नरसिंह मंदिर,

रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे


आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडे हिरवाईने नटलेले रांजणी गाव आहे. या गावातच पेशवेकालीन श्री नरसिंहाचे जागृत मंदिर आहे. नारायणगावापासून वाहत आलेल्या मीना नदीने या गावाला कवेत घेतले आहे. तिच्याच काठावर या नरसिंह मंदिराचा चैतन्यमय अधिवास आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अशी, की लखुजी नावाचे नरसिंहभक्त रांजणी गावाहून दरवर्षी वैशाखात इंदापूर येथील नीरा नरसिंहपूर या मंदिरात जात असत. नरसिंहदेवाची सेवा करता करताच आपले आयुष्य व्यतीत व्हावे, हीच त्यांची धारणा होती; पण वयोमानाने चालत वारी करणे त्यांना कठीण जाऊ लागले. त्यामुळे इथून पुढे माझ्या हातून नरसिंह भगवंताची सेवा घडू शकणार नाही, याची त्यांना खंत वाटू लागली. एकदा वैशाखात नीरा नरसिंहपूर मंदिरात असतानाच लखुजींना दृष्टांत मिळाला. ते झोपेत असताना विजांचा लखलखाट झाला. त्यांचे शरीर तेजोमय झाले आणि प्रत्यक्ष नरसिंह भगवंत त्यांच्याशी बोलत होते. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सहवासात मी राहीन. तुझ्याबरोबरच मी तुझ्या गावी येणार आहे. जिथे नदी पूर्व वाहिनी असेल तिथे पाण्यात जळक्या पेंढीजवळ मी तुला दिसेन. दुसऱ्या दिवशी वार्धक्याने थकलेल्या लखुजीच्या अंगात दैवी शक्ती संचारली आणि ते वेगाने गावाकडे चालू लागले. रात्रभर प्रवास करून पहाटे ते रांजणीला मीना नदीच्या काठी गेले. तेथे काही गावकरी स्नानासाठी आले होते. माझा भगवंत येथे पाण्यात आहे, असे सांगून त्यांनी जळत्या पेंढ्याजवळ उडी घेतली आणि त्यांना तेथे श्री भगवान नरसिंहाची मूर्ती मिळाली. मोठ्या भक्तिभावाने तिची प्राणप्रतिष्ठापना करून लखुजींनी तहहयात भगवंताची सेवा केली.

श्री नरसिंह मंदिराची अंतर्गत रचना पेशवे काळातील वाड्यासारखी आहे. मुख्य सभागृहात लाकडी खांब आहेत; तेथे असलेल्या एका पोटमाळासदृश्य जागेत नगारावादन होते. गर्भगृहात नरसिंहाची रेखीव मूर्ती आहे. जी पुढचे दोन पाय टेकवून जणू भक्तांना आशीर्वाद देत आहे, असे वाटते. दगडी आयाळ, लांब टोकदार दात, लोंबणारी जीभ अशा रूपात असलेली मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. मूर्तीचे डोळे व नाक यांवर सोन्याचा पत्रा आहे; तर भुवयांवर चांदीचा पत्रा मढवलेला आहे. त्यामुळे मूर्ती अधिक तेजस्वी दिसते. मूर्तीच्या मागील बाजूस महिरप आहे आणि त्यावर सुंदर कोरीव काम केलेले मोर आहेत. मध्यभागी नागाची प्रतिकृती आहे आणि तिथेच कोरलेला सिंहही दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला श्री हनुमानाचे सुंदर मंदिर; तर डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या परिसरात असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे. एक अख्यायिका अशी, पहिले बाजीराव पेशवे निजामाच्या स्वारीवर निघाले होते तेव्हा त्यांनी वाटेत या नरसिंहदेवाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी नवस केला होता की मला यश मिळू दे; मी मंदिराचा जीर्णोद्धार करीन. पुढे बाजीराव यशस्वी झाले; पण स्वतः येऊन ते नवस फेडू शकले नाहीत. मग नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून बाजीरावांचा नवस पूर्ण केला. असे सांगितले जाते की, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी या मंदिरात दोन दिवस व दोन रात्री गुप्त मुक्काम केला होता. १८५७ च्या उठावातील लढवय्ये तात्या टोपे यांनीही या मंदिरात नरसिंह भगवंताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता.

मंदिराची मूळची हेमाडपंथी रचना न बदलता, तीन कोटींचा खर्च करून ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा कारभार श्री नरसिंह मंदिर ट्र्स्ट सांभाळते. मंदिरात वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह जन्मोत्सव साजरा होतो. नरसिंहाची नवरात्री असा नऊ दिवसांचा सोहळा असतो. या दिवसांत भजन, कीर्तन, प्रवचनांनी मंदिर परिसर भारलेला असतो. दररोज सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांना देवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • जुन्नरपासून २९ किमी; तर पुण्यापासून ८० किमी अंतरावर
  • जुन्नर व मंचरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था
  • मंदिर परिसरात भक्त निवासाची सुविधा
Back To Home