मोदी गणपती मंदिर

नारायण पेठ, पुणे


नारायण पेठेतील मध्यवर्ती भागात पत्र्या मारुती मंदिराकडून नदीपात्रात जाण्यासाठीच्या मार्गावर उभे असलेले पुरातन मोदी गणपती मंदिर सर्वश्रुत आहे. हे सुमारे २०० वर्षांपूर्वीचे आहे. मोद म्हणजेच आनंद. आनंद, उत्साह देणारा गणपती म्हणून या गणपतीचे नाव ‘मोदी गणपती’ पडले असावे, असे सांगितले जाते.

पुण्यातील एखादा कौलारू वाडा भासावा, अशी मंदिराची रचना आहे. कळस पाहताक्षणीच नजरेत भरतो. गणपतीला प्रिय असलेले शमीचे झाडही आवारात आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी मारुतीचे छोटे मंदिर आहे. मुख्य मंदिरात लाकडी सभामंडप आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. त्यात गणेशाची अनेक चित्रे लावली आहेत. त्यात चार युगांमधील गणपतींची माहिती आहे. याशिवाय येथील खांबांवर विविध भाषेत ओम लिहिण्यात आले आहेत. तेथेच १८६९ – ७२ या काळातील पुणे शहराचा नकाशाही आहे. गाभाऱ्यातील मखरात सुमारे तीन ते साडेतीन फूट उंचीची पितळी चतुर्भुज उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. यावर सेंदूर लेपन झालेले असल्याने मूर्तीचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही.

मोदी गणपती या नावाबाबत असे सांगितले जाते की मुळचा गुजरातचा असणारा खुश्रूशेठ मोदी हा दुभाषक पेशव्यांच्या दरबारात दुभाषी म्हणून काम करत होता. पेशव्यांच्या इंग्रजांबरोबरच्या वाटाघाटी करण्यात त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे पेशव्यांनी त्याला अनेक गावे बक्षीस म्हणून दिली होती. इंग्रजांकडून तो पगार घेत असे. या खुश्रूशेठने नारायण पेठेमध्ये भव्य वाडा व सुंदर बाग उभारली होती. ही बाग आजही मोदीबाग म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे या खुश्रूशेठ मोदीचा गुढ मृत्यू झाला.

त्याच सुमारास रत्नागिरीमधून एक भट आडनावाचे ब्राह्मण रोजीरोटीच्या शोधात पुण्यात आले होते. पेशवाईत त्यांना आश्रय मिळाला. याच भट घराण्यातील व्यक्तीला या मोदी बागेत स्वयंभू गणपती मूर्ती सापडली. त्यांनी तेथेच एका पारावर या गणपतीची स्थापना केली. पुढे १८६८ मध्ये या पाराभोवती मंदिराचे बांधकाम करण्यात आल्याची नोंद आहे. मोदीच्या बागेत सापडल्यामुळे त्याचे नामकरण मोदी गणपती असे झाले असावे, असेही सांगितले जाते. आजही हे मंदिर येथील भट घराण्याच्या मालकीचे आहे.
१८६९ सालापासून या मंदिरात पुराणाचे वाचन सुरू झाले. ती परंपरा आजतागायत सुरू असून रोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत येथे पुराणाचे वाचन होते. हा गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी येथे येणाऱ्या भाविकांची दृढ श्रद्धा आहे. दररोज शेकडो भाविक या गणेशाच्या दर्शनाला येत असतात. अनेकांची तर दिवसाची सुरुवात या गणेशाच्या दर्शनाने होते. वर्दळीच्या ठिकाणी असूनही येथे मनाला भावेल अशी शांतता आहे. या गणपतीला बोंबल्या गणपती, सिद्धिविनायक गणपती, तसेच विवाह विनायक या नावांनीही ओळखले जाते. पुणे महापालिकेच्या ‘अ’ दर्जा असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांच्या यादीत या मंदिराचा समावेश केलेला आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन या गणेशाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यातील वर्दळीच्या भागातील प्रसिद्ध मंदिर
  • रिक्षा व पीएमपीएमएल बसने मंदिरापर्यंत जाता येते
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home