सात बहिणी आणि त्यांचा एक धाकटा भाऊ यांच्या पूजनाची परंपरा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात तसेच गोव्यामध्ये आजही कायम आहे. मोर्जी गावात स्थायिक असलेली मोरजाई ही गोव्यातील सात बहिणींपैकी एक भगिनी आहे. मोरजाई ही मोरजी गावची माता म्हणजेच ग्रामदेवता मानली जाते. देवीचे येथे भव्य मंदिर वसले आहे. गोवा आणि कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कावी कलेचे उत्तम नमुने या मंदिरात पाहावयास मिळतात. त्यामुळे हे मंदिर धार्मिक महत्त्वाबरोबरच मंदिर अभ्यासक आणि पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.
हिंदू लोकधर्मामध्ये सात बहिणी आणि त्यांचा भाऊ या आठ भावंडांना महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील चौल येथे सात बहिणींची मंदिरे आहेत. चंपावती, शीतला, एकवीरा, पद्मावती, कळलागी, हिंगुळज आणि चतुर्सिती या नावाने या देवता ओळखल्या जातात. तेलंगणात पेड्डम्म, इसोदम्म, मरीअम्म, अंकम्म, एल्लम्म, नकुलम्म आणि अरिकम्म अशी त्यांची नावे आहेत, तर आंध्र प्रदेशात पोलेरम्म, अंकम्म, मुधिलम्म, दिल्लीपोलासी, बंगारम्म, माथम्म व रेणुका या नावाने त्या ओळखल्या जातात. कर्नाटकातील म्हैसुर भागात या सात बहिणींचा देवता परिवार मरीभगिनी म्हणून ओळखला जातो. तेथे त्यांच्या बंधुचे नाव पोट्टू राझू असे आहे. गुजरातमध्ये अवाल, जोगाल, तोगल, होलबाय, बीजबाय, सोसाय आणि खोडियार या नावांनी त्यांची पूजा केली जाते.
गोव्यामध्ये ही भावंडे केळबाई, महामाया, शीतला देवी, मीराबाई ऊर्फ मिलाग्रेस, अजदीपा, लईराई आणि मोरजाई व त्यांचा भाऊ खेतोबा (खेतलो) या नावाने संबोधली जातात. या आठही देवता कदंब राजवटीच्या काळात गोव्यात आल्याचे सांगण्यात येते. पारंपरिक श्रद्धेनुसार, ही भावंडे ऋषी अपत्ये होती व त्यांच्यावर काही संकटे आल्याने आश्रयार्थ गोव्यात आली होती. या विषयी आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी ही आठ भावंडे काशीहून तीर्थयात्रा करीत गोव्यातील डिचोली येथे हत्तीवर बसून आली.
तेथे शांतादुर्गा देवीकडे ते पाहुणचारासाठी थांबले. त्यावेळी शांतादेवीने त्यांना मयेगाव येथे जाऊन वास्तव्य करण्यास सांगितले. तेव्हा तेथून ही भावंडे मयेगावच्या वडणे या ठिकाणी आली. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. त्या स्थानाला आज ‘सात मायेची बसका’ असे म्हणतात. यानंतर केळबाई मयेगाव येथे, तर तिच्या आज्ञेने मीराबाई म्हापसे येथे, अजदीपा अंजदीप बेटावर, शितलाई समुद्रतटी, म्हामाई मूळगावी, मोरजाई मोरजी येथे व खेतोबा वायंगणी येथे वास्तव्य करू लागले. मोरजाईचे भव्य मंदिर आजही मोरजी येथे स्थित आहे.
स्थानिक नाममाहात्म्य कथेनुसार, मोरजी या गावाचा आकार मोरासारखा असल्याने देवीस मोरजाई असे नाव पडले. येथील मोरजाईचे स्थान शेकडो वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास मात्र अज्ञात आहे. गावातील मोठ्या भूखंडावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिर प्रांगणास आवारभिंत आहे. प्रांगणात प्रवेश करण्यासाठी तीन दिशांनी मोठी कमानदार प्रवेशद्वारे आहेत. तर एका बाजूस पूर्वीच्या काळी असलेले महाद्वार अद्याप जतन करून ठेवलेले आहे. लाल चिऱ्याच्या दगडांत बांधलेल्या या महाद्वारावर नगारखाना आहे.
सध्या या महाद्वाराच्या पुढे मोठा रंगमंच बांधण्यात आलेला आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आणि पाच स्तरीय दीपस्तंभ आहे. हे मंदिर गोव्यातील अन्य काही मंदिरांप्रमाणेच भव्य आणि गोमंतकीय स्थापत्यशैलीतील आहे. या मंदिराचे सर्वांत लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील कावी कलेतील (स्ग्रॅफिटो) नक्षीकाम. खासकरून कोकण आणि गोवा प्रांतात आढळणारी ही वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. यात प्रथम भिंतीवर लाल मातीचा गिलावा केला जातो. त्यावर चुन्याचा गिलावा दिला जातो. हा चुन्याचा गिलावा ओला असतानाच, त्यात अशा प्रकारे कोरीव नक्षीकाम केले जाते की आतील लाल रंग उठून दिसावा. मोरजाई मातेच्या प्राचीन मंदिराच्या बाह्यभिंतींवर, गवाक्षांच्या कमानींवर, आतील स्तंभांवर, तसेच वितानावरही अशा प्रकारे कावी काम केलेले होते. जीर्णोद्धारातही ते नक्षीकाम कायम ठेवलेले आहे.
मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाचे प्रवेशद्वार भव्य व उंच आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन कमी रुंदीची छोटी प्रवेशद्वारे आहेत. मुखमंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील भागात सूर्यनारायणाचे उठावशिल्प आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आणि दुमजली आहे.
अर्धखुल्या प्रकारच्या या सभामंडपाच्या बाह्य बाजूस कमी उंचीचे कठडे लावलेले आहेत. येथून डावीकडून आणि उजवीकडून काही फूट अंतर सोडून चौकोनाकार स्तंभ उभारलेले आहेत. त्यावर सज्जा बांधलेला आहे. सभामंडपातील स्तंभांवर देवीच्या विविध रुपांतील प्रतिमा लावलेल्या आहेत. या सभामंडपातून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपात प्रवेशासाठी मोठी अर्धगोलाकार कमान बांधलेली आहे. या कमानीवर, तसेच तिच्या बाजूस असलेल्या स्तंभांवर कावी कलेतील नक्षीकाम केलेले आहे. अर्धमंडपात बाजूने सोप्यासारखी रचना केलेली आहे. येथे एका बाजूस देवीचा मखर ठेवलेला आहे. या अर्धमंडपाच्या आतील स्तंभांवर, भिंतींवर व छतावरही कावी कलेतील नक्षी कोरलेली आहे. यातही मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस कावी कला प्रकारात रंगवलेल्या दोन द्वारपालांच्या तसेच मयूरांच्या प्रतिमा लक्षणीय आहेत. गर्भगृहाच्या कमानदार प्रवेशद्वारास दोन्ही बाजूंनी दगडी स्तंभ आहेत. कमानीच्या मध्यभागी, ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे.
या मंदिराचे गर्भगृहही मंदिराच्या भव्यतेस शोभेल असे प्रशस्त आहे. त्यात डाव्या आणि उजव्या भिंतींपासून काही अंतर सोडून भव्य गोलाकार स्तंभ आहेत.
हे स्तंभ कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. या कमानींवर, तसेच गर्भगृहाच्या गजपृष्ठाकार छतावर नक्षीकाम केलेले आहे. येथे एका आडव्या मोठ्या तुळईवर पितळेच्या मोठमोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. समोरच्या बाजूस असलेल्या स्तंभांना खेटून द्वारपालांच्या दोन उंच मूर्ती आहेत. आत संगमरवरी वज्रपीठावर मोरजाई मातेची काळ्या पाषाणात कोरलेली, महिषासूरमर्दिनी स्वरूपातील उभी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. हाती त्रिशुल धारण केलेल्या या देवीच्या मूर्तीस वस्त्रालंकारांनी मढवलेले आहे. या मुख्य मूर्तीच्या पुढ्यात देवीची एक छोटी मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या सभामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे. गर्भगृहावर, वर निमूळते होत गेलेले षटकोनी शिखर आहे. त्यावर अष्टकोनी आमलक व त्यावर उंच कलश आहे. या शिखराच्या चारही बाजूंना चार छोटे कलश उभारलेले आहेत. या मंदिराच्या डावीकडे महादेवाचे एक मोठे मंदिर उभारलेले आहे. तसेच उजव्या बाजूस द्वारपालाचे मंदिर आहे.
नवरात्रोत्सव हा मोरजाई मातेच्या मंदिरातील सर्वांत महत्त्वाचा उत्सव होय. नऊ दिवसांचा हा उत्सव येथे भव्य प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात येथे देवपूजा, सप्तशतीपाठ, कीर्तन, पालखी मिरवणूक, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. रोज पूजेच्या सांगतेच्या वेळी येथे भक्तगणांनी आपापल्या परीने आणलेल्या पंचखाद्य प्रसादाचे सर्वांना वाटप केले जाते. मंदिरात दरवर्षी देवशयनी आषाढी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या काळात दर सोमवारी सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० या कालावधीत भजन झाल्यानंतर देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. याशिवाय या मंदिरात विविध सणसमारंभही भक्तिभावाने साजरे केले जातात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की देवीचा प्रसाद कौल घेतल्यास आपल्या समस्या, अडचणी सुटतात. त्यामुळे येथे उत्सवकाळात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी जमते.