कोकणातील काही मोजक्या स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक म्हणजे रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील आवास हे गाव होय. कोलाहलापासून दूर असलेल्या या गावामधील ‘नागोबा’ मंदिराची सर्वत्र ख्याती आहे. एका साधूची समाधी असलेल्या या मंदिरात नवस केल्यावर मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या नागोबाला पुजणारे भक्त विषबाधेपासून व रोगराईपासून मुक्त राहतात, अशीही मान्यता आहे.
देवांचा वास असलेले ठिकाण म्हणजे आवास, असे या गावाबद्दल म्हटले जाते. आवासमध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी नागोबा मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की अनेक तीर्थ फिरून आल्यानंतर नागोबा नावाचे साधू आवासमध्ये मुक्कामासाठी आले. सकाळी समुद्रामध्ये स्नान करून वक्रतुंड मंदिरात गणेशाचे दर्शन आणि पुढे कनकेश्वराचे दर्शन घ्यावे आणि रात्री मुक्कामासाठी पुन्हा आवासमध्ये यावे, हा त्यांचा दिनक्रम होता. आवासच्या किनाऱ्यावर त्याकाळी केवड्याची दाट बने होती (आजही काही प्रमाणात आहेत). तेथून समुद्रावर स्नानासाठी जाताना त्यांच्या पायाजवळून अनेक विषारी जनावरे जात; पण त्यांनी नागोबा साधूंना कधीही दंश केला नाही. त्यांना वैद्यकीचेही ज्ञान होते. ते सर्पदंश झालेल्यांवर प्राथमिक उपचार करीत. तेथे त्यांचे बुधोबा व चांगोबा हे शिष्य होते.
असे सांगितले जाते की नागोबा साधू आवासला वास्तव्यास आल्यापासून येथील परिस्थितीत सुधारणा झाली. पाऊसपाणी उत्तम पडून पिके चांगली येऊ लागली. रोगराई कमी झाली. अनेक वर्षांनी (त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी) त्यांनी इथेच संजीवन समाधी घेण्याचे ठरवले. बुधोबा व चांगोबांनीही तोच मार्ग पत्करला. आपण ज्या जागी बसलो आहोत तेथेच समाधिस्थ होणार आहोत, असे सांगून त्या जागेवर एक खड्डा खणण्याची आज्ञा त्यांनी ग्रामस्थांना दिली. खड्डा खणून झाल्यानंतर नागोबा साधू व त्यांच्या दोन्ही शिष्यांनी दर्भाच्या आसनावर जिवंत समाधी घेतली. समाधीनंतर काय होईल, हे नागोबा साधूंनी आधीच सांगितले होते. समाधीस्थळी लाकडावर नागाच्या तीन प्रतिमा उमटतील, या प्रतिमांची पूजा करणाऱ्यांचे दुःख-दारिद्र्य कायमचे निवारण होईल, असे आश्वासन त्यांनी आपल्या भक्तांना दिले होते. काही काळ गेल्यानंतर नागोबांच्या समाधीवर तीन लाकडी नागप्रतिमा प्रकट झाल्याचे सांगितले जाते. सध्या मंदिरात याच नागप्रतिमांची पुजा होते.
नागोबा साधूंनी जेथे समाधी घेतली, त्याच जागी हे कौलारू मंदिर आहे. मंदिरासमोर प्रांगणात एक दीपमाळ व मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुलसी वृंदावन आहे. साध्याशा असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील सागवानी खांबांना शेकडो लहानमोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून येथे पितळी घंटा अर्पण करण्याची प्रथा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी आयताकृती चौथरा आहे. याच जागी नागोबा साधूंनी संजीवन समाधी घेतल्याचे सांगितले जाते. चौथऱ्यावर नागोबा, बोधोबा आणि चांगोबा यांच्या नागमूर्ती आहेत. साधूंनी सांगितल्याप्रमाणे समाधीनंतर प्रकट झालेल्या याच मूर्ती असल्याची मानले जाते. या मूर्तींच्या डाव्या हाताला धातूच्या नागप्रतिमा आहेत. चौथऱ्यावर सागवानी लाकडाचा सहा खांब असलेला देव्हारा आणि त्यावर कळस आहे. पूर्वीच्या काळी समाधीभोवती लहानसे मंदिर होते. १७७७-७८ साली मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. नागोबा साधूंचे एक भक्त बाळाजी सुखोजी राऊत यांनी स्वखर्चाने येथे मंदिर बांधले होते. त्यानंतर १८५६ साली भक्तांनी वर्गणी काढून मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार केला. त्यावेळी देणग्या दिलेल्या भक्तांची नावे असलेली संगमरवरी पाटी आजही मंदिराच्या भिंतीवर लावलेली आहे. नागोबा साधूंच्या इच्छेप्रमाणे आवासमधील राणे कुटुंबाकडे या मंदिरात पूजाअर्चा करण्याची आणि कारभार पाहण्याची जबाबदारी आहे.
आपण समाधी घेतल्यानंतर दरवर्षी येथून कनकेश्वराला पालखी न्यावी, अशी इच्छा नागोबा साधुंनी व्यक्त केली होती. ती परंपरा आजही पाळली जाते. साधूंनी समाधी घेतली त्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला येथे ‘आवासी नागेश्वराची जत्रा’ भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी नवसपूर्तीसाठी येतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला नागोबाचा ठसा तयार करून पालखीत ठेवला जातो. नारायण, नारायण असा जप करत पालखी गावातून फिरविली जाते व नंतर कनकेश्वर मंदिरात नेली जाते. कोकणातील कोळी, आगरी, कुणबी, भंडारी, माळी समाजात नागोबाचे असंख्य भक्त आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तिला येथे आणले तर विष उतरते आणि ती व्यक्ती पूर्ण बरी होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दररोज दुपारी १.३० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी बंद असते.