नारोशंकर मंदिर पंचवटी

नाशिक शहर, ता. जि. नाशिक


एखाद्याला सांगितलेली गोष्ट त्याच्या पोटात राहत नसेल, म्हणजे ती लगेचच कर्णोपकर्णी होत असेल, तर त्या व्यक्तीला ‘नारोशंकराची घंटा’ म्हटले जाते. कारण त्या घंटेचा आवाज काही क्षणांत १० कोस दूर जात असल्याचे सांगितले जाते. या वाक्प्रचारात उल्लेख असलेली ही नारोशंकराची घंटा ज्या मंदिरात आहे, त्याचे नाव आहे ‘रामेश्वर मंदिर’. नाशिकमधील पंचवटी परिसरात, गोदावरीच्या काठी महादेवाचे हे पुरातन मंदिर आहे. पण ते ‘रामेश्वर मंदिरा’पेक्षा ‘नारोशंकराचे मंदिर’ म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे.

नाशिक हे ऐतिहासिक आणि पुराणात उल्लेख असलेले शहर! त्यामुळे इथे मंदिरांची मांदियाळी आहे. श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गोदावरी नदीच्या तीरावर, पंचवटी परिसरात हे मंदिर बांधलेले आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी शंकरभक्तांची येथे गर्दी असते. इतर दिवशीही भाविकांचा राबता असतोच.

नाशिकचे सरदार नारोशंकर राजे बहाद्दर यांनी इ.स. १७४७ साली हे मंदिर बांधले. त्या काळात हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल १८ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. हे मंदिर म्हणजे १७व्या शतकातील वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कारागीर आणण्यात आले होते. मंदिर हेमाडपंती, तसेच नागरी पारंपरिक स्थापत्यशैलीत बांधण्यात आले आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीला ‘माया’शैली असेही म्हटले जाते. मंदिराच्या सभोवतालच्या भिंतींवर अक्षय नागाचे कोरीव काम करण्यात आले असून या नागाचे महत्त्व म्हणजे, तो शंकराचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवतो. मंदिराची शांतता अबाधित राहावी आणि पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावे, या हेतूने मंदिराच्या सभोवताली एक भक्कम दगडी भिंत उभारण्यात आली आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी रजपूत शैलीतील छत्र्या उभारण्यात आल्या आहेत. या रचनेला ‘मेघडंबरी’ असेही म्हटले जाते. मध्यभागी असलेले नारोशंकराचे मंदिर कळसामुळे लांबूनच लक्ष वेधून घेते. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रचलित असलेल्या स्थापत्यशैलींचा एकत्रित वापर हे मंदिर बांधण्यासाठी करण्यात आला आहे, हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य!

या मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. दगडी भिंतीत असलेल्या नदीकाठच्या दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो. भिंतीवर छोट्या छोट्या देवळ्यांमध्ये विविध मूर्ती दिसतात. मंदिरात जाण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत. मंदिराची रचना पारंपरिक, म्हणजे सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंदिर थोडे उंचावर असल्याने पायऱ्या चढून गेल्यावर आधी नंदीमंडप लागतो. नंदीच्या दर्शनानंतर सभामंडपात प्रवेश करता येतो. सभामंडपात विविध देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावर सिंहासनावर बसलेल्या गणेशाची, उत्तम कलाकुसर केलेली मूर्ती आहे. सभामंडपात पुरेसा प्रकाश येण्यासाठी नक्षीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरदेखील उत्कृष्ट नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहातील शिवलिंग अतिशय प्राचीन आहे. त्याची पूजा केल्यानंतरच सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचा दिवस सुरू होत असल्याचे सांगितले जाते. शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी माशाचे शिल्प कोरण्यात आले आहे.

नारोशंकर मंदिराचे मुख्य शिखर २६ मीटर उंचीचे असून त्यावर पौराणिक प्रसंग, हत्ती, सिंह या प्राण्यांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. मंदिराच्या बाहेरील भागावरही अनेक शिल्पे आणि मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मोत्यांच्या माळा घातलेल्या मोरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराच्या मागील बाजूस व इतर दोन बाजूंना हत्तींचे नक्षीकाम आहे. मंदिरावर वाघ, माकड यांच्याही प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत.

मंदिरावर नारोशंकराची आणि मराठ्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून टांगलेली घंटा मराठी भाषेतला एक वाक्प्रचार बनली आहेच, पण ती नाशिकच्या सांस्कृतिक जीवनाचादेखील अविभाज्य भाग बनली आहे. इ.स. १७२१ मध्ये तयार केलेली ही घंटा वसईच्या किल्ल्यात असलेल्या चर्चमध्ये होती. पोर्तुगीज कारागिरांनी काशाच्या धातूमध्ये घडवलेली ही मोठी घंटा आहे. या घंटेचा लोलक १० किलो वजनाचा आहे. ही घंटा थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजीअप्पा पेशवे यांनी पोर्तुगिजांविरुद्ध इ.स. १७३८मध्ये वसईमध्ये मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. ते युद्ध जिंकल्यानंतर एकूण तीन घंटा महाराष्ट्रात आणण्यात आल्या. त्यांपैकी एक नाशिकच्या नारोशंकर मंदिरात; दुसरी भीमाशंकर मंदिरात, तर तिसरी घंटा सासवड येथील भैरवनाथ मंदिरात आहे.

नारोशंकराच्या मंदिरावर असलेली ही घंटा आजही सुस्थितीत असून ती पर्यटकांच्या व भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इ.स. १७५७मध्ये नाशिकला स्थायिक झाल्यावर नारोशंकरांनी ती मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवली. नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह म्हणूनही या घंटेचा वापर करण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रत्येक कागदपत्रावर या घंटेचे चित्र पाहायला मिळते. इ.स. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला, त्या वेळी घंटेला पाणी लागून घंटानाद झाल्याचे सांगितले जाते. आजही ‘गोदावरीच्या महापुराचा मापक’ म्हणून या घंटेची ओळख आहे. मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. त्या दिवशी मंदिराला देखणी सजावट केली जाते. पहाटेपासूनच मंदिरात महापूजा, महाआरती, अभिषेक अशा सगळ्या विधींना सुरुवात होते.


उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरातील, पंचवटी परिसरातील मंदिर
  • एसटी तसेच महापालिका परिवहन बसची सुविधा
  • राज्यातील अनेक भागांतून एसटी, रेल्वे या सेवा उपलब्ध
  • खासगी वाहनाने मंदिरापर्यंत जाण्याची सोय
  • परिसरात निवास व खानपानासाठी अनेक पर्याय
Back To Home