नागेश्वर महादेव मंदिर,

आंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) यांची तपोभूमी व नागा बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येवला तालुक्यातील आंदरसूल येथे प्राचीन नागेश्वर महादेवाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की या मंदिरात असलेली सध्याची शिवपिंडी ही अगस्ती ऋषींनी स्थापित केलेली आहे. कोळगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात दोन गुंफा आहेत. त्यामध्ये जनार्दन स्वामी यांच्यासह अनेक साधूंनी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (औरंगाबाद) कन्नड तालुक्यात टापरगाव या लहानशा खेड्यात २४ सप्टेंबर १९१४ या दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जनार्दन स्वामींच्या स्वभावात लहानपणापासून देवाबद्दल श्रद्धा, माणसांबद्दल प्रेम, परोपकार आणि क्षमा या भावना होत्या. लहान वयातच त्यांनी धर्मजागृतीचा मार्ग निवडला. दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या जनार्दन स्वामींना भगवदगीता, भागवत आदींसह अनेक ग्रंथ मुखोद्‌गत होते. सर्वसामान्यांना सोप्या व ग्रामीण भाषेत अध्यात्माची महती पटवून देऊन वेदांचा अर्थ ते सांगत असत.

आंदरसूल येथील नागेश्वर महादेवाच्या मंदिरात त्यांनी १४ वर्षे तपश्चर्या केली. या काळात थोर संत नागाबाबा या मंदिरात वास्तव्याला होते. काही काळ जनार्दन स्वामींना त्यांचा सहवास लाभला. जनार्दन स्वामींनी अनेक दिवस सेवा केल्यानंतर नागा बाबांनी त्यांना विभूती मंत्र देऊन मौनगिरी नामाची दीक्षा दिली. असे सांगितले जाते की नागेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यात तपश्चर्या करीत असताना एके दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अचानक शिवपिंडीमधून त्यांना प्रकाश दिसू लागला. त्यावेळी साक्षात महादेवांनी जनार्दन स्वामींना दर्शन दिले. या शिव साक्षात्कारानंतर आंदरसूलच्या नागेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येऊ लागले.

कोळगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नागेश्वर मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे. मंदिराभोवती सुंदर उद्यान विकसित केल्याने मंदिराचे सौंदर्य खुलते. नदीपासून काहीसे उंचावर असलेल्या या संपूर्ण परिसराला तटबंदी असून सर्वत्र पेव्हरब्लॉक लावले आहेत. २०१८ मध्ये महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांनी जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. नागेश्वर मंदिराच्या शेजारी जनार्दन स्वामी यांची पर्णकुटी आहे. संपूर्ण माती व लाकडांचा वापर असलेली व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही पर्णकुटी भाविकांना पाहता येते. याशिवाय येथे जनार्दन स्वामी यांचे समाधी मंदिर आहे. या प्रांगणात विठ्ठल व श्रीदत्त यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे दिसायला नेहमीप्रमाणे असली तरी त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही मंदिरांच्या जोत्यामधून खाली गुंफेत जाण्यासाठी वाटा आहेत. तेथून आत काही पायऱ्या उतरून गेल्यावर गुंफा लागते. त्यामध्ये जनार्दन स्वामी व अन्य साधूंनी अनेक वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते.

सभामंडप व गर्भगृह अशी मुख्य मंदिराची रचना आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदी स्थित असून गाभाऱ्यात महादेवाची पिंडी आहे. या पिंडीवर पितळी आवरण केलेले दिसते. या स्थानाबद्दल असे सांगितले जाते की कितीही दुष्काळ पडला तरी येथे पाणीटंचाई होत नाही. आजूबाजूच्या गावांमधील विहिरींतील पाण्याने तळ गाठला तरी या देवस्थानात असलेल्या विहिरीत कायम पाणी असते.

राज्य सरकारकडून तीर्थस्थानाचा ‘ब’ दर्जा मिळालेल्या या मंदिरात महाशिवरात्र, दत्तजयंती, नवरात्र व गुरुपौर्णिमा हे दिवस उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी ५ व सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती होते. प्रत्येक सोमवारी सायंकाळी ८ ते १० या काळात रुद्राभिषेक करण्यात येतो. दत्तजयंतीला येथे अनुष्ठान करण्यात येतो. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना येथे भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


उपयुक्त माहिती:

  • येवल्यापासून १० किमी, तर नाशिकपासून ९३ किमी अंतरावर
  • येवल्यापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा
  • मंदिर परिसरात न्याहरीची सुविधा नाही
Back To Home