इंदापूर तालुक्यात नीरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या निरवांगी गावात नंदिकेश्वर महादेवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. दाट वनराईत असलेल्या या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील भलीमोठी नंदीची मूर्ती. याच नंदीवरून हे स्थान नंदिकेश्वर म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे भरणाऱ्या यात्रेवेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
महादेवाचे वाहन असलेला नंदी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक समजले जाते. शिव दरबाराचा द्वारपाल समजला जाणारा हा नंदी महादेवाच्या खास गणांपैकी एक आहे. महादेवाने नंदीला वर दिला होता की ध्यानमग्न असताना एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचेल. त्यानुसार महादेव जेव्हा जेव्हा ध्यानमग्न असत तेव्हा पार्वती नंदीच्या कानात निरोप देत असे. म्हणून आजही अनेक भाविक आपल्या इच्छा महादेवाच्या पिंडीसमोर बोलण्याऐवजी नंदीच्या कानात सांगतात. नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना आवर्जून नंदीची पुजा केली जाते.
नंदीकेश्वर मंदिराची अख्यायिका अशी की निरवांगी गावाजवळ शंभू महादेवाचे मूळ स्थान होते. या परिसरात असलेली हिरवाई व मळे यामुळे शंभू महादेवाचे वाहन असलेल्या नंदीलाही हा परिसर आवडत असे. अनेकदा येथील मळ्यांमध्ये हा नंदी चरण्यासाठी शिरत असे. नंदी मळ्यात शिरल्याने आपल्या भाजीपाल्याची नासाडी होईल, या भीतीने अनेकजण त्याला हुसकून लावत असत. नंदीचा सतत होणारा अपमान सहन न झाल्याने महादेव नंदीला घेऊन शिखर शिंगणापूर येथे गेले. पण निरवांगीचा परिसर भावल्यामुळे हा नंदी तेथून पुन्हा पुन्हा याच परिसरात येत असे. नंदीचे या परिसरावर असलेले प्रेम पाहून महादेवाने निरवांगीतच या नंदीसाठी राहण्याची व्यवस्था केली. हे स्थान म्हणजेच येथील नंदिकेश्वर मंदिर होय.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, या परिसरात आक्रमकांकडून विध्वंस सुरू होता. एकदा त्यांची नजर नंदीकेश्वर मंदिरावर पडली. या आक्रमाकांपैकी एकाने आपल्या हातातील हत्याराचा पहिला घाव या नंदीच्या मूर्तीवर घातला. या घावामुळे नंदीच्या पाठीवर जखमेसारखी खोक पडली आणि त्यातून रक्त वाहू लागले. पाषाणी मूर्तीतून येणारे ते रक्त पाहून आक्रमक घाबरले व तेथून त्यांनी काढता पाय घेतला. या कथेला आधार म्हणून नंदीच्या पाठीवर डाव्या बाजूला असलेला एक खोलगट खड्डा दाखवण्यात येतो. शिखर शिगणापूर येथील महादेवाच्या दर्शनाला जाण्याआधी येथील नंदीचे दर्शन घेऊन मगच पुढे जाण्याचा दंडक आहे.
या मंदिराचा लिखित स्वरूपातील इतिहास उपलब्ध नसला तरी येथील अस्पष्ट शिलालेख व मंदिराची स्थापत्य रचना यावरून ते सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. भीमा, कऱ्हा आणि नीरा नदीच्या खोऱ्यांत चालुक्यकाळापासून अशा मंदिरांची निर्मिती होत आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी पळसदेव येथील पळसनाथ मंदिराशी या मंदिराचे साम्य असल्याचे सांगितले जाते. या मंदिराप्रमाणेच पुरंदर, नारायणपूर व लोणी भापकर या परिसरात अशा स्थापत्यशैलीची मंदिरे आहेत.
निरवांगी गावापासून काहीसे दूरवर व गर्द झाडीत नंदिकेश्वर मंदिर स्थित आहे. प्रशस्त पटांगणात मध्यभागी असलेल्या या मंदिराची रचना खुला मंडप, नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मुळ मंदिरासमोर अलिकडील काळात भाविकांच्या सोयीसाठी खुल्या स्वरूपाचा मंडप उभारलेला आहे. या मंडपातून नंदीमंडपात प्रवेश होतो. चार दगडी स्तंभ, त्यावर हस्त व छत असलेल्या या नंदीमंडपात मध्यभागी भलीमोठी नंदीची पाषाणातील मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या समोरील बाजूस सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती व खालच्या बाजूला शस्त्रधारी द्वारपाल आहेत. द्वारशाखांवर नक्षीकाम व खालील बाजूस स्वागतिका, अन्य स्त्री व पुरुषांची उठाव शिल्पे (म्युरल्स) आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात (गुढमंडप) प्रवेश होतो. सभामंडपात चार नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी कासवशिल्प आहे. सभामंडपात हवा खेळती राहावी यासाठी प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या भिंतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण दगडी जाळीची रचना आहे. या जाळीमध्ये असलेल्या चौकोनांत दगडी फुले आहेत. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व महादेव यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना आहे. तेथे असलेल्या शिल्पांप्रमाणेच येथेही तशीच शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील सभामंडपावर लहान शिखर व गर्भगृहावर मुख्य व उंच शिखर आहे. गर्भगृहावरील शिखर हे नव्याने उभारलेले आहे.
महाशिवरात्री व श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे उत्सव साजरे होतात. मंदिराचा यात्रोत्सव श्रावणातील शेवटच्या सोमवारी असतो. इंदापूर तालुक्यातील मोठ्या यात्रांमध्ये येथील यात्रेचा समावेश होतो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवसफेड करण्यासाठी येथे येतात.