मोदकेश्वर गणपती पंचवटी

नाशिक, जि. नाशिक


महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ वरदविनायकांपैकी एक असलेले स्वयंभू गणेशाचे मंदिर नाशिक येथील गोदावरीच्या काठावर आहे. ‘मोदकेश्वर गणपती मंदिर’ या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. मंदिराच्या स्थापनेचा निश्चित कालावधी नसला तरी साधारण ४०० ते ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. नाशिकमधील जागृत व प्राचीन मंदिरांमध्ये याची गणना होते. गणेशपुराण, पंचवटी-यात्रा दर्शन, गोदावरी माहात्म्य यात ‘मोदकेश्वरा’चा उल्लेख आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की एकदा देवांनी अमृताने भरलेला मोदक विशेष श्रद्धेने शंकराकडे दिला. शंकराने तो मोदक कैलास पर्वतावर आणला, परंतु गणेश आणि स्कंद यांच्यात या मोदकावरून भांडण झाले. यावेळी शंकराने त्यांच्यातील वादावर तोडगा काढत त्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गणेशाला तो मोदक प्राप्त झाला. हाच मोदक घेऊन गणेश आकाशमार्गे भ्रमण करत करत नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्याच्या हातातील मोदक खाली पडला. मोदकासाठी परीक्षा द्यावी लागली होती, शिवाय आवडता पदार्थ असल्याने तो खाली पडल्यामुळे गणेश खाली उतरला, याची आठवण राहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेशमूर्तीच्या स्वरूपात तेथे वास्तव्य केले. असे सांगितले जाते की, येथील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार ही गणेशमूर्ती त्यांना सापडली. त्यांनीच या जागेवर छोटेखानी मंदिर बांधून या गणेशाची स्थापना केली. या गणेश मूर्तीचा आकार मोदकाप्रमाणे असल्याने पुढे हे ठिकाण ‘मोदकेश्वर मंदिर’ म्हणून प्रचलित झाले. आज क्षेमकल्याणी घराण्यातील आठवी पिढी या मंदिराची व्यवस्था पाहत आहे.

नाशिकमधील पंचवटी परिसरात गोदावरी नदीच्या काठावर गाडगेबाबा महाराज धर्मशाळेजवळ ‘मोदकेश्वरा’चे हे मंदिर आहे. नाशिकचे ग्रामदैवत म्हणूनही या गणपतीचा प्रथम मान आहे. मोदकेश्वर गणपती मंदिराचा मूळ गाभारा चार खांबांच्या मध्ये आहे. त्यामध्ये शेंदूर विलेपित मोदकेश्वराची मूर्ती आहे. प्रातःकालची कोवळी किरणे मोदकेश्वराच्या मूर्तीवर पडतात. मंदिराच्या मागे प्रदक्षिणा मार्गावर, रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. या मंदिराला लागूनच काशी विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पिता-पुत्रांचे इतके जवळचे सान्निध्य असणे, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच येथील देवकोष्ठकांत (देवतांच्या मूर्ती स्थापित करण्यासाठी मंदिराच्या आत किंवा बाहेरील भिंतींवरील कोनाडे) विष्णू, गजलक्ष्मी, हनुमानासह राम-लक्ष्मण-सीता, विठोबा यांच्या मूर्ती आहेत. श्री मोदकेश्वर मंदिराच्या जागेवर पूर्वी जमिनीत पाषाणाचे मोदक सापडत असत. तसेच या गणेशाच्या उदरात हिरे, माणिक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरात दररोज सकाळी महापूजा, आरती केली जाते. अनेक भाविक शुभकार्याप्रसंगी, कार्यारंभी येथे दर्शनासाठी येतात. दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, भाद्रपद आणि माघातील उत्सवाच्या वेळी चांदीचे दागिने, डोळे, मुकुट अशा विविध अलंकारांनी मोदकेश्वराला सजविले जाते. गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. त्या काळात विशेष महापूजेचे आयोजन केले जाते. भाविकांना प्रसाद म्हणून मोदक दिला जातो. यावेळी भाविक मोठ्या संख्येने या गणेशाच्या दर्शनाला येतात. त्याचबरोबर पर्जन्यवृष्टीसाठी करण्यात येणारे गणेश याग, सहस्त्रावर्तने या कार्यक्रमातही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गोदावरी नदीत स्नान केल्याने शरीरशुद्धी होते, तर मोदकेश्वराच्या दर्शनाने चित्तशुद्धी होते, अशी गणेशभक्तांची धारणा आहे. सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत भाविक मोदकेश्वराचे दर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती:

  • गोदावरीच्या पश्चिम तीरावर ‘नाव दरवाजा’जवळ मंदिर
  • एसटी तसेच महापालिका परिवहन बसची सुविधा
  • राज्यातील अनेक भागांतून रेल्वे सेवा उपलब्ध
  • खासगी वाहनाने मंदिरापर्यंत जाण्याची सोय
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home