नाशिक जिल्ह्याचे ‘नंदनवन’ अशी ख्याती असलेले निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावरील ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव खऱ्या अर्थाने रामायण घडण्यास कारणीभूत ठरले. असे सांगितले जाते की, याच गावात श्रीरामांनी कांचन मृगाचे रूप घेतलेल्या मायावी मारीच राक्षसावर बाण मारून त्याचे खूर तोडले होते आणि त्याच वेळी साधू वेशात येऊन रावणाने पंचवटीतून सीतेचे हरण केले होते. या घटनेची आठवण म्हणून येथील ‘मृगव्याधेश्वर मंदिर’ प्रसिद्ध आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की आपल्या वनवासकाळात श्रीराम-लक्ष्मण-सीता नाशिक येथील पंचवटी परिसरात काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी रावणाचा मामा मारीच राक्षसाने कांचन मृगाचे रूप घेतले व तो श्रीराम-सीता-लक्ष्मण ज्या पर्णकुटीत राहत होते त्या परिसरात आला. कांचनमृगाचा दरवळणारा सुगंध, त्याची सुवर्ण कांती, लकाकणारे डोळे पाहून सीतेला त्या हरणाचा मोह झाला व तिने श्रीरामांकडे त्या हरणासाठी हट्ट धरला. श्रीरामांना ते हरीण मायावी आहे हे माहिती असूनही पत्नीहट्टासाठी त्यांनी धनुष्य व बाण घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. गोदावरीच्या तीरावरून श्रीरामांना हुलकावणी देत ते मायावी मृग ‘नांदूर मध्यमेश्वर’ गावापर्यंत गेले. मायावी मृग नजरेच्या टप्प्यात आल्यावर श्रीरामांनी त्याच्यावर बाण सोडला. तो बाण मृगाचे रूप घेलेल्या मारीच राक्षसाच्या पायाला लागून त्याचे खूर तुटले. घायाळ झालेल्या मारीच राक्षसाने रामाच्या आवाजात ‘लक्ष्मणा मला वाचव’ असा आवाज काढल्याने सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या रक्षणासाठी पाठविले व त्याचवेळी रावणाने कपटाने सीतेचे हरण केले. या घटनेमुळे पुढचे रामायण घडले व त्याची आठवण म्हणून ‘नांदूर मध्यमेश्वर’ येथे ज्या ठिकाणी मृगाचे खूर तुटले तेथे मृगव्याधेश्वर मंदिराची व जेथून श्रीरामांनी बाण मारला तेथे बाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मृगव्याधेश्वर मंदिराजवळच खूर तुटलेल्या मृगाचे समाधी स्थळही आहे.
सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. तेथून पुढे नांदूर मध्यमेश्वर हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता, हे येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. खानगावथडीतून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या रस्त्यानेही नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. पक्षी अभयारण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या ‘नांदूर मध्यमेश्वरा’चा उल्लेख ‘मृगव्याधेश्वर मंदिरा’मुळे अनेक ग्रंथांमध्येही येतो.
मंदिर परिसर प्रशस्त असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडप आहे. मुख्यद्वारातून प्रवेश केल्यावर सभामंडपात दगडी कमानी असलेली रचना दिसते. तेथून अंतराळात प्रवेश केल्यावर हा भाग कोरीव कामांनी सजलेला दिसतो. सभागृहाच्या द्वारपट्टीवर गणेश प्रतिमा, तर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले दिसते. याशिवाय येथे वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम पाहायला मिळते. अंतराळापासून काहीसे खाली असलेल्या गर्भगृहात महादेवाची शुभ्र पिंड आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर फारशी कलाकुसर नसली तरी या मंदिराचा कळस मात्र कोरीव कामांनी सजलेला दिसतो. कळसाच्या बाजूला २ मिनार असून कळसावर अनेक देवदेवता व संतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.
नांदूर मध्यमेश्वर गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यामध्ये गोदावरीच्या पात्रात असलेले गंगा मध्यमेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, सिद्धेश्वर महादेव ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला या गावामध्ये उत्सवाचे स्वरूप असते. मृगव्याधेश्वर मंदिरात यावेळी दोन दिवस जत्रा असते. याशिवाय रामनवमी व श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.