नामदेव महाराज मंदिर

नरसी नामदेव, ता. हिंगोली, जि. हिंगोली

वारकरी संप्रदायाचे महान संत नामदेव महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी येथे झाला. ते संत ज्ञानेश्वरांचे समकालीन असून पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपल्या अभंग आणि कीर्तनांमधून भक्ती, समता आणि मानवता या मूल्यांचा प्रसार केला. त्यांना ‘आदि कवी’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रासोबतच पंजाबपर्यंत प्रवास करून त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेवांच्या नावावरून पूर्वीच्या नरसी-बामणी या गावाचे नामकरण नरसी नामदेव असे झाले. याच गावातील नामदेव महाराजांचे मंदिर हे हजारो वारकऱ्यांचे आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

संत नामदेव महाराज हे साक्षात पांडुरंगाचे निकटवर्ती सखा म्हणून वारकरी संप्रदायात वंदनीय आहेत. शिंपी समाजात जन्मलेल्या या नामदेवांचे बालपण विठ्ठलाच्या पंढरपूर नगरीत व्यतीत झाले. त्यांचे वडील दामाशेट आणि मातोश्री गोणाई यांच्या पोटी, कार्तिक शुद्ध एकादशी या मंगलदिनी, अर्थात २६ ऑक्टोबर १२७० रोजी त्यांचा जन्म झाला.

नामदेव महाराजांच्या जन्माबद्दल एक आख्यायिका अशी की दामाशेट आणि गोणाई यांना अपत्य नव्हते. एकदा गोणाई कपडे धुण्यासाठी गावाजवळील कयाधू नदीवर गेली असताना, धुऊन पिळे करून ठेवलेल्या कपड्यांच्या टोपलीत एक शिंपला अचानक येऊन पडला. घरी आल्यावर कपडे वाळवताना तो शिंपला त्यांनी घरातच फेकून दिला. रात्री १२ वाजता त्या शिंपल्यातून एका बाळाचा जन्म झाला आणि ते मोठ्याने रडू लागले. त्या आवाजाने गोणाई आणि दामाशेट जागे झाले. त्या शिंपल्यातून रडणारे बाळ पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी गोणाईला पान्हा फुटला. ते बाळ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून संत नामदेव महाराजच होते, असे सांगितले जाते.

नामदेव महाराजांच्या जीवनातील काही आठवणी सांगितल्या जातात. त्यापैकी एक त्यांच्या लहानपणची आहे. त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना ‘आज तू देवाला प्रसाद दाखव’ असे सांगितले. त्यावेळी त्यांनी नैवेद्य दाखविला आणि देव तो नैवेद्य कधी खाणार याची वाट पाहू लागले. त्यांच्या त्या निरागस शुद्ध भक्तीपुढे देवाला झुकावे लागले व त्यांच्याकडील प्रसाद ग्रहण करावा लागला. एकदा त्यांच्या घरातील भाकरी कुत्र्याने पळविली. ती भाकरी त्या कुत्र्यास कोरडी खावी लागू नये, म्हणून ते तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे गेले होते. एका लोककथेनुसार, एकदा औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी नामदेव महाराज नागनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे गेल्यावर त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना ते शूद्र जातीतले असल्याने कीर्तन करू नये, असे सांगितले. ते काहीही न बोलता मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन नागनाथाची आळवणी करू लागले. त्यावेळी नामदेवांच्या पवित्र भक्तीने पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिमाभिमुख झाले व नागनाथांनी नामदेवांना दर्शन दिले. तेव्हापासून हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे, असे सांगितले जाते.

संत गोरा कुंभार यांच्या तेरेढोकी (धाराशिव) येथील घरी संतांचा मेळावा झाला होता. त्यात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा आणि विसोबा खेचर यांसारखे थोर संत एकत्र आले होते. यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून संत गोरा कुंभार यांनी उपस्थित सर्वांच्या अध्यात्मिक तयारीविषयी आढावा घेतला. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे अध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. संत नामदेवांची कीर्तन करण्याची पद्धत खूप अभ्यासू होती. त्यात अनेक चांगल्या ग्रंथांचे संदर्भ ते देत असत. संत नामदेव कीर्तने करीत भारतभर फिरले.

त्यांना संत शिरोमणी आणि नामदेवबाबा या नावाने संबोधले जाते. मराठी साहित्यात संत नामदेव महाराजांवर अनेक संशोधनपर आणि प्रबोधनात्मक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. संत नामदेव महाराज यांच्या पत्नीचे नाव राजाई होते. त्यांना लिंबाई नावाची एक मुलगी तर नारायण, विठ्ठल, गोविंद आणि महादेव हे चार मुलगे होती. त्यांच्या कुटुंबात एकूण १५ सदस्य होते. नामयाची दासी असे संत जनाबाई स्वतःला म्हणवून घेत. त्या त्यांच्या कुटुंबातील सदस्या होत्या.

संत नामदेवांचे एकूण २५०० अभंग प्रसिद्ध आहेत. शौरसेनी या मध्ययुगीन प्राकृत भाषेत त्यांनी १२५ पदे लिहिली आहेत. त्यातील ६२ अभंगांचा शीख पंथाचा ‘गुरु ग्रंथ साहिब’ या ग्रंथात समावेश आहे. त्यांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील महाद्वाराच्या पायरीचा दगड होणे त्यांनी पसंत केले. ३ जुलै, १३५० रोजी पंढरपुरात पांडुरंगचरणी त्यांनी देह ठेवला. तेव्हापासून त्या मंदिरातील पायरीला नामदेव पायरी असे संबोधले जाते.

हिंगोलीजवळील नरसी नामदेव गावात कयाधू नदीच्या काठावर असलेल्या या नामदेव महाराज मंदिराची स्थापना कोणी आणि कधी केली, याविषयीची ठोस माहिती उपलब्ध नाही. २०१९ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. राज्य सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. वाहनतळापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो पूजा-प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. भल्या मोठ्या कमानीतून मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. दहा पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपातून सभामंडपात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासह आणखी दोन दरवाजे आहेत. गोलाकार आकाराच्या सभामंडपाच्या स्तंभांवर व छतावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. या सभामंडपात अखंड वीणावादन सुरू असते. सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे आणखी दोन मुखमंडप आहेत. सभागृहात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर स्टिलचे रेलिंग लावलेले आहेत. येथूनच भाविकांना दर्शन घ्यावे लागते.

गर्भगृहात एका चौकोनी अधिष्ठानावर संत नामदेव महाराजांची हाती वीणा व चिपळ्या घेतलेली शुभ्र संगमरवरी सुबक मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्ठकांत उजवीकडे विठ्ठलाची व डावीकडे रुक्मिणीमातेची मूर्ती आहे. मध्यभागी काळ्या पाषाणाचा वापर करून घडविलेली नामदेव महाराजांची जुनी मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या शिरावर पागोटे आहे. मंदिराचे तीन मुखमंडप व सभामंडपावर चौकोनी निमुळती होत जाणारी शिखरे आहेत. गर्भगृहावर असणाऱ्या मुख्य शिखरावर लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. मंदिराच्या आवारात दक्षिणमुखी हनुमान व संत सातारकर महाराज यांची मंदिरे व नदी घाटाला लागून संतश्रेष्ठ सेना महाराज यांचे मंदिर आहे.

फाल्गुन कृष्ण एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी या मंदिरात मोठी जत्रा भरते. या यात्रेला ‘मिठाची यात्रा’ असे म्हणतात. यात्रेत खरेदी केलेले मीठ पौष्टिक आणि पवित्र मानले जाते. या यात्रेत मीठासह, धान्य व तेलबिया खरेदी करण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशी व त्यानंतर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी तिला परतवारी एकादशी असे म्हणतात. या दरम्यान हजारो वारकरी व भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. परतवारीचा महोत्सव हा या मंदिरातील सर्वात महत्त्वाचा मोठा उत्सव असतो. आषाढी एकादशीला शेजारील जिल्ह्यातील अनेक भाविक पायी वारी करत या मंदिरात दर्शनाला येतात.

उपयुक्त माहिती:

  • हिंगोली येथून १७ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५४५३९३४६७

नामदेव महाराज मंदिर

नरसी नामदेव, श्री हिंगोली, जिला. हिंगोली

Back To Home