म्हाळसाकांत खंडोबा मंदिर

धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे



बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा व सागाच्या देवराई यांसाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गसमृद्ध आंबेगाव तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण स्थळ म्हणजे धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिर. माघ पौर्णिमेला या ठिकाणी भरणारी यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांचे हे कुलदैवत आहे.
मंदिराबाबत अशी अख्यायिका आहे की थोर भक्त तांबेबाबा यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन निमगावहून खंडोबा धामणी शिरदाळे गावात येण्यासाठी निघाले. पण, तांबेबाबा यांच्या मनात शंका आल्याने त्यांनी देव खरेच आपल्यामागे आहेत का, हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले. तांबेबाबांच्या त्या कृतीमुळे खंडोबा तेथेच अंतर्धान पावले आणि काही क्षणांतच त्या ठिकाणी ईश्वररूपी सागाचे एक रोपटे उगवले. या परिसरात आता सागाचे मोठे वन तयार झाले आहे आणि आता त्याची ख्याती ‘सागदरा’ म्हणून सर्वदूर पसरली आहे. या सागदऱ्यातील वृक्ष व पानालाही कोणी हात लावत नाही.
ब्रिटिश राजवटीत एक प्रसंग घडला. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सागदऱ्यातील झाडे तोडण्याचे फर्मान काढले. त्यासाठी तो मजुरांचा मोठा फौजफाटाही घेऊन आला. त्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झाडांवर एकामागे एक घाव पडू लागले. त्याच वेळी चमत्कार घडला. ब्रिटिश अधिकाऱ्यासह मजुरांच्या पोटात असह्य वेदना होऊन, ते जमिनीवर अक्षरश: गडबडा लोळू लागले. काही जणांना तर उलट्या होऊ लागल्या. झाल्या प्रकाराने ब्रिटिश अधिकारीही अचंबित झाला. त्यालाही वाटू लागले की, आपल्या हातून काहीतरी अघटित घडले आहे. अखेर तो ग्रामस्थांना शरण गेला. ग्रामस्थांनीही मोठ्या मनाने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला माफ केले आणि सागदऱ्यातील खंडोबाची महती सांगितली. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्याने सागदरा परिसराचे धार्मिक महत्त्व ओळखून गॅझेटमध्ये सागदऱ्यातील सागाची झाडे ही देवराई आहे आणि त्याला कोणीही हात लावू नये व त्यांचे रक्षण करावे, असा आदेश काढला. त्याची नोंद सरकारदरबारी असल्याचे सांगण्यात येते.

शिरदाळेतील ग्रामस्थांनी या सागदऱ्यात जाण्यासाठी दगड, सिमेंट यांचा वापर करून भक्कम पायऱ्या बांधल्या आहेत. तसेच रस्त्याला मजबूत असा संरक्षक कठडाही आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होतो. म्हाळसाकांतच्या या मूळ स्थानावर आता भव्य मंदिर आहे. कळसाचे सुंदर नक्षीकाम, आकर्षक रंगरंगोटी यांमुळे हे मंदिर प्रेक्षणीय झाले आहे. मंदिराच्या आवाराला संरक्षक तटबंदी आहे आणि त्यावर भलामोठा जय मल्हार हा फलक लावण्यात आला आहे.

जत्रेसह अन्य सण, उत्सवांच्या दिवशी म्हाळसाकांताच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर प्रशासनाने भलामोठा सभामंडप बांधला आहे. त्यामुळे भाविकांचे ऊन, पावसापासून संरक्षण होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच भव्य व उंच दीपमाळ आहे. मुख्य मंदिरात प्रवेश केल्याबरोबर नजरेस पडते ती म्हाळसाकांत म्हणजे खंडेरायाची भव्य मूर्ती. शेजारीच म्हाळसाई व बाणाई आहेत. तीनही मूर्तींना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. कासव, नंदी व देवाचा श्वान यांच्या मूर्तीही येथे आहेत.

शिरदाळे ग्रामस्थ या सागदऱ्यातील खंडोबाची नित्यनियमाने पूजा-अर्चा करतात. माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी सागदऱ्यात दोन दिवसांची यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दोन दिवसांच्या या सोहळ्यात बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा आणि करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवाची सुरुवात देवास हारतुरे वाहून, पूजा-अर्चा करून होते. तसेच बैल आणि बैलगाडा मिरवणूक, नवसाच्या बैलगाडा शर्यती, छबिना आणि पालखी सोहळा होतो.

मुख्य उत्सवाच्या दिवशी धामणी गावातील भगत कुटुंबीयांना दैनंदिन पूजा आणि व्यवस्थापनाचा मान असतो. उत्सवाच्या आदल्या रात्रीपासून भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. उत्सवात जागरण गोंधळ घालण्यासाठीही अनेक भाविक येथे येतात. यावेळी खंडोबाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून जातो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नवसाचे बैलगाडे आणि गाडीबगाड यांची मोठी मिरवणूक गावातून काढली जाते. हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आवर्जून उपस्थित राहतात.

 

उपयुक्त माहिती:

  • राजगुरूनगरपासून २४ किमी; तर
  • पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर
  • गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत नेण्याची व्यवस्था
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home