मोरया गोसावी मंदिर

चिंचवड, जि. पुणे


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला लागून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चिंचवड गाव आहे. या गावात १३७५ साली मोरया गोसावी या गणपतीच्या परमभक्ताचा जन्म झाला. संत मोरया गोसावी यांच्या समाधीमुळे येथील मोरया गोसावी देवस्थान प्रसिद्ध आहे. गणपतीचा जयजयकार करताना ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ असे जे म्हटले जाते ते या मोरया गोसावींमुळेच!

मंदिराबाबत आख्यायिका अशी की श्री वामनभट्ट व त्यांची पत्नी पार्वतीबाई यांनी पुत्रप्राप्तीसाठी मोरगावच्या मयुरेश्वराकडे संकल्प करून अनुष्ठान प्रारंभ केले. चार तप (४८ वर्षे) अनुष्ठान केल्यानंतर मयुरेश्वर त्यांच्यासमोर प्रगट झाले व म्हणाले, ‘वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन. मयुरेश्वराच्या कृपेने काही दिवसांनंतर पार्वतीबाईंना इ. स. १३७५ माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवण्यात आले. सर्वजण प्रेमाने त्याला मोरया म्हणत. वयाच्या आठव्या वर्षापासूनच बाल मोरया रोज त्रिकाल संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्नी उपासना, अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. तेच हे महान संत मोरया गोसावी.

संत मोरया गोसावी मूळचे मोरगावचे. त्यांनी थेऊर येथे जाऊन चिंतामणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. त्यानंतर ते थेऊरहून मोरगावला आले आणि परिसरातील गोर-गरिबांची मदत करू लागले. अल्पावधीतच मदतीसाठी त्यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे ध्यानधारणेसाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. म्हणून मग त्यांनी चिंचवडनजीकच्या ताथवडे गावातील किवजाईच्या म्हणजेच आताच्या केजुबाई मंदिरात वास्तव्य केले. तरीही दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगावला ते दर्शनासाठी जात. वयाच्या ११७ व्या वर्षीपर्यंत त्यांचा हा क्रम अखंड सुरू होता. नेहमीप्रमाणे मोरया मोरगावला दर्शनासाठी गेले असता मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला, ‘वयोपरत्वे प्रवासात तुझे फार हाल होतात. ते मला पाहवत नाही. यापुढे मोरगावात तू येऊ नकोस. मीच चिंचवडला येतो.’ दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला अर्घ्य देताना त्यांच्या हातात शेंदरी रंगाची तांदळा स्वरूपातील गणपतीची मूर्ती प्रगट झाली. त्याचवेळी आकाशवाणी झाली, ‘हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील.’ तेव्हापासून ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ हा जयघोष प्रचलित झाला.

कऱ्हा नदीत सापडलेली मूर्ती मोरया गोसावींनी चिंचवड येथील देऊळवाड्यात आणून प्राणप्रतिष्ठापित केली. वयाच्या १८६ व्या वर्षी मोरया गोसावींनी मयुरेश्वराकडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मयुरेश्वराने त्यांना परवानगी दिल्यानंतर त्यांनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी, इ. स. १५६१ मध्ये चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या समाधीनंतर त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी येथे गणेशमूर्तीची स्थापना केली. याच गणेशमूर्तीखाली श्री मोरया गोसावी आजही संजीवन समाधीस्त आहेत, असे सांगितले जाते.

आजचे मोरया गोसावी गणपती मंदिर १६५८ ते १६५९ या काळात पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. मोरया गोसावी यांच्या समाधीच्या समोरच श्री चिंतामणी महाराजांची खोल गुंफेत समाधी आहे. त्या जागेवरही द्विभूज गणेशमूर्ती आहे. पवना नदीकाठी चिंच आणि वडाच्या वनराईमध्ये मोरया गोसावी देवस्थान वसले आहे. मंदिर परिसरात काळ्या घडीव दगडांची फरसबंदी आहे. सभामंडपातून गर्भगृहात पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाचा आतील भाग अष्टकोनी असून त्या पुढील सभामंडप चौकोनी आहे. गर्भगृहाचे छत हेमाडपंती पद्धतीचे आहे. चिंतामणी महाराजांच्या समाधी मंडपातून पश्चिमेला एका छोट्या खिडकीतून पाहिले की थेट मोरया गोस्वामी समाधी मंदिरातील गणपतीचे दर्शन होते. तसेच खाली पाहिले असता गुंफेत असलेल्या चौरस खोलीमध्ये चिंतामणी महाराजांची समाधी दिसते.

मोरया गोसावी यांच्या सात पिढ्यांमधील देवत्व लाभलेल्या सत्पुरुषांच्या सात समाध्या या मंदिर परिसरात आहेत. याच परिसरात श्रीकोठेश्वर नावाची जुनी उत्तराभिमुख मूर्तीही आहे. मंदिरात वर्षभर अनेक कार्यक्रम होत असतात. हे सर्व कार्यक्रम देऊळ वाड्यामध्ये होतात. देऊळ वाड्यातील मोरया गोसावींची मूर्ती वर्षातून एकदा मोरगावला नेण्याची परंपरा आहे. देवस्थानाशेजारीच पवना नदीवर घाट तयार करण्यात आला आहे.

मोरया गोसावी देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशवे काळापर्यंत अनेक सनदा प्राप्त झाल्या होत्या. मोरया गोसावींची पुण्यतिथी हा येथील मोठा उत्सव असतो. मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत त्यानिमित्त भाविकांची गर्दी असते. रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या दिवसांमध्ये मोरया गोसावी संस्थानतर्फे भाविकांना महाप्रसाद दिला जातो. यावेळी परिसरात दिव्यांची सुंदर आरास केली जाते. दररोज सकाळी ६ ते दुपारी १ व सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पुणे रेल्वे स्थानकापासून १८, तर वाकड बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • पुणे व पिंपरी चिंडवडच्या अनेक भागांतून पीएमपीएमएलची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतातपरिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ७७६८८ ८११३३
Back To Home