नानासाहेब वाडा मंदिर

पातूर, ता. पातूर, जि. अकोला

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पातूर शहरातील पेशवेकालीन नानासाहेब वाडा मंदिर प्रसिद्ध आहे. येथे विदर्भातील अठराव्या शतकातील प्रसिद्ध संत नानासाहेब यांची समाधी आहे. मराठाकालीन वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वाड्यामुळे पूर्वी ‘पराशर नगरी’ म्हणून ओळखले जाणारे हे गाव आता ‘पातूर नानासाहेब’ म्हणून प्रसिद्ध आहे. विदर्भातील असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी येथे यात्रा असते. त्या दिवशी पंचक्रोशीतील भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून जातो.
विदर्भातील अठराव्या शतकातील प्रसिद्ध संत असलेल्या नानासाहेब यांचे चिरंजिव मुकुंदराज यांनी त्यांचा चरित्रग्रंथ लिहिला आहे. त्यानुसार, त्यांचे मूळ नाव नारायण कान्होजी आमले असे होते. पातूर येथील यजुर्वेदी ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्मास आलेले नानासाहेब हे मोठे दानशूर होते. तरुणपणात ते गरीब आणि ब्राह्मणांना नेहमी मदत करीत असत. त्यावरून त्यांचे काका बाबुजीबुवा यांच्याशी त्यांचे वाद होत असत. त्यामुळे ते घर सोडून अमरावती जिल्ह्यातील मार्की या गावी गेले. तेथे मार्कीनाथबुवा यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. काही काळाने त्यांचे वडिल त्यांना परत पातूर येथे घेऊन गेले. त्यांचा विवाह लावून देण्यात आला. मात्र ते परत मार्कीनाथबुवांकडे गेले. तेव्हा बुवांनी त्यांना पातूर येथे जाण्याची आज्ञा केली.
पातूर येथे आल्यानंतर नानासाहेब सर्व मोहमाया सोडून तपस्येत लीन झाले. त्यांनी वस्त्रत्याग केला. जातीभेदापासून स्वतःस मुक्त केले. असे सांगतात की ते मुस्लिम आणि अंत्यज वगळता कोणत्याही जातीच्या व्यक्तीकडून अन्न-पाणी ग्रहण करीत असत. त्यांचे नातेवाईक त्यांना घरात बंद करून ठेवत असत. परंतु काही वेळातच ते घराबाहेर दिसू लागत. कुलूपबंद दारे-खिडक्या उघडून ते घराबाहेर कसे येत ते कोणालाही समजत नसे. त्यांच्या या वर्तणुकीमुळे सनातनी ब्राह्मणांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जातीबाह्य केले. मात्र जोवर आपण श्रीरामाची भक्ती करीत आहोत, तोवर कोणतेही प्रायश्चित्त घेण्याची आपणांस आवश्यकता नाही, असे त्यांनी जाहीर केले. हळुहळू त्यांच्यातील संतत्त्वाची लक्षणे लोकांच्या लक्षात येऊ लागली. या काळात त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे सांगण्यात येते. एका मुस्लिम मन्सबदाराने त्यांना मांस खाण्याचा आग्रह केला होता. त्यांनी नकार दिला. तरीही त्याने बळेच त्यांच्यासमोर मटणाचे ताट धरले. त्यावरील कापड बाजूला केले असता, त्यात मांसाऐवजी फुलांचा गुच्छ दिसला. अशा त्यांच्या विविध चमत्कारकथा सांगण्यात येतात. नागपूरचे उधोजी आणि मुधोजी भोसले यांच्यातील वादात नानासाहेबांनी मध्यस्थी केली होती, असेही सांगण्यात येते.
नानासाहेबांना श्रीरामबंधु लक्ष्मणाचा अवतार मानण्यात येते. १७४० मध्ये ते समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ पातूरमध्ये ही भव्य वास्तू उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या गर्भगृहात नानासाहेब व त्यांच्या पत्नीच्या समाध्या आहेत. कालानुरूप या वाड्याची काहीशी पडझड झाली आहे. नानासाहेब यांचे वंशज शेगाव, वाशिम, पुसद, नागपूर येथे वास्तव्यास आहेत.
टेकडीवर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिराच्या मागील बाजूस, बालापूरवरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपासला लागूनच नानासाहेब वाडा आहे. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार (दिंडी दरवाजा) पूर्वाभिमुख असून त्यावर नगारखाना आहे. पक्क्या विटा, दगड व चुना वापरून बांधलेल्या या वाड्याला किल्ल्याप्रमाणे चार बुरूज व सभोवताली परकोट आहे. दिंडी दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूंना देवड्या दिसतात. परकोटात कमानीसह बांधकाम करण्यात आले आहे. येथील एका खोलीतून जाणाऱ्या अरूद जिन्याने कोटाच्या छताच्या भागात येता येते. या छतावरून मंदिर परिसर दिसतो. परकोटावर येण्यासाठी पूर्वी चार मार्ग होते. आता त्यापैकी दोन शाबूत आहेत.
वाड्याच्या आवारात डाव्या बाजूला प्राचीन शिवलिंग व नंदीची मूर्ती नजरेस पडते. प्रांगणात मध्यभागी असलेल्या मंदिरासमोर चार एकत्रित दीपस्तंभ व त्यावर एक उंच दीपस्तंभ अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरील भिंतीवरील देवळ्यांमध्ये प्राचीन मूर्ती कोरलेल्या आहेत. या वास्तूवर झालेल्या परकी आक्रमणादरम्यान येथील काही मूर्ती भग्न झाल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी एकूण सात दरवाजे आहेत. सभामंडपात भक्कम स्तंभ व कासवाची प्राचीन मूर्ती आहे. या सभामंडपात नक्षीकाम असलेल्या कमानी आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारानजीक नानासाहेब यांच्या पादुकांचे दर्शन होते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांजवळ छोट्या छोट्या आकाराचे खड्डे दिसतात. गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी भाविक पूर्वी या खड्ड्यांमध्ये चांदीची नाणी रोवत, असे सांगण्यात येते. गर्भगृहात नानासाहेब व त्यांच्या पत्नीच्या समाध्या आहेत. गर्भगृहात हवा खेळती राहावी तसेच पुरेसा प्रकाश यावा, या हेतूने शिखराच्या बाजूने झरोका करण्यात आला आहे. मंदिराच्या वास्तूमध्ये तळघर आहे. या तळघरात प्रवेश करण्यासाठी असलेला अरुंद मार्ग सध्या बुजलेला आहे. येथील भुयारात सोन्याची नाणी होती, अशी आख्यायिका सांगितली जाते.
मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे. सभामंडपाच्या परिसरात गोड्या पाण्याची विहीर आहे. अरुंद असलेल्या या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, असे सांगण्यात येते. सध्या ही विहीर बंदिस्त केलेली आहे. या विहिरीसह मंदिर परिसरात एकूण पाच विहिरी आहेत. त्यापैकी एक विहीर मंदिराच्या मागील बाजूस आहे. या मंदिराला लागून नानासाहेब यांचे पुत्र व शिष्य मुकुंदराज यांची समाधी आहे. मंदिराच्या मागील बाजूला नानासाहेबांचे शिष्य सोनाजी आणि होनोजी यांच्या समाध्या आहेत. त्यापैकी एका समाधीवर हत्तीचे सुंदर शिल्प आहे. मंदिरात एके ठिकाणी हनुमानाची प्राचीन पाषाणी मूर्तीही आहे. या हनुमानाला ‘तेलिया हनुमान’ असेही म्हणतात. मंदिर परिसरात एक जुने दगडी जातेही आहे. पूर्वी यात्रेदरम्यान या जात्यामध्ये धान्य दळले जात असे. हे जाते आजही सुस्थितीत आहे.
येथे माघ शुद्ध दशमीला मोठी यात्रा भरते. पूर्वी ही यात्रा सव्वा महिना चालत असे. हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी येत. ते येथे रोडगे व वांग्याच्या भाजीचा नैवद्य अर्पण करत. १८०८ मध्ये पेंढारी लुटारूंनी लावलेल्या आगीत गाव उद्‌ध्वस्त झाले होते. या घटनेनंतर या यात्रेचा कालावधी हळूहळू कमी होत एक दिवसावर आला. माघ शुद्ध दशमीला येथे विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. पंचक्रोशीतील हजारो भाविक या यात्रेला उपस्थित असतात. माघ शुद्ध नवमीला मुकुंदराज महाराजांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवण्यात येतो. यात्रेच्या दिवशी नानासाहेबांना उडिद डाळ व भाकरीचा नैवद्य अर्पण करण्यात येतो. हनुमान जयंतीच्या दिवशी येथील हनुमानाच्या मूर्तीसमोर मोठा उत्सव होतो. या वेळी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते. काही वर्षांपासून येथे गणेशोत्सवही उत्साहात साजरा केला जातो. या मंदिराच्या परिसरात काही चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आलेले आहे.

उपयुक्त माहिती:

  • पातूर बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून पातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home