नागेश्वर मंदिर

उंदिरखेडे, ता. पारोळा, जि. जळगाव

पारोळा या इतिहासप्रसिद्ध तालुक्यातील उंदिरखेडे या गावात नागेश्वर महादेवाचे पेशवेकालीन प्राचीन मंदिर स्थित आहे. खान्देशात मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा पाया भक्कम करणारे आणि पेशवाईत पुण्याचे दिवाण असलेल्या त्रिंबकराव पेठे यांनी या मंदिराची उभारणी केली. पेशवेकालीन मराठा स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर नदी किनारी एका टेकडीवर रमणीय परिसरात वसले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील नागेश्वर महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यामुळे या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते.
या मंदिराचा इतिहास असा की मुळच्या कोकणातील गुहागर येथील पेठे घराण्यातील त्रिंबकराव पेठे हे २२ ऑक्टोबर १७२८ रोजी श्रीमंत चिमाजी आप्पा यांचे कारभारी गोविंद कृष्ण यांच्या हाताखाली कारकून म्हणून रूजू झाले होते. त्यांचे वडिल विसाजी कृष्ण हे खान्देश प्रांतात कमाविसदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर १७३० मध्ये त्रिंबकराव यांची नियुक्ती या पदावर झाली. खान्देश व बागलाण प्रांतात त्यांनी महसूल वसुलीची चोख व्यवस्था निर्माण करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. पेशव्यांनी त्यांना उंदिरखेडे गाव इनाम म्हणून दिले होते. २८ मार्च १७५३ रोजी, पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे पुण्याच्या दिवाणपदाची जबाबदारी देण्यात आली. या दरम्यानच्या काळात त्यांनी पारोळ्यानजीकच्या उंदिरखेडे येथे नागेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली.

बोरी नदीने सर्व बाजूंनी वेढलेल्या टेकडीवर पेशवेकालीन मराठा स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिराचा उल्लेख जळगाव जिल्हा गॅझेटियरमध्ये आहे. त्यात असे म्हटले आहे की सुमारे पावणे तीनशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराभोवती ७५ फूट उंचीची भिंत होती. येथे बोरी नदीच्या तीरावर पायऱ्यांचा घाट बांधण्यात आला होता. ४० फूट बाय २५ फूट आकाराच्या या मंदिरासमोर मोठी दीपमाळ होती. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंदिरास उंच आवारभिंत आहे. या भिंतीच्या दर्शनी भागात तयार केलेल्या महिरपी कमानदार देवळ्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा रंगवलेल्या आहेत. आवारभिंतीच्या आतील बाजूनेही विविध देवदेवतांच्या, तसेच साधुसंतांच्या प्रतिमा रंगवल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच डावीकडे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे तुळशीवृंदावन आहे. त्याच्या मधल्या भागात नागशिल्पे व वरच्या भागात शुकशिल्पे बसवलेली आहेत. मोठा नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील नंदीमंडपाचे शिखर द्राविड स्थापत्यशैलीतील आहे. आत नंदीची मोठी पाषाणमूर्ती आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार महिरपी कमानदार आहे. या प्रवेशद्वारावरून मंदिराच्या भिंतींच्या जाडीची कल्पना येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची चित्रे रंगवलेली आहेत, तर ललाटबिंबस्थानी गणपतीची प्रतिमा रंगवलेली आहे. सभामंडपाच्या या दर्शनी भिंतीच्या वरच्या भागात अष्टविनायकांची चित्रेही आहेत. सभामंडपाच्या बाशिंगी छतावर चारही कोपऱ्यांवर छोट्या छत्र्या बांधलेल्या आहेत व मध्यभागी घुमटाकार शिखर आहे.
सभामंडपाच्या आतील जाड भिंतीमध्ये महिरपी कमानी कोरलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी मोठे कूर्मशिल्प आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील देवळीत गणेशाची प्राचीन पाषाणमूर्ती विराजमान आहे. गर्भगृहासही महिरपी प्रवेशकमान आहे. त्यापुढे असलेल्या लाकडी प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या भागात सद्गुरू माधवनाथ महाराज यांच्या शिष्या सद्‌गुरू देवी निजनंदीताई महाराज यांची मोठी तसबीर लावलेली आहे. गर्भगृहात मोठी शिवपिंडी आहे. त्यावर तांब्याचे अभिषेकपात्र व सोनेरी छत्र आहे. नजीकच डमरू लावलेला उंच त्रिशुल आहे. मागच्या बाजूस संगमरवरी देवळीत पार्वतीमातेचे स्थान आहे. गर्भगृहावर मराठा शैलीतील उंच शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूंनी कोरलेल्या देवकोष्टकांत शिवलिंग व अन्य पवित्र प्रतिके रंगवलेली आहेत.
मंदिराच्या प्रांगणात छोटा नंदीमंडप असलेले महादेवाचे आणखी एक जुने मंदिर आहे. मंदिरासमोर मोठा दीपस्तंभ आहे. त्या पुढे सिमेंटच्या पायऱ्यांचा सुंदर घाट बांधलेला आहे. येथील बुरुजासारख्या रचनेत भव्य असा त्रिशुल उभारलेला आहे. मंदिर परिसरात नागदेवतेचे मंदिर आहे. नजीक दीड एकर जागेत फुलबाग फुलवण्यात आलेली आहे.
या मंदिरात दर सोमवारी, विशेषतः श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. येथे महाशिवरात्रीप्रमाणेच अन्य सण व उत्सव भक्तीभावाने व मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात.

उपयुक्त माहिती

  • पारोळा येथून ८ किमी, तर जळगाव येथून ६५ किमी अंतरावर
  • जळगाव व पारोळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहनाने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येता येते.
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home