नरसिंह मंदिर

नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणे


भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंहाची राज्यात मोजकीच मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे स्थान इंदापूरजवळील नीरा-भीमा नदीच्या पवित्र संगमावर नीरा नरसिंहपूर येथे आहे. तब्बल १४०० वर्षे प्राचीन असलेल्या या क्षेत्राला दक्षिणेतील प्रयाग, असेही म्हटले जाते. या पवित्र संगमावर भक्त प्रल्हाद यांनी आपले आराध्यदैवत नरसिंह यांची मानवी शरीर आणि सिंहाचे डोके असलेली उग्र, शक्तिशाली रूपामधील मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते. पुण्याहून नरसिंहपूर १७५ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक मानले जाते. नीरा नरसिंहपूर क्षेत्राचा आकारही सिंहाच्या नखासारखाच आहे. मंदिराच्या एका बाजूने नीरा; तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी वाहते. मंदिरासमोर दोन्ही नद्यांचा संगम होतो. हे ठिकाण पृथ्वीचे नाभिस्थान असल्याचीही मान्यता आहे. या मंदिरात प्रतिष्ठापित असलेला नरसिंह महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व तेलंगणातील अनेक भाविकांचा कुलस्वामी आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की, हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हादाला नारदांनी नीरा-भीमा संगमावर ‘ओम नमो नारायण’ असा मंत्र देत विविध विषयांचे ज्ञान दिले. त्यानंतर भक्त प्रल्हाद नित्यनेमाने नीरा व भीमा यांच्या संगमतीरावर जाऊन तप करीत असे. तेथे त्यांनी वाळूतील नरसिंह मूर्ती तयार करून, तिची मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली होती. या भक्तीवर प्रसन्न होत विष्णूने मूर्तीमध्ये येऊन श्री नरसिंहरूपात दर्शन देऊन, त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर प्रल्हाद यांनी येथेच नरसिंह यांचे मंदिर उभारले.

दुसऱ्या एका कथेनुसार प्रभू श्रीराम यांनी अहंकारी रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून जी यात्रा सुरू केली, त्या यात्रेची सुरुवात नीरा-नरसिंहपूर येथून केली होती. महर्षी व्यास यांनीही काही काळासाठी येथे मुक्काम केला होता. समर्थ रामदास यांनी दोन वेळा नीरा नरसिंहपूर येथे भेट दिली होती. संत तुकाराम, संत नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे सांगितली आहे. संत तुकाराम यांनी या ठिकाणाचा उल्लेख त्रिवेणी संगम, असा केल्याचा उल्लेख आढळतो.

नरसिंह मंदिराची रचना भव्य-दिव्य अशी आहे. नदीच्या घाटाकडून मंदिरात जाताना समोरील दगडात कोरलेले महाद्वार आणि बुरुजांमुळे एखाद्या किल्ल्यात जात असल्याचा भास होतो. घाटाच्या पायऱ्यांवर दगडांतून घडवलेल्या हत्ती व सिंह यांच्या जोड्या लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या चारही बाजूंनी भक्कम दगडी तटबंदी आहे.

मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. वेगवेगळ्या काळात या मंदिरात सुधारणा होत गेल्यामुळे दगडी आणि लाकडी रचनेचा संगम येथे दिसतो. या दोन्हीतील कोरीव काम अप्रतिम आहे. सभामंडप आणि गर्भगृह यांचे बांधकाम दगडी आहे. सभामंडपाच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूंना दगडामध्ये कोरलेले दोन सुंदर हत्ती आहेत. दगडी खांबावर सुबक कलाकुसर आहे. पितळी दरवाजापुढे लाकडी मंडप असून, त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. मंडपाच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. पितळी दरवाजांवरही नक्षीकाम आहे. सभामंडपातील झुंबर मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

गर्भगृहात पश्चिमाभिमुख वाळूची उग्र नरसिंह मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे. वीरासनातील ही मूर्ती उजवा पाय गुडघ्यात दुमडून बसली आहे. सिंहासारखे रुंद व उग्र मुख आणि भव्य डोळे असलेल्या या मूर्तीचे हात-पाय मानवी वाटतात. गाभाऱ्यातच शेजारी आणखी एक काळ्या पाषाणाची मूर्ती आहे; जिला शामराज असे म्हटले जाते. ही मूर्ती नरसिंहाचे शांत रूप मानली जाते. श्री नरसिंहासमोर लाकडी सभामंडपात असलेल्या भक्त प्रल्हादाच्या मंदिरात हात जोडून उभी असलेली त्याची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस भीमाशंकराचे छोटेसे देऊळ आहे आणि भीमाशंकराच्या उजव्या बाजूला छोट्या देवळात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. काशी विश्वेश्वर, काळा दत्त, मुहूर्त गणपती, काळभैरव, रामेश्वर यांची मंदिरेही येथे आहेत. प्रल्हाद मंदिराच्या मागे प्रचंड मोठी घंटा दिसते.

शेजघर हे रंगशिळेच्या गाभाऱ्यात आहे आणि तेथे दोन पलंग आहेत. त्यातील एक पलंग श्री नरसिंहाचा; तर दुसरा शामराजासाठी आहे. पलंगावर गाद्या, उशा व श्रींची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. नरसिंहाच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. या मंदिराचे शिखर दगडी आहे. शिखराच्या दोन दगडांतून दिवस-रात्र पाणी झिरपत असते. हा लहानसा पाझर गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो. मंदिरामध्ये एक गरुडमूर्तीही आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, शांत व निर्मळ आहे.

या मंदिराला चौदाशेहून जास्त वर्षांचा इतिहास आहे. अनेक राजे, पेशवे यांच्यासाठी ते मानाचे धार्मिक स्थान होते. त्यामुळेच या स्थानाचा प्रत्येक शतकात विकास होत गेला. येथील घाट १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला. त्या घाटाचे बांधकामही सतत तीन वर्षे चालू असल्याच्या नोंदी आहेत. १७८७ साली रघुनाथ राव विंचूरकर यांनी देवालयाचा जीर्णोद्धार केला असल्याचा शिलालेख मंदिरात दिसतो. मात्र, या मंदिराचा सर्वाधिक विकास रघुनाथराव पेशवे यांच्या काळात झाल्याचे सांगण्यात येते.

नरसिंह मंदिरात रोज पहाटे ५ वाजता काकड आरती होते. त्यावेळी खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी ७ वाजता प्रातःपूजा केली जाते. दुपारी १२ वाजता माध्यान्ह पूजा करून पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविला जातो. रात्री ९ वाजता शेजारती केली जाते. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर सण-उत्सव साजरे केले जातात. वैशाख नवरात्र महोत्सव हा येथील सर्वांत मोठा उत्सव; जो १० दिवस चालतो. तेव्हा हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यावेळी श्रींच्या पादुका पालखीत ठेवून सवाद्य मिरवणूक काढली जाते.

उपयुक्त माहिती:

  • टेंभुर्णीपासून २०; तर पुण्यापासून १७५ किमी अंतरावर
  • नीरा नरसिंहपूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्था
  • मंदिरात दुपारी महाप्रसादाचे वाटप, तसेच परिसरात निवासाची सुविधा
Back To Home