पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ऐतिहासिक व निसर्गसमृद्ध नारायणपूर गावात प्राचीनतेची साक्ष देणारे नारायणेश्वर महादेव मंदिर आहे. यादवकालीन असणाऱ्या हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे बांधकाम दगडांचे आहे. मंदिराच्या खांबांवर यादव काळातील शिलालेखही आहेत. येथील गाभाऱ्यात शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांनी दिलेली सोन्याची शिवपिंडी आहे.
सासवडपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या नारायणपूरमधील या मंदिराच्या आवारातही हेमाडपंथी रचनेचे अनेक पुरावे सापडतात. मंदिराचा परिसर मोठा आहे आणि त्याभोवती तटबंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात औदुंबराचा एक जुना वृक्ष; तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे आणि तेथेच मारुतीची मूर्तीही आहे. त्यात मारुती राक्षसिणीचा वध करतोय, असे दिसते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नंदीमंडपाची काही अंशी पडझड झाली आहे. तेथे नंदीची सुंदर मूर्ती आहे आणि त्यावरील कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिराच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम आहे. त्यामध्ये गणेश प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या मुखमंडपात चार खांब आहेत. या खांबांच्या वरील बाजूस भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. संपूर्ण मंदिरात कलाकुसर केलेले २० दगडी खांब आहेत. प्रवेशद्वारासमोर आतील बाजूला जमिनीवर एक मोठे दगडी कासव कोरलेले आहे. सभामंडपात धातूचा नंदी आहे. मंदिराचे मुख्य द्वार आणि गर्भगृहाचे द्वार यावर कोरीव काम केलेले आहे. त्याशिवाय सभामंडपामध्ये ‘चांगा वटेश्वर’, ‘चांगा वटेश्वराचा श्रीधर योगी’ व ‘अंचाल ध्वज’ असे कोरलेले तीन शिलालेख आहेत. चांगदेव महाराज आणि त्यांच्या शिष्यांनी याच मंदिरात तपश्चर्या केली होती, असे सांगितले जाते.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींतील फरक लगेच जाणवत नाही. परंतु, त्या मूर्ती म्हणजे शंकराचे गण समजले जातात. एक देव गण; तर दुसरा राक्षस गण. त्यातील ज्या मूर्तीचे सुळे बाहेर आले आहेत तो राक्षस गण व दुसरा देव गण.
या मंदिराचे वेगळेपण हे गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर लक्षात येते. येथील शिवपिंडीच्या जागेवर एक मोठा गोलाकार खड्डा आहे आणि त्यावर काचेचे आवरण आहे. या खड्ड्यात ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक असलेली त्रिपिंड म्हणजे गुप्त शिवलिंग आहे. या पिंडीखालून सतत पाणी वाहत असते. विशेष म्हणजे या पाण्याची पातळी वर्षातील बाराही महिने सारखीच असते. ती कमी-जास्त होत नाही. वरून कितीही पाणी ओतले तरीही ही पातळी कायम राहते. हे पाणी कोठून येते व कोठे जाते हे गूढ आहे.
मंदिराच्या भिंतींवर आणि कळसापर्यंत विविध नर्तिका व अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराबाबतच्या ऐतिहासिक माहितीनुसार तेथे पूर्वी विष्णू मंदिर होते; जे नामशेष झाले आहे. येथील विष्णूची हरिहर रूपातील भव्य मूर्ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय विष्णूच्या आणखी काही मूर्ती मंदिराच्या मागे कोरलेल्या दिसतात. महाशिवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या दिवशी होणाऱ्या जत्रेत परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. त्याशिवाय श्रावणी सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते.