मुर्डेश्वर मंदिर

रिठद, ता. रिसोड, जि. वाशिम

भगवान शंकराच्या आत्मलिंगाचा एक भाग अशी मान्यता असलेल्या शिवलिंगाचे स्थान म्हणून रिठद येथील मुर्डेश्वर मंदिर ओळखले जाते. पद्मपुराणानुसार दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरास श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरणांचा स्पर्श झालेला आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, या मंदिरात श्रीरामाने शिवपूजा केली होती. राज्य सरकारच्या वाशिम जिल्हा संकेतस्थळावर असे म्हटले आहे की श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रांची माहिती गोळा करणारे अयोध्येतील एक पथक येथे आले होते. त्यांनी तयार केलेल्या नकाशामध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.

स्थानिक आख्यायिकेनुसार, रिसोडच्या पंचक्रोशीत प्राचीन काळी अनेक वटवृक्ष होते. त्या वृक्षांखाली बसून अनेक ऋषी तपस्या करीत असत. त्यामुळे या भागास ऋषीवट असे म्हणत असत. त्याचाच अपभ्रंश पुढे रिसोड असा झाला. संतांची भूमी आणि रंगारी लोकांचे शहर म्हणूनही रिसोड ओळखले जाते. याच तालुक्यातील रिठद म्हणजे रिद्धपूर येथे त्रेतायुगापासून मुर्डेश्वर महादेवाचे स्थान असल्याचे सांगण्यात येते. या स्थानाबद्दलची पौराणिक आख्यायिका अशी की भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची प्राप्ती करून अमरत्व मिळवण्यासाठी राक्षसराज रावणाने घोर तप केले. त्या तपाने शंकर प्रसन्न झाले. त्यावेळी रावणाने त्यांच्याकडे वर म्हणून आत्मलिंगाची मागणी केली. शंकराने ती मान्य केली, परंतु त्याच वेळी रावणास एक अट घातली. ती अशी की हे आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवायचे नाही.

स्वर्गातील देवी-देवतांना ही बाब समजताच सर्वजण अस्वस्थ झाले, कारण यामुळे रावणास अमरत्व प्राप्त झाले असते. तेव्हा त्यांनी विघ्नहर्त्या गणेशाची करूणा भाकली. रावणाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले, तर त्यातील सर्व शक्ती पुन्हा शंकराकडे येईल व त्यास अमरत्व मिळणार नाही; तेव्हा गणेशाने त्यास ते जमिनीवर ठेवायला भाग पाडावे, असे या देवी-देवतांनी सांगितले. त्यानुसार एका लहान बालकाचे रूप घेऊन गणेश रावणाजवळ गेले. त्यावेळी रावणाची सायंप्रार्थनेची वेळ झाली होती. तो हा प्रार्थनेचा नियम कधीच मोडत नसे. परंतु हातात आत्मलिंग असल्याने प्रार्थना कशी करायची असा प्रश्न त्यास पडला. तेव्हा त्याने त्या बालकास विनंती केली की प्रार्थनाविधी होईपर्यंत काही काळ हे आत्मलिंग हातात धर. त्यावेळी बालकाच्या वेशातील गणेशाने रावणास एक अट घातली की हे आत्मलिंग जड होऊ लागले, तर तो रावणास हाक मारील. तीनदा हाक मारूनही रावण आला नाही, तर मात्र ते लिंग जमिनीवर ठेवीन. रावणाने त्यास होकार दिला. परंतु रावण प्रार्थना आटोपून परत येण्याच्या आतच गणेशाने ते लिंग जमिनीवर ठेवले. रावणास ते हलवता येईना. तेव्हा रागाने त्याने त्या आत्मलिंगाचे तुकडे केले. देशात अनेक ठिकाणी ते जाऊन पडले. त्यातील एक तुकडा रिठद या ठिकाणी पडला, तेच हे मुर्डेश्वराचे स्थान होय. कालांतराने तेथे एक मंदिर उभारण्यात आले. शिवपुराणात हीच कहाणी वैद्यनाथेश्वर शिवलिंगाची कहाणी म्हणून आली आहे. शिवपुराणानुसार, रावणास लघुशंका आली म्हणून त्याने हातातील शिवलिंग एका गोपालक मुलाकडे सोपवले व ते त्याने खाली ठेवले. ते तेथेच स्थित झाले व वैद्यनाथेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले.

या मंदिराविषयीची आणखी एक आख्यायिका अशी की वनवास काळात असताना प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह या भागात आले होते. त्यावेळी त्यांना मुर्डेश्वर मंदिर दिसले. तेव्हा ते येथे शिवशंकराची पूजा करण्यासाठी आले असताना त्यांना दिसले की स्वयं श्री महादेव येथे तपस्या करीत आहेत. श्रीरामाची चाहूल लागताच महादेवाने वळून त्यांच्याकडे पाहिले. त्यामुळे या मंदिरातील शिवलिंगाची दिशा बदलली व शाळुंकेतील जलमार्ग पूर्ववाहिनी झाला.

हे मंदिर रिठद येथे नदीतीरी मोठ्या परिसरात वसले आहे. मंदिराच्या प्रांगणास मोठे प्रवेशद्वार आहे. त्याच्या छतावरील कमानीमध्ये बन्सीधर श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस गोमातांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारानजीक उंच दगडी चौथऱ्यावर सिमेंटचा रुंद गोलाकार स्तंभ आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला अलीकडे बांधलेले गणेशाचे मोठे मंदिर आहे. गुर्जर-राजस्थानी स्थापत्यशैलीत उभारलेल्या या सुंदरशा मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात एका लाकडी अधिष्ठानावर गणेशाची पंचधातूची मोठी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या मागच्या बाजूस उंच ओट्यावर गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

मुर्डेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच स्वतंत्र नंदीमंडप आहे. त्यात नंदीची काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती विराजमान आहे. मंदिराची वास्तू उंच जगतीवर, आधुनिक बांधकामशैलीत उभारलेली आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंती शैलीचे होते असे सांगण्यात येते. अलीकडच्या काळात झालेल्या जीर्णोद्धारानंतर त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. भव्य सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.

सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर वरच्या भागामध्ये हनुमानाची नमस्कार मुद्रेतील मोठी मूर्ती बसवलेली आहे. सभामंडप समतल छत असलेला आणि प्रशस्त आहे. समोरच गर्भगृह आहे. सभामंडपातून त्यास प्रदक्षिणा घालता येते. गर्भगृहाच्या समोरच्या भिंतीवर वरच्या भागातील देवळीमध्ये गणेशाची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात खाली उतरून जावे लागते. आत भूतलावर मुर्डेश्वराची मोठी पिंडी प्रतिष्ठापित आहे. पिंडीस रुंद व गोल शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी पाषाणाचे मोठे लिंग आहे. गर्भगृहावरील शिखर मराठा स्थापत्यशैलीतील व कलाकुसरयुक्त आहे. त्यातील देवकोष्टकांत विविध देवदेवतांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात एका उंच संगमरवरी चौथऱ्यावर श्रीरामाच्या पादुकांचे स्थान आहे.

मुर्डेश्वर महादेवाच्या मंदिरात दर सोमवारी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मंदिरात श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीस मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे गणेशचतुर्थीप्रमाणेच अन्य हिंदू सण-उत्सवही उत्साहाने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • रिसोड येथून २ किमी अंतरावर
  • वाशिम येथून १७ किमी अंतरावर
  • रिसोड व वाशिम येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीच्या सुविधा आहेत
Back To Home