बाराव्या शतकात देशभरात धार्मिक भेदाभेद, कर्मकांडे यांना नाकारणारे जे अनेक संप्रदाय उदयास आले, त्यातील ‘नागेश संप्रदाय’ हा एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक नागनाथ तथा नागेश महाराज हे होत. ते या संप्रदायाचे आराध्यदैवत आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम मोहोळ व त्यानंतर वडवळ येथे त्यांचे वास्तव्य होते. येथे नागनाथ महाराजांनी केलेल्या एका चमत्कारामुळे त्यांना वडवळसिद्ध असे नाव प्राप्त झाले. यामुळे या मंदिरास संप्रदायामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. ‘ज्यांना न घडे काशी त्यांनी यावे वडवळाशी’, असेही या ठिकाणाबद्दल म्हटले जाते.
ऐतिहासिकदृष्ट्या नागनाथ महाराज हे सिद्ध पुरूष बाराव्या शतकात होऊन गेले. महाराष्ट्र व कर्नाटक ही त्यांची कार्यभूमी होती. नागनाथ महाराजांविषयी आख्यायिका अशी की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (चंद्रमौळी) येथे राहणाऱ्या हेग्रस नावाच्या भारद्वाज गोत्री ब्राह्मणास मानस सरोवराकाठी नागनाथांनी प्रथम दर्शन दिले. त्यांच्या अंगावर अनेक नाग खेळत असत म्हणून त्यांचे नागनाथ किंवा नागेश असे नाव प्रसिद्ध झाले. पुढे ते हेग्रस यांच्या समवेत मोहोळला आले. तेथे गावातील समाजकंटकांच्या त्रासाला कंटाळून ते एका अरण्यात हेग्रस व अन्य भक्तगणांसह गेले. तेथे एका वठलेल्या वडाखाली बसले असता, त्यांनी शिष्यास त्या झाडाला पाणी घालण्यास सांगितले. पाणी घालताच वडास पालवी फुटली म्हणून त्यांना वडवळसिद्ध वा वटसिद्ध नागनाथ म्हटले जाऊ लागले.
मध्ययुगीन काळात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात या संप्रदायास विकसित स्वरूप प्राप्त झाले. हा संप्रदाय योगसाधनेला महत्त्व देणारा व शिवपूजक असा आहे. कर्मकांडे, कडक वैराग्य, संन्यास यांवर भर न देता सामान्य माणसाला भक्तिप्रवण करणारा अध्यात्मविचार या पंथाने मांडला. या संप्रदायात जातीवाद अमान्य आहे. त्याच प्रमाणे विशिष्ट व्रत, पोषाख, पताका, माळ यांनाही यात स्थान नाही. सहिष्णुता व उदारता ही हिंदू धर्मातील शिकवण अंगिकारून या पंथाने नेहमीच हिंदू व मुस्लिम धर्म, तसेच विविध पंथांना आस्थेने जवळ केले.
असे सांगण्यात येते की मोहोळ येथे नागेशांनी एकदा फकीर वेषात हेग्रसांना दर्शन दिले होते. त्याच प्रमाणे दिल्ली येथे शेख नसरूद्दीन यास पैगंबर रुपात दर्शन दिले होते. हेग्रस हे नागनाथ महाराजांचे लाडके शिष्य होते. त्यांनी अवतार संपविल्यानंतर नागनाथ महाराजही आपले अवतारकार्य संपले असे सांगून वडवळ येथील खर्गतीर्थात गुप्त झाले.
नागनाथ महाराजांचे वडवाळ येथील मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. याबाबत कथा अशी की मानूर येथे एकलिंग तेली नावाचे नागनाथांचे एक भक्त होते. नंतर ते वडवळ येथे आले. त्यांनी नागनाथांकडे इच्छा व्यक्त केली की ‘चैत्र शुध्द चतुर्थी व सप्तमी या दिवशी होणाऱ्या उत्सवात आपण माझ्या मस्तकावरून जावे.’ पुढे एकलिंग तेली यांनी वडवाळ येथे नागनाथाचे मंदिर उभारले. या मंदिरासमोरच ते समाधिस्थ झाले. त्यांना दिलेल्या वरानुसार आजपावेतो प्रतिवर्षी उत्सवात नागनाथांचा संचार झाल्यावर ते एकलिंग तेली यांच्या समाधीवरून जातात.
चहुबाजुंनी उंच तटभिंती असलेल्या हेमाडपंती बांधणीच्या या मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. यातील पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराला ‘नागेशभक्त दिल्ली दरबार’ असे नाव आहे.
दुमजली असलेल्या या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. तीन पायऱ्या चढून या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. प्रांगणात तटबंदीच्या आतील बाजूस सर्वत्र ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंत मोठा मंडप आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यावर पत्याचे छत टाकलेले आहे. या मंडपात एका चौथऱ्यावर एकलिंग तेली संजिवन समाधी आहे. त्यापुढे खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपातील खांबांवर छताचा भार आहे. त्यापुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वर छताकडील बाजूस अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असले तरी गर्भगृह दक्षिणाभिमुख आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर नागनाथ महाराजांच्या दोन मूर्ती आहेत. भाविकांमध्ये त्यांना थोरला देव आणि धाकटा देव असे संबोधिले जाते. दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुकूट व पितळी मुखवटे आहेत. असे सांगितले जाते की याच गर्भगृहात नागनाथांनी अवतार कार्य संपविण्यापूर्वी आपले उजवे पाऊल येथे उमटवले होते. या मंदिर परिसरात संतकवी उद्धव चिंद्धन यांची संजिवन समाधी, बापुजी महाराज आणि धनगर देशमुखाची ओवरी, गुरुगादी, धानम्मादेवीचे मंदिर आदी स्थाने आहेत.
वडवळमध्ये गोपाळकृष्ण मंदिरानजीक नागनाथांचे भक्त हेग्रस यांचे समाधीस्थान आहे. या शिवाय नागेश संप्रदायात महत्त्वाचे तीर्थ मानले जाणारे खर्गतीर्थही येथे आहे. अशी आख्यायिका आहे की या जलडोहाची निर्मिती स्वतः नागनाथांनी खड्गाने खणून केली व त्यामुळे त्यास खर्गतीर्थ नाव पडले.
नागनाथांच्या या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी व उत्सव सुरू असतात. या मंदिरात तेल लावणे आणि तेल उतरविणे ही एक पारंपरिक प्रथा आहे. चैत्र महिन्यात भक्तगण देवाला तेल अर्पण करतात. यामागे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धीकरणाची संकल्पना आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी पहाटे देवाचा जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्री व दसरा हे महोत्सव मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे होतात. या दिवशी विशेष पूजा, अभिषेक, होमहवन व धार्मिक प्रवचन होतात. नागनाथ महाराजांची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेस असते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. वडवळ येथील यात्रेची सांगता झाल्यानंतर मोहोळ येथील नागनाथांच्या यात्रेस प्रारंभ होतो. या यात्रेसाठी वडवळहून छत्रासहीत पालखी मोहोळला जाते. अक्षय्य तृतीयेला श्रींच्या छत्रीचे मानकरी रात्री ८ वाजता मंदिरात येतात. भजन म्हणत ते छत्रीसह मंदिराबाहेर पडून रात्री ११ च्या सुमारास खर्गतिर्थाला पोहोचतात. येथून पालखी मोहोळला जाते व तेथे विसावा घेते. तेथे पालखीच्या स्वागतासाठी मोहोळच्या नागनाथ मंदिरातील मानकरी येतात. ते मिरवणुकीने ही पालखी मोहोळच्या नागनाथ मंदिरात नेतात. तेथे प्रमुख सोहळे पार पडल्यानंतर वैशाख शुद्ध अष्टमीला श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र मोहोळकडून श्रीक्षेत्र वडवळकडे प्रयाण होते. रात्री ८ वाजता वडवळ येथील खर्गतीर्थावर पालखीचे आगमन होते. तेथून पुन्हा भजन म्हणत, शोभेचे दारुकाम करत श्रींच्या मंदिरात पालखी येते. दररोज सकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात नागनाथ महाराजांचे दर्शन घेता येते.