मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंढा नागनाथ हे प्राचीन शिवमंदिर भारतीय संस्कृती आणि अप्रतिम वास्तुकलेचा एक जिवंत वारसा आहे. हिंदू धर्मपरंपरेत भगवान शंकराच्या ज्या बारा ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या हिमालयापासून रामेश्वरमपर्यंत पसरलेल्या ज्योतिर्लिंगांच्या पवित्र शृंखलेत औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. तेराव्या शतकातील यादवांनी रचलेला भक्कम पाया, त्यानंतरच्या काळात मुघल आक्रमणाचे सहन केलेले घाव यांची साक्ष देणारे शिखर आणि संत नामदेवांच्या निस्सीम भक्तीचा सुगंध या सर्व गोष्टी या मंदिरास अद्वितीय बनवतात.
शिवपुराणातील ‘कोटिरुद्र संहिते’मधील २९ व ३०व्या अध्यायातील दारुका राक्षसीची कथा नागेश्वर लिंगाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे. ती अशी की प्राचीन
काळी ‘दारुकावन’ नामक घनदाट वनात दारुका नावाची एक राक्षसी पती दारुक राक्षसासह राहत होती. दारुका राक्षसीने देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले होते की ती जेथे जाईल तेथे हे जंगल तिच्यासोबत जाईल. परंतु, या शक्तीचा आणि वरदानाचा तिने दुरुपयोग करण्यास सुरुवात केली. ती, तिचा पती आणि त्याचे राक्षस सैन्य येथील लोकांना व ऋषीमुनींना त्रास देत असत. त्या काळात सुप्रिय नावाचा एक शिवभक्त वैश्य आपल्या सहकाऱ्यांसह या मार्गावरून जात होता. दारुका राक्षसीने सुप्रिय आणि त्याच्या इतर शिवभक्त सहकाऱ्यांना बंदी बनवून कारागृहात टाकले. सुप्रियने कारागृहातही आपली शिवभक्ती सोडली नाही. त्याने कारागृहात मातीचे शिवलिंग बनवले आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा अखंड घोष सुरू केला. त्याच्या निस्सीम भक्तीने आणि आर्त हाकेने प्रसन्न होऊन भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी सुप्रियला पाशुपतास्त्र प्रदान केले आणि दारुका राक्षसीचा वध करून भक्तांचे रक्षण केले. या वेळी भक्तांनी आणि देवतांनी भगवान शंकरांना विनंती केली की त्यांनी भक्तांच्या कल्याणार्थ येथेच कायमस्वरूपी वास्तव्य करावे. भक्तांच्या या विनंतीला मान देऊन भगवान शंकर येथे नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने स्थिर झाले. हे स्थान म्हणजे औंढा नागनाथ अशी भाविकांची श्रद्धा आहे.
एका आख्यायिकेनुसार, या मंदिराची स्थापना पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात केली होती. या काळात फिरत असताना पांडव येथील दारुकावनात आले. पांडवांकडे एक गाय होती, जी रोज एका विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्या आचळातून दुधाच्या धारा सोडून त्या जागेवर अभिषेक करत असे. हे जेव्हा भीमाने पाहिले तेव्हा कुतूहलापोटी त्याने तेथील जमीन उकरून पाहिली. त्या जागेत रक्ताचा प्रवाह लागला आणि त्याखाली एका स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले. त्यानंतर पाचही पांडवांनी मिळून तिथे एका भव्य, अखंड दगडी मंदिराची उभारणी केली.
संत साहित्यातील अनेक संदर्भांनुसार, संत शिरोमणी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर आणि अन्य संत मंडळींसह तीर्थयात्रेस गेले होते. त्या तीर्थयात्रेदरम्यान ते सर्व औंढ्या नागनाथ येथे आले. त्यावेळी नागनाथाच्या मंदिरासमोर संत नामदेव महाराज हरिकीर्तन करीत असताना तेथील काही कर्मठ सनातनी पुजाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. नामदेव महाराज हे शिंपी, त्या काळी शूद्र समजल्या जाणाऱ्या समाजाचे होते.
या सनातन्यांनी त्यांना जातीवरून हिणवले आणि मंदिरासमोर कीर्तन करण्यास मनाई केली. त्यांना त्यांनी मंदिराच्या मागील बाजूस पिटाळले. ‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केलेल्या माधव देशमुख लिखित ‘भारतीय साहित्याचे निर्माते नामदेव’ या पुस्तकात ही चमत्कारकथा अशी देण्यात आली आहे की त्यावेळी ‘नामदेवांबरोबरची सर्व भजनीमंडळी देवळापाठीमागे आली. नामदेवांची स्थिती भजनामध्ये ‘ब्रह्मानंदी लागली टाळी’ अशी झाली होती, तरी पण कीर्तनात पूर्वीसारखा रंग भरेना. नामदेवांच्या ही गोष्ट लक्षात आली. मोठ्या कळवळ्याने देवाला उद्देशून त्यांनी प्रार्थना केली. पूर्वी एकदा एका सुलतानाने नामदेवांना पकडून आणून त्यांच्या समक्ष गाईची कत्तल करविली तेव्हा ती गाय त्यांनी आपल्या भक्तिसामर्थ्याने जिवंत केली होती. या गोष्टीची आठवण करून नामदेव म्हणाले, ‘आतां कां निष्ठुर अंतरीं। न येसी लवकरी विठ्ठला? मजकडेस करून पाठीं। राउळीं बैसला धूर्जटी। आतां पाहूनि कृपादृष्टी। पाव जगजेठी मजलागीं।।’ नामदेवांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच पूर्वाभिमुख असलेले देऊळ फिरले आणि ते पश्चिमाभिमुख झाले.’ आजही या मंदिराचे तोंड पश्चिमेकडे आहे आणि नंदीची मूर्ती मंदिराच्या मागच्या बाजूला (पूर्वेकडे) आहे. सर्वसाधारणपणे शिवमंदिराचे तोंड पूर्वेकडे असते आणि नंदी समोर असतो, पण येथे नंदी मंदिराच्या मागील बाजूला आहे. ही विसंगती या आख्यायिकेला पुष्टी देते. नामदेवांनी ‘देऊळ फिरविले’ या घटनेचे वर्णन करणारे अनेक अभंग आजही वारकरी संप्रदायात गायले जातात.
याच मंदिराच्या परिसरात संत नामदेवांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आणखी एक महत्त्वाची घटना घडली. संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून, आपल्या मनातील सूक्ष्म अहंकाराचे निरसन करण्यासाठी आणि योग्य गुरूच्या शोधात नामदेव महाराज औंढा नागनाथ येथे आले. येथे ते थोर शैव पंथीय संत विसोबा खेचर यांच्याकडे गेले.
त्यावेळी विसोबा मंदिरात साक्षात शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून खुशाल झोपलेले. या अवस्थेत त्यांना पाहून नामदेव स्तिमित झाले. ते विसोबांना उद्देशून म्हणाले, ‘उठीं उठीं प्राण्या आंधळा तूं काय। देवावरी पाय ठेवियले।।’ तेव्हा विसोबा खेचर यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, की ‘माझे पाय म्हातारपणामुळे उचलत नाहीत, तूच माझ्या पायांना उचलून अशा ठिकाणी ठेव जिथे देव नाही.’ या विषयीचा अभंग ह.भ.प. दादा गोंदकर संपादित ‘संत नामदेवांची गाथा’मध्ये असा आहे, की ‘विसोबा खेचर बोले नामदेवा। उठविले जिवा का रे माझ्या? देवावीण ठाव रिता कोठे आहे। विचारूनी पाहें। नामदेवा जेथें देव नसे तेथें माझे पाय। ठेवीं पा अन्वय विचारूनी’ (अभंग क्र. २९६)
नामदेवांनी जेव्हा विसोबांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जिथे जिथे त्यांनी पाय ठेवले, तिथे तिथे त्यांना जमिनीतून शिवलिंग वर आलेले दिसले. दगड, माती, भिंती, सर्वत्र त्यांना शिवाची रूपे दिसू लागली. ‘नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव। कोठे रिता ठाव न देखेचि।।’ या चमत्काराने नामदेवांचे डोळे उघडले. त्यांना ‘ईश्वर केवळ मूर्तीत नसून तो चराचरात भरलेला आहे’ याची साक्षात् अनुभूती मिळाली.
त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांनी विसोबा खेचरांचे शिष्यत्व पत्करले. विसोबा खेचरांनी त्यांना उपदेश दिला की ‘नाम आणि रूप दोन्ही नाहीं जया। तोचि देव पाहीं येर मिथ्या। जळ स्थळ काष्ठ पाषाण पिंड ब्रह्मांड। अणु रेणू सर्वस्वी आपण साक्ष असे। हे जाणोनिया परते जाणे आपआपणीयातें। खेचर म्हणे नामयातें अवघाचि देव।।’ (अभंग क्र. २९८) नामदेवांना अशा प्रकारे उपदेश करणाऱ्या विसोबा खेचर यांचे समाधी मंदिर औंढ्या नागनाथ मंदिर परिसरात आहे. काही ऐतिहासिक स्रोतांनुसार त्यांची समाधी बार्शी येथे उत्तरेश्वर मंदिराच्या बाजूला आहे. त्यांची भेट आणि गुरुपदेशाचे स्थान मात्र औंढा नागनाथ हेच आहे. या घटनेमुळे औंढा नागनाथ मंदिरास वारकरी संप्रदायात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
या मंदिराचा लिखित आणि पुरातत्त्वीय इतिहास हा प्रामुख्याने तेराव्या शतकातील देवगिरीच्या यादव साम्राज्याशी जोडलेला आहे. देवगिरीच्या यादव राजांच्या सुवर्णकाळात महाराष्ट्रात कला आणि स्थापत्याची मोठी भरभराट झाली. यादव नृपती रामचंद्रराय यांचे पंतप्रधान हेमाद्री (हेमाडपंत) यांनी भूमिज स्थापत्यशैलीतील अनेक मंदिरे बांधली. त्यामुळे ती शैली त्यांच्या नावाने, हेमाडपंती शैली म्हणून प्रसिद्ध झाली. औंढा नागनाथ मंदिर हे याच शैलीतील स्थापत्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व विभागाच्या नोंदींनुसार, या मंदिराची उभारणी १२व्या ते १३व्या शतकाच्या दरम्यान झाली असावी. या काळात मराठवाड्यात आणि संपूर्ण दख्खनच्या पठारावर अनेक भव्य शिवमंदिरांची निर्मिती झाली, ज्यामध्ये औंढा नागनाथ हे अग्रगण्य आहे. परंतु, देशातील इतर अनेक प्राचीन मंदिरांप्रमाणेच हे मंदिरही काळाच्या ओघात अनेक आक्रमणांचे आणि विध्वंसाचे साक्षीदार राहिले आहे. विशेषतः मुघल राजवटीत, मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात या मंदिरावर मोठे आक्रमण झाले होते. ऐतिहासिक संदर्भांनुसार, मूळ मंदिर हे सात मजली होते आणि त्याची भव्यता डोळे दिपवणारी होती. परंतु आक्रमकांच्या हल्ल्यात मंदिराचा वरचा भाग, शिखरे आणि अनेक शिल्पे उद्ध्वस्त करण्यात आली. असे असले तरी मंदिराचा मूळ गाभारा, भक्कम दगडी भिंती आणि पाया इतका मजबूत होता की तो या भीषण आघातांना पुरून उरला आणि आजही अभेद्यपणे उभा आहे. आज मंदिराच्या वास्तूकडे पाहताना दोन भिन्न कालखंडांच्या स्थापत्यशैलींचे मिश्रण स्पष्टपणे दिसून येते.
मंदिराचा खालचा भाग जो यादवकालीन आहे, तो काळ्या पाषाणातील आणि कोरीव कामाचा आहे, तर वरचे शिखर हे विटा, चुना आणि गिलावा यांच्या वापरातून बनलेले मराठाकालीन शैलीचे आहे. शिखराचा हा भाग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धारित केला असल्याचे सांगितले जाते. मात्र होळकर संस्थानातील कागदपत्रांनुसार अहिल्याबाई होळकर यांनी या देवस्थानसाठी गंगेची कावड नेमून दिली होती व पूजेसाठी नेमणूक केली होती. होळकर संस्थानच्या कागदपत्रांत याचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे – ’१६-४-१७८४ रोजी किर्द मुक्काम महेश्वर यादी श्री औढा नागनाथाचे पुजनाचे काम सरकारातून वेदशास्त्रसंपन्न विठ्ठल भट्ट बिन लेंबकभट्ट उपनाम भोपी वास्तव क्षेत्र आमरत.. सरकारचे तीर्थ पुरोहित याचकडे सांगून बारमाही नेमणूक येणेप्रमाणे.’ या मंदिरासाठी अहिल्याबाईंनी ८१ रुपयांची नेमणूक देऊन त्यासाठी आंबड परगण्यातील महालाचे उत्पन्न लावून दिले होते.
डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य’ या पुस्तकात औंढा नागनाथ मंदिराचे वर्णन अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेले आहे. त्यांनी या मंदिराला मराठवाड्यातील मंदिर स्थापत्याचा ‘मेरुमणी’ आणि ‘देवालय-चक्रवर्ती’ अशा स्वरूपात गौरवले आहे.
या मंदिराची तुलना त्यांनी जगप्रसिद्ध वेरुळच्या कैलास लेण्याशी केली आहे. त्यांच्या मते, वेरुळचे शिल्पकार आणि औंढा नागनाथचे शिल्पकार एकाच परंपरेतील किंवा श्रेणीतील असावेत, इतके हे काम मिळतेजुळते आहे.
विस्ताराच्या आणि भव्यतेच्या दृष्टीने मराठवाड्यातील हे सर्वात मोठे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. मंदिराभोवती २० फूट उंचीची मजबूत तटबंदी आहे. त्यामुळे या मंदिराला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या तटबंदीत चार भव्य प्रवेशद्वारे आहेत. मुख्य मंदिर १२६ x ११८ फूट आकाराचे असून ते एका ५.५ फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराचे बांधकाम ‘ताराकृती’ आराखड्यावर आधारित आहे. मंदिराच्या सभामंडपातील आठ अष्टकोनी स्तंभांवर अतिशय नाजूक कलाकुसर आहे. यातील एक विशेष शिल्प म्हणजे एकाच आकृतीमध्ये तीन तोंडे आणि चार पाय दिसतात. हे शिल्प अशा पद्धतीने कोरले आहे की कोणत्याही एका बाजूने पाहिले असता ती आकृती एका पूर्ण व्यक्तीची किंवा प्राण्याची वाटते, पण दुसरी बाजू झाकली की ती वेगळी दिसते. हे शिल्प तत्कालीन कलाकारांच्या कल्पकतेची आणि कौशल्याची साक्ष देते.
देशातील अनेक मंदिरांमध्ये गर्भगृह हे सभामंडपाच्या पातळीवर किंवा थोडे उंचावर असते. मात्र, औंढा नागनाथ मंदिराचे मुख्य गर्भगृह जमिनीच्या खाली, तळघरात आहे. येथील नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना सभामंडपातून एका अरुंद आणि अंधाऱ्या वाटेने खाली उतरावे लागते. दोन खोल पायऱ्या उतरून आल्यावर एका लहानशा, शांत आणि गूढ खोलीत स्वयंभू शिवलिंग स्थित आहे. गर्भगृहात हवा खेळती राहावी आणि प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी भिंतींमध्ये विशिष्ट कवाडे आणि वायुविजन व्यवस्था आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि स्तंभांवर केलेले कोरीव काम अतिशय सुबक, गुंतागुंतीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या अधिष्ठानावर अखंड काळ्या पाषाणात कोरलेले गजथर, अश्वथर आणि नरथर आहेत. याशिवाय भिंतींवर दशावतारातील विविध प्रसंगांचे चित्रण, रामायण आणि महाभारतातील कथा,
यक्ष-यक्षिणी, अप्सरा आणि विविध भौमितिक नक्षीकाम आहे. शिव-पार्वती कैलास पर्वतावर बसले आहेत आणि रावण कैलास पर्वत हलवण्याचा प्रयत्न करत आहे (रावणानुग्रह मूर्ती) अशा प्रकारची पौराणिक कथा सांगणारी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराची शिखरापर्यंतची उंची ६० फूट आहे. चुन्यामध्ये बांधलेले त्यावरील पांढरे शुभ्र शिखर ३१ फूट उंचीचे आहे.
औंढा नागनाथ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात, परंतु महाशिवरात्री आणि विजयादशमी हे दोन उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. या काळात येथे भाविकांचा महासागर लोटतो. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची मोठी यात्रा असते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ‘रथोत्सव’ हे असते. या परंपरेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. लाकडापासून बनवलेल्या एका मोठ्या आणि सुशोभित रथात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची उत्सवमूर्ती ठेवली जाते. हा रथ विविधरंगी फुलांनी, वस्त्रांनी आणि विद्युत रोषणाईने सजवला जातो. रथाच्या चारही बाजूंना लाकडी कोरीव काम आहे. हे कोरीव काम मंदिरावरील शिल्पकलेशी मिळतेजुळते आहे. रथाला ओढण्यासाठी जाड दोरखंड लावले जातात आणि हजारो भाविक ‘हर हर महादेव’, ‘नागनाथ महाराज की जय’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषात हा रथ ओढतात. मंदिराच्या प्रांगणातून ही मिरवणूक निघते आणि गावातील प्रमुख मार्गांवरून वाजत-गाजत जाते. या वेळी ढोल, ताशे, लेझीम पथके आणि भजनी मंडळे रथाच्या पुढे असतात. महाशिवरात्रीला हजारो भाविक उपवास करून रात्रभर जागरण करतात आणि पहाटे शिवाची पूजा व रथाचे दर्शन घेऊन उपवास सोडतात.
श्रावण महिन्यात उत्तर भारत आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून ‘कावड’ घेऊन येणारे शिवभक्त (कावडिया) येथे पायी चालत येतात. ते पवित्र नद्यांचे जल कावडीतून आणून ज्योतिर्लिंगावर त्याचा जलाभिषेक करतात. यावेळी विशेष रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र आणि दुग्धाभिषेक यांसारखे धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर केले जातात. श्रावण महिन्यात देवाला एक लाख किंवा त्याहून अधिक बेलपत्र वाहण्याचा संकल्प अनेक भाविकांकडून केला जातो. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी देवाची पालखी काढली जाते. या दिवशीही मोठा उत्सव असतो. भगवान नागनाथाची पालखी वाजत-गाजत गावाच्या सीमेपर्यंत नेली जाते आणि तिथे सोने (आपट्याची पाने) लुटण्याचा कार्यक्रम होतो. याशिवाय, माघ महिन्यातही येथे मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये कृषी प्रदर्शन आणि जनावरांचा बाजार भरवला जातो. दररोज पहाटे ५.३० वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत भाविकांना नागनाथाचे दर्शन घेता येते.
मंदिर परिसरात सासू-सुनेची बारव नावाची एक पायऱ्यांची विहीर आहे. ही बारव मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. याच्या नावामागे सासू आणि सून यांच्यातील घरगुती नात्यांशी किंवा स्पर्धेशी संबंधित काही लोककथा स्थानिक पातळीवर प्रचलित आहेत. बारवेचे बांधकाम अत्यंत रेखीव असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सुंदर रचना आहे. मंदिराजवळच ‘हरिहर तीर्थ’ नावाचे एक प्राचीन कुंड आहे. ‘हरिहर’ हे नाव शिव (हर) आणि विष्णू (हरि) यांच्या ऐक्याचे प्रतीक आहे. भाविक दर्शनापूर्वी येथे हात-पाय धुतात किंवा स्नान करतात. मंदिराच्या समोरील बाजूला संत नामदेव महाराज यांचे मंदिर आहे. त्यात वीणा घेतलेली महाराजांची मूर्ती आहे.