मुक्तिधाम मंदिर,

नाशिक रोड, ता. नाशिक

नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले मुक्तिधाम मंदिर हे फार पुरातन नसले, तरी येथील कलात्मकता व मंदिरातील मूर्तींमध्ये जाणवणारा जिवंतपणा हा या मंदिराचा विशेष आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे, १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतींची स्थापना! मूळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगांच्या आकाराचीच शिवलिंगे त्या-त्या ठिकाणी नेऊन, पवित्र करून आणून येथे त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अशी की श्रीराम, सीता व लक्ष्मण वनवासात असताना पंचवटीला जाण्याअगोदर या मंदिराच्या भागात विश्रांतीसाठी थांबले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेवरच हे मुक्तिधाम मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या दर्शनाने चार धाम यात्रा (चार धाम यात्रा केल्याने जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळते, असे मानले जाते) केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नाशिक रोड उपनगरात स्थित असलेल्या या मुक्तिधाम मंदिराचे बांधकाम इ. स. १९६८ साली श्री. जे. डी. चौहान या दानशूर उद्योजकाच्या पुढाकाराने केले गेले. ते मूळचे मिस्त्री समाजाचे व कच्छ भागातील होते. ते ‘बिटको’ या कंपनीचे संस्थापक होते. मंदिराचे काम पूर्ण होण्यास चार वर्षांचा कालावधी लागला होता. मंदिराला लागणारे संगमरवरी दगड राजस्थानातील मकराना या भागातून खास मागविण्यात आले होते.

या मंदिराच्या बांधणीत उत्तर भारतीय पद्धतीतील नागर शैली वापरण्यात आली आहे. या शैलीनुसार मंदिरात वेगळा गर्भगृह नसतो, तर थेट सभामंडपातच मूर्तींचे प्रत्यक्ष दर्शन घडते. या मंदिराला एकूण पाच कळस पाहावयास मिळतात. राजस्थानच्या १०० कारागिरांना खास बोलावून घेऊन या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.

मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला साईबाबांची सुबक मूर्ती आहे. मंदिरातील भिंतींवर दोन्ही बाजूंना भगवद्‌गीतेतील १८ अध्याय कोरलेले आहेत. मुख्य मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीत जिवंतपणा जाणवतो. या मंदिरात महाभारत व श्रीकृष्णाच्या जीवनावरील वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे (प्रसंगचित्रे) रेखाटण्यात आली आहेत. प्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून ही चित्रे साकारली आहेत.

मंदिरात विष्णू, लक्ष्मी, राम-सीता-लक्ष्मण, दत्त, जलाराम बाप्पा अशा अनेक देवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत. वैकुंठधाम, बद्रीनाथधाम, कार्तिक स्वामी मंदिर, नवनाथ दरबार, सत्यनारायण भगवान, महालक्ष्मी मंदिर, दुर्गामंदिर, जोतिर्लिंग, काशी विश्वनाथ, कृष्ण मंदिर, हनुमान मंदिर यासह आणखी देवांची मंदिर येथे पाहायला मिळतात.

मंदिरातील प्रत्येक मूर्ती तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेने आणि अलंकारांनी सजविलेली असून या सगळ्याच मूर्ती सुबक वाटतात. दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर प्रदक्षिणेसाठी म्हणून एक मार्ग तयार करण्यात आला आहे. प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या बाहेरील भिंतीवर दिसणारे नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या आवारात विसाव्यासाठी भरपूर जागा आहे. प्रसाद, नारळ, हार यांची बरीच दुकाने मंदिर-परिसरात दिसतात. विशेषतः सुका मेवा विक्री करणारी दुकाने येथे मोठ्या प्रमाणात आढळतात.

रामनवमी, गोकुळाष्टमी, कार्तिक स्वामींची जयंती, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, नवरात्र, दसरा, दिवाळी, श्रावणी सोमवार अशा महत्त्वाच्या सणांच्या दिवशी येथे उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी पूर्ण मंदिर फुलांनी सजविले जाते. मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात. संपूर्ण देवदर्शन करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.

मंदिराचा सर्व कारभार खासगी ट्रस्टतर्फे चालविण्यात येतो. मंदिराच्या उजव्या बाजूला भक्तिनिवास आहेत. त्यामध्ये माफक दरात दररोज २०० भाविकांच्या निवासाची सुविधा होऊ शकते. मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक बस स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • एसटी व महापालिका परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home