडलेला शिलालेख हा इ.स. १३६७ मधील आहे. देवनागरी लिपीतील या शिलालेखातील मजकुरानुसार त्या वेळी ठाणे येथील चक्रवतीं हंबीरराव यांचा या भूप्रदेशावर अंमल होता. याच राजवटीत हे गाव भरभराटीला आले असावे, असाही निष्कर्ष काढला जातो. इ.स. १६०४ ते १६३० या काळात हा परिसर मलिक अंबरच्या ताब्यात होता. त्यानंतर आदिलशाही, निजामशाही व मोगलांचा या परिसरावर वेळोवेळी अंमल होता. इ.स. १६७७ मध्ये शिवाजी महाराजांचा येथे अंमल होता. त्यापुढे आंग्रे यांच्या काळात पोर्तुगीज राजवटीला जोरदार हादरे बसले व ते येथून निघून गेले. नागाव हे खांदेरी, उंदेरी व पद्मदुर्गपासून जवळ असल्याने इंग्रजांनी हा परिसर ताब्यात घ्यायचा अनेकदा प्रयत्न केला. त्यासाठी शिवाजी महाराजांनी येथे तटबंदी उभारून तो सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मराठे सरदार मायनाक भंडारी आणि दर्यासारंग दौलतखान यांनी वेळोवेळी आपल्या पराक्रमाने इंग्रजी आरमाराला उधळून लावले होते.
अलिबागपासून सात किमी अंतरावर असलेल्या नागाव येथील नऊनाग देवस्थान हे पंचक्रोशीतील जागृत स्थान मानले जाते. नारळी–पोफळीच्या बागांमध्ये सर्वसामान्य मंदिराप्रमाणे भासणाऱ्या या स्थानावर कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. येथे आहेत केवळ दगडात कोरलेल्या नऊ नागांच्या प्रतिमा. नऊनाग मंदिर असे नाव असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे नागांच्या दहा प्रतिमा आहेत. यातील एक प्रतिमा रक्षकाची आहे. या प्रतिमा किती प्राचीन आहेत, याबद्दल ठोस माहिती नसली तरी त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. येथील जमिनीच्या खोदकामात या प्रतिमा सापडल्या. अनेक वर्षे त्या तेथेच ठेऊन त्यांची पूजा केली जात होती. २०१० मध्ये या प्रतिमांची स्थापना एका चौथऱ्यावर करण्यात आली आणि या जागेला मंदिराचे स्वरूप आले. आजही या मंदिराला भिंती नाहीत. केवळ भाविकांची सोय व्हावी, यासाठी येथे पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी नवनाथ स्वामी प्रवास करता करता या ठिकाणी आले होते. हा परिसर आवडल्यामुळे त्यांनी येथेच राहणे पसंत केले. त्यांनी आपले मूळ रूप त्यागून नागरूप धारण केले व पुढे पाषाण रूपात ते येथे राहिले. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी, तसेच नागपंचमीला भाविकांची या ठिकाणी गर्दी होते. या नऊनाग देवस्थानचे व्रत गुरुवारी किंवा सोमवारी सुरू करून पुढे तीन महिने केल्यास दुःख–दारिद्र्य नाहीसे होते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.
हे देवस्थान नवसाला पावणारे आहे, अशी मान्यता आहे. येथे नवसपूर्ती म्हणून घंटा बांधल्या जातात. त्याबाबत अशी कथा सांगितली जाते की या मंदिरात पूर्वी एक घंटा बांधलेली होती. पाच मुली असलेल्या महिलेला मुलगा नसल्यामुळे तिचा सासरी छळ होत होता. म्हणून तिने नवस केला की मुलगा झाला तर येथे घंटाघाट बांधेन. त्याप्रमाणे तिला पुत्रप्राप्ती झाली; परंतु बोललेला नवस ती विसरली. यासाठी नागदेवतेने तिला स्वप्नदृष्टांत देऊन केलेल्या नवसाची आठवण दिली. आपल्याकडून झालेली चूक मान्य करून तिने त्वरित येथे घंटाघाट बांधला. त्यानंतर आता या घंटाघाटावर शेकडो भाविकांनी नवसपूर्तीनंतर घंटा अर्पण केलेल्या आहेत.