नागेश्वर महादेव मंदिर खिरेश्वर

ता. जुन्नर, जि. पुणे

पुणे, ठाणे व नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले खिरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव. कल्याण-नगर मार्गावर माळशेज घाट संपल्यावर खिरेश्वर गावाकडे जाण्याचा मार्ग आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या काठावर असलेल्या या गावात सुमारे ११०० वर्षांपूर्वीचे प्राचीन नागेश्वर महादेव मंदिर आहे. खिरेश्वर मंदिर अशीही त्याची ओळख आहे. पितृदोषाचे निराकरण करण्यासाठी हे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे.

दहाव्या शतकात शिलाहार वंशातील राजा झंज हा महादेवाचा परम भक्त होता. बारा ज्योतिर्लिंगांप्रमाणे त्याने आपल्या राज्यात गोदावरी व भीमा नद्यांच्या किनारी १२ महादेवाची मंदिरे बांधून घेतली. त्यातील नाशिक जिल्ह्यात ५, पुणे जिल्ह्यात ५ आणि नगर जिल्ह्यात २ अशी ही मंदिरे सारख्याच शैलीत असल्याचे दिसते. खिरेश्वरमधील नागेश्वर महादेव मंदिर हे यांपैकीच एक. ही सर्व मंदिरे स्थापत्यशास्त्रातील उत्तम कलाकृती आहे. कोकणातील पन्हाळे येथे सापडलेल्या ताम्रपटात या १२ मंदिरांचा उल्लेख असल्याने त्याला पुष्टी मिळते.

मुख्य मार्गावरून मंदिरात जाण्यासाठी एक लहानशी नदी ओलांडावी लागते. एरवी एक-दोन फूट पाण्याची पातळी असलेल्या या नदीतून पावसाळ्याच्या दिवसांत मात्र कमरेइतक्या पाण्यातून जावे लागते. या नदीपात्राच्या समोरच नागेश्वर महादेवाचे हे सुंदर मंदिर आहे. मंदिर काहीसे लहान असले तरी त्यातील शिल्पसौंदर्य वैशिष्ट्यपूर्ण आहे.

अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच्या दगडी नंदीवर नक्षीदार कलाकुसर केलेली दिसते. त्याच्या शेजारीच एक प्राचीन गणेशमूर्ती आहे. या शिवाय दोन विरगळी आहेत. (विरगळ म्हणजे गाव आणि गायींच्या रक्षणासाठी युद्ध करताना प्राण गमावलेल्या वीरांची त्रिकोणी दगडांवर शिल्परुपी कोरलेली कहाणी.) या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील द्वारपट्टीवर कोरलेले भलेमोठे शेषशाही विष्णूचे सुखासनातील शिल्प. एक मीटरपेक्षा जास्त लांबीच्या या शिल्पात विष्णूच्या डोक्याजवळ ब्रह्मा-विष्णू तर पायाजवळ लक्ष्मी आहे. अंतराळाच्या छताला १६ समभूज चौकोनांच्या शिल्पपटांमध्ये रेखीव नक्षी, भौमितिक स्तंभ यांचा कलात्मक वापर केला आहे. मूषकवाहन गणेश-गणेशिनी, ऋषभवाहन शिव-पार्वती, हंसवाहन ब्रह्मा-सरस्वती, मयूर-वाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेर-कुबेरी, मकरवाहन मदन-रती, अशी देव-देवतांची कोरीव शिल्पे या पटांतून दिसून येतात. शेषशाही विष्णूचा भरलेला दरबार आणि त्यासाठी उपस्थित देवदेवता, असा देखावा येथे शिल्पांतून दाखविण्यात आला आहे.

गर्भगृहात काळ्या दगडातील शिवलिंग व त्यावर वेटोळे घालून पंचधातूंची नागदेवता आहे. गाभाऱ्यातील कळसाच्या आतील घुमटाकार भागात अनेक कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गाभाऱ्यातील मागच्या भिंतीत असलेल्या कोष्ठकात विहार करणाऱ्या देवतेची मूर्ती आहे. याशिवाय मंदिराच्या बाहेरील भिंतीवरही देवकोष्ठके आहेत. एका भिंतीवर शिलालेख कोरण्यात आला आहे. या शिवाय मंदिराच्या परिसरात अनेक प्राचीन दगडी मूर्ती व शिवपिंडी पाहायला मिळतात.

खिरेश्वर मंदिर ज्या नदीच्या उगमावर आहे, त्या नदीचे पूर्वीचे नाव पुष्पावती असून, सध्या ती काळू नदी या नावाने ओळखली जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर लेण्या आहेत. त्या लेण्यांसमोर सुमारे दहा फूट खोल पाण्याची पात्रे आहेत. त्यामुळे लेण्या पाहण्यासाठी थेट जाता येत नाही. डागडुजीअभावी हे मंदिर काहीसे जीर्ण झाले असले तरी येथील अनेक शिल्पे अद्यापही आपले सौंदर्य टिकवून आहेत.


उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून १२५ किमी, तर जुन्नरपासून २७ किमी अंतरावर
  • मार्गात नदी ओलांडावी लागते
  • जास्त पावसाच्या दिवसांत येथे जाणे टाळावे
  • मुख्य रस्त्यापासून पायी दहा मिनिटांच्या अंतरावर
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home