सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लासूर या ऐतिहासिक गावापासून काही अंतरावर महाराष्ट्रातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक असलेले नाटेश्वर महादेवाचे मंदिर वसले आहे. या मंदिरानजीक अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. स्थान माहात्म्य कथेनुसार येथील नाटेश्वराच्या लिंगाची प्रतिष्ठापना साक्षात अगस्ती ऋषींनी केली आहे. त्यानंतर बाराव्या शतकात येथे मंदिराची उभारणी करण्यात आली असावी. येथील नाटेश्वर महादेवाला केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक आख्यायिकेनुसार, अगस्ती वा अगस्त्य हे गोत्रप्रवर्तक व सूक्तद्रष्टा ऋषी आहेत. ते वसिष्ठ ऋषींचे बंधु होत. समुद्रात लपलेल्या कालकेय दैत्याच्या नाशासाठी त्यांनी समुद्रप्राशन केले होते. त्याच प्रमाणे गर्वाने उंच उंच वाढत चाललेल्या विंध्य पर्वताला नमवून त्यांनी उत्तर-दक्षिण दळणवळण सुरू केले होते. लोपामुद्रा हे त्यांच्या पत्नीचे नाव. ऋग्वेदाच्या पहिल्या अध्यायातील १७९वे सूक्त हे अगस्ती-लोपामुद्रा संवादाचे आहे. या सूक्ताची देवता रती आहे. लोपामुद्रा अगस्तींकडून शक्तिशाली पुत्राची इच्छा व्यक्त करते, असा हा संवाद आहे. या दोघांना दृढस्यू नामक पुत्र होता.
अगस्तींनी अगस्त्यगीता, अगस्त्यसंहिता, शिवसंहिता या ग्रंथांची रचना केली होती. स्थानिक आख्यायिकेनुसार लासूर ही अगस्तींची तपोभूमी होती.
अगस्ती हे शंकराची आराधना करीत असत. त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना करून त्यास नाटेश्वर हे नाव दिले. देशात अगस्तींचे समाधीस्थान अनेक ठिकाणी दाखवण्यात येते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, लासूर येथे सध्याच्या मंदिर परिसरात त्यांनी समाधी घेतली. या ठिकाणी त्यांचे छोटे समाधी मंदिर आहे. नाटेश्वर मंदिराच्या स्थापनेचा नेमका काळ अज्ञात आहे. मात्र त्याबाबत असा इतिहास सांगण्यात येतो की राष्ट्रकूट साम्राज्याच्या पतनानंतर जळगावमध्ये छोटी छोटी राजघराणी निर्माण झाली. ही घराणी देवगिरीच्या यादवांची मांडलिक असत. यातीलच एक राजा जीवपाल याचा पुत्र गोपालचंद याने इ.स. ११४६च्या सुमारास नाटेश्वराचे हे मंदिर उभारले. असे सांगितले जाते की राजा जीवपाल हा मराठा वा वाणी समाजाचा असावा. मंदिर परिसरात अलीकडच्या काळात बांधलेली सिमेंट-काँक्रिटची मोठी वेस आहे. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजव्या बाजूस पत्र्याची मोठी शेड बांधलेली आहे. या ठिकाणी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात. येथून पुढे ओढ्यावरचा छोटा पूल ओलांडून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येता येते. हे मंदिर उंचावर बांधलेले आहे व चहूबाजूंनी त्यास संरक्षक भिंत आहे.
मंदिरासमोर डावीकडे मोठा दीपस्तंभ आहे. त्यालगत ओट्यावर प्राचीन शिवपिंडी व नंदीमूर्ती ठेवलेल्या आहेत. नाटेश्वराचे मंदिर उंच जगतीवर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी संरचना असलेले हे मंदिर पूर्णतः दगडांत उभारण्यात आलेले आहे. सभामंडपातील कातीव दगडीखांब, त्यावरील कोरीव तरंगहस्त यावरून या मंदिराचे प्राचीनत्व लक्षात येते. येथील तरंगहस्तांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांवर शुक आणि नागांची शिल्पे कोरलेली आहे. सभामंडपातील भिंती, त्यातील देवळ्या, गर्भगहाचे प्रवेशद्वार, मंदिराच्या बाह्यभिंती हे सारे अनलंकृत व साधे आहेत.
सभामंडपात नंदीची मूर्ती व त्यापुढे कूर्मशिल्प आहे. गर्भगृहात भूतलावर मोठी शिवपिंडी आहे.
या पिंडीच्या शाळुंकेस सोनेरी पत्र्याचे आवरण आहे. शिवलिंगाभोवती पंचधातूमध्ये घडविण्यात आलेल्या नागराजाचे वेटोळे आहे. त्यावर तांब्याचे जलाभिषेक पात्र आहे. मागच्या देवळीत पार्वती व गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहावर उंच पाच स्तरीय शिखर आहे. खालील चौकोनी स्तराभोवती चार छोटी शिखरे आहेत. मधल्या भागात शंकराची नीलवर्णी मूर्ती व तिच्या दोन्ही बाजूंस नंदीच्या मूर्ती आहेत. शिखरावर मोठा मोदकाच्या आकाराचा आमलक असून व त्यावर उंच कळस आहे.
मंदिरासमोर एक विहिर आहे, तिचा आकार चौकोनी आहे. या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, असे सांगण्यात येते. या विहिरीनजीक उंच चौथऱ्यावर तुळशीवृंदावन आहे. त्याच्या मागच्या भागात चारही बाजूंनी उतरते छप्पर असलेले छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरी पाषाणांत बांधलेली समाधी आहे. ही अगस्तीऋषींची समाधी असल्याचे सांगण्यात येते.
नाटेश्वर मंदिरात पूर्वीपासून लग्न, बारसे असे कार्यक्रम होत आले आहेत. ती परंपराही अजून सुरू आहे. त्याकरीता मंदिर आवारात एक स्वतंत्र स्वयंपाकघर व भोजनालय बांधलेले आहे. एकावेळी २०० लोक जेवायला बसू शकतील, अशी सोय तेथे आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस काही अंतरावर पायऱ्या असलेल्या दोन स्वतंत्र विहिरी आहेत. सासु-सूनेची विहीर या नावाने त्या ओळखल्या जातात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे नोंद असलेल्या या मंदिर परिसराचा विकास शासनातर्फे करण्यात येत आहे. येथे लहान मुलांसाठी बाग तयार करण्यात आली आहे. हे मंदिर गावापासून दूरवर असले, तरी येथे दर सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी दर्शनार्थींची मोठी गर्दी असते. मंदिरात महाशिवरात्री आणि अन्य हिंदू सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.