देशभरातील शनी महाराजांच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीरामांनी स्थापन केलेल्या साडेतीन पीठांमध्येही नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. नस्तनपूरचे हे स्थान हजारो वर्षें जुने असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात स्त्रियांनाही दर्शनासाठी प्रवेश आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. पंचवटीत सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण हे मनमाडजवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात (सध्याच्या अनकाई किल्ल्यावर) पोहोचले. तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता श्रीरामांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की, ‘तुम्हास साडेसाती आहे, तीचे निवारण व रावणावर मात करण्यासाठी शनिदेवाची आराधना करावी लागेल.यासाठी शनिदेवाच्या साडेतीन शक्तिपीठांची स्थापना करावी.’ अगस्ती ऋषींच्या आश्रमातून श्रीराम व लक्ष्मण पुढील प्रवासासाठी निघाले असताना सायंकाळी तत्कालीन नशरतपूर म्हणजेच आताचे नस्तनपूर येथे पोहोचले.
पुढे घनदाट जंगल असल्यामुळे ते रात्रीच्या मुक्कामासाठी तेथेच थांबले. श्रीराम व लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. सायंसंध्येची वेळ झाल्याने श्रीराम संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना त्यांच्या हातात सूर्याने सध्या नस्तनपूर क्षेत्री स्थापित असलेली शनिदेवाची मूर्ती दिली. श्रीरामांनी या मूर्तीचे पूजन करून याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना केली व विधिवत पूजा केली. यावेळी आकाशातून सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली होती. सकाळी पूजा-अर्चा करून श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले. पुराणांतील व ऐतिहासिक नोंदींनुसार या तीर्थक्षेत्री राजा नल व दमयंती, राधा-कृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरू, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदी दर्शनासाठी आले होते. प्रसिद्ध ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते यांच्या ‘शनि-मारुती उपासना’ पुस्तकातील माहितीनुसार, ज्यांना साडेसातीचा त्रास होतो त्यांनी नस्तनपूर येथे शनीच्या या जागृत स्थानावर पूजा व उपासना केल्यास साडेसातीचा त्रास दूर होतो व शनीची पिडा नाहीशी होते. राज ज्योतिषी भास्कराचार्य यांना भ्रम झाला होता तेव्हा त्यांच्या कन्येने त्यांना या ठिकाणी आणून शनीची सेवा केली होती.
न त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी भास्कराचार्यांना बरे केले होते. ‘लिलावती’ नावाचा ज्योतिष शास्त्रावरील महान ग्रंथही या ठिकाणी सिद्ध झाला आहे.
स्तनपूर येथील पूर्वीचे शनिदेवाचे मंदिर साधे होते. समोर पत्र्याचे मोठे सभागृह होते. तेथे आता नवीन अद्ययावत मंदिर बांधण्यात आले आहे. नवीन जीर्णोद्धार झालेले शनी मंदिर हे पूर्वमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे. शनी मंदिरासमोर गणेश व हनुमानाची छोटेखानी मंदिरे आहेत. शनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त सभागृह लागते. सभागृहाच्या पुढे गर्भगृहात शनिदेवाची वालुकामय रत्नजडित मूर्ती आहे. असे म्हणतात की श्रीरामांनी स्थापन केलेल्या जागीच ही मूर्ती आताही आहे. मूर्तीस सकाळी पूजेसाठी हात लावल्यास हातास वाळू लागते. उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड असलेली देशातील ही एकमेव शनिमूर्ती आहे. मूर्तीची उंची ३५ इंच, तर रुंदी २८ इंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून तीन हातांमध्ये आयुधे व चौथा हात आशीर्वाद देतानाचा आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्यकिरणांचा मुकुट आहे. शनी महाराज कोकीळ या पक्ष्यावर मांडी घालून बसलेले आहेत. मूर्तीच्या समोर रजत पादुका असून त्या पादुकांचे भाविकांकडून दर्शन घेतले जाते. शनिवारी व अमावस्येच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी शनी महाराजांच्या मूर्तीला आरास व सजावट केली जाते.
शनि अमावस्या हा दिवस (शनिवारच्या दिवशी येणारी अमावस्या) येथील मंदिरात शनी महाराजांची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदेवांची भव्य मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक यावेळी उपस्थित असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप येते. शनी अमावस्येव्यतिरिक्त सर्व शनिवारी शनी महाराजांची पूजा करणे अनुकूल मानले जाते.
देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर निवास व्यवस्था, बालोद्यान आदी सोयी-सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शनी मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे भाविकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतात. शनीची पिडा दूर होण्यासाठी शेकडो भाविक दररोज येथील शनी मंदिराला भेट देऊन उपासना करतात. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या मंदिरात शनी महाराजांचे दर्शन घेता येते.