नंदीकेश्वर महादेव मंदिर

नंदीपेठ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला

सातपुडा पर्वतरांगांजवळ वसलेले ऐतिहासिक अकोट हे शहर ‘संतनगरी’ म्हणून ओळखले जाते. शेगावचे संत गजानन महाराज यांचे समकालिन व गुरूबंधु असलेले सिद्धपुरुष संत नरसिंग महाराज यांच्या अनेक लीला याच शहरात घडलेल्या आहेत. या शहरातील नंदीपेठ परिसरात नंदीकेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या मुखमंडपात विराजमान असलेली नंदीची अखंड काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती हे येथील मुख्य आकर्षण आहे. या मूर्तीमुळेच येथील महादेवास नंदीकेश्वर असे नाव प्राप्त झाले. येथील महादेव हे परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
शिवपुराणानुसार, भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंदिस, श्रृंगी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, जय आणि विजय या शंकराच्या गणांप्रमाणेच नंदी हा एक प्रमुख गण आहे. हा शंकराचा प्रमुख द्वारपाल मानला जातो. नंदीश, नंदीश्वर या नावानेही तो ओळखला जातो. शिवसहस्त्रनामांमध्ये नंदी हे शिवाचे नाव असल्याचे म्हटले आहे. शिवपुराणातील शतरुद्रखंडाच्या २२व्या अध्यायात भगवान शंकराने नंदीचा अवतार धारण केल्याचे म्हटले आहे. ही कथा अशी की समुद्रमंथनानंतर सूर-असुरांमध्ये झालेल्या युद्धात देवतांचा विजय झाला. त्यानंतर भगवान विष्णूने सर्व असुरांना पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली. ते स्वतः त्यांना घेऊन पाताळात गेले. परंतु तेथे असुरांनी त्यांना बंदी बनवले. तेव्हा सर्व देवतांनी शंकरास साकडे घातले. त्यावेळी असुरांचा नाश करण्यासाठी शंकराने वृषभावतार धारण केला.
नंदी हा शिलाद ऋषींचा पुत्र असेही मानले जाते. या विषयीची आख्यायिका अशी की शिलाद ऋषी यांनी शंकराची घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना नंदी हा पुत्र झाला. नंदीला त्यांनी चारही वेदांचे ज्ञान प्रदान केले. एकदा त्यांच्याकडे मित्र आणि वरूण हे आले असता, त्यांनी शिलाद ऋषींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला, परंतु नंदीस दिला नाही. तेव्हा ऋषींनी विचारले असता त्यांनी सांगितले की नंदी हा अल्पायू आहे. हे ऐकून शिलाद ऋषी काळजीत पडले. यानंतर नंदीने भुवन नदीच्या किनाऱ्यावर बसून शंकराची तपस्या केली. त्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकराकडे त्याने, आयुष्यभर आपले सानिध्य मिळावे, असा वर मागितला. त्यावेळी शंकराने त्यास वृषभाचा चेहरा देऊन आपले वाहन बनवले. त्यामुळेच शिवालयांमध्ये शंकराच्या पिंडीसमोर नंदीचे स्थान असते. वीरशैव संप्रदायातही नंदीस महत्त्वाचे स्थान आहे.
अकोट येथील मंदिर तर नंदीच्या नावानेच ओळखले जाते. या प्राचीन मंदिराच्या उभारणीबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला गाडगेबाबांची उभी मूर्ती आहे. याशिवाय प्रांगणात पुंजाजी महाराज यांचे समाधी मंदिर व नंदिकेश्वर महादेवाचा रथ आहे. उत्सवप्रसंगी या रथातून नंदीकेश्वर महादेवाची मिरवणूक काढण्यात येते. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी नंदिकेश्वर मंदिराची संरचना आहे.
नंदीमंडपात सुमारे पाच फूट उंचीची व तेवढ्याच रूंदीची अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम व शिगांवर घुंगरू आहेत. मंदिराचे अंतराळ व नंदिमंडप यामध्ये खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. भाविकांच्या सुविधेसाठी त्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. नंदीमंडप व सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या स्तंभशाखामधील स्तंभांवर दीपकोष्टके आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस कीर्तिमुख आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदिकेश्वर महादेवाची पिंडी आहे. गर्भगृहातील भिंतीमध्ये असलेल्या देवकोष्टकांत गणपती, दुर्गामाता, राधा-कृष्ण, रामदरबार, गजानन महाराज, संत सावता माळी आदींच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे शिखर आहे. त्यावर दोन आमलक व कळस आहेत. मंदिरासमोर प्रांगणात विटांनी बांधलेली प्राचीन तीन मजली विहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे.
मंदिरात गुढीपाडवा, श्रीराम नवमी, चैत्र कृष्ण त्रयोदशीला गोरोबा काका पुण्यतिथी, श्रावणातील चौथ्या सोमवारी कावड यात्रा, आषाढ कृष्ण चतुर्दशीला संत सावतामाळी पुण्यतिथी, माघ शुद्ध द्वितीयेला पुंजाजी महाराज पुण्यतिथी, महाशिवरात्रीसह विविध सण-उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्रीनिमित्त येथे पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी, तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी परिसरातील शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शेवटच्या श्रावणी सोमवारी शहरातून कावड यात्रा निघते. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन अनेक भाविक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत वाहने तसेच रथांवर महादेवाच्या विविध रूपांच्या व शिवलिंगांच्या प्रतिकृती ठेवण्यात येतात. ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या यात्रेत शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • अकोट बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • अकोला जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : माधव भुस्कट, मो. ८९७५१९६०४६,
  • अनिल बेलसरे, मो. ८३७८८५८९०६
Back To Home