म्हाळसा देवी मंदिर

पिंपळवाड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव 

विष्णूचे मोहिनी रूप आणि खंडोबाची पत्नी असलेल्या म्हाळसा देवीचे प्रसिद्ध मंदिर चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड येथे आहे. खान्देशची कुलस्वामिनी अशी मान्यता असलेली ही देवी पश्चिम महाराष्ट्र, गोवा तसेच उत्तर भारतातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. खान्देशातील अनेक नवविवाहीत दाम्पत्ये या देवीचा आशिर्वाद घेऊन आपल्या संसाराची सुरूवात करतात. नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या मंदिरातील जागृत म्हाळसा देवी ही नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे

श्रीमद्‌भागवत महापुराणातील अष्टम स्कंधामधील उल्लेखानुसार, खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. या अवतारात म्हाळसाई आणि बाणाई या दोघी त्याच्या पत्नी होत्या. त्यापैकी म्हाळसाई ही त्याची पहिली पत्नी. म्हाळसाईला जोगेश्वरी आणि भैरवी या नावानेही ओळखले जाते. मोहिनी अवतार म्हणूनही म्हाळसाई प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्यावेळी दैत्यांकडून अमृत मिळविण्यासाठी विष्णूने मोहिनीचे (सुंदर स्त्री) रूप धारण करून दैत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. मोहिनीच्या सौंदर्यावर भाळलेल्या दैत्यांनी आपल्याकडील अमृतकुंभ विष्णूरूपी मोहिनीकडे दिले. त्यामुळे सर्व देवांना अमृत प्राशन करता आले. मात्र त्याचवेळी मोहिनीच्या अलौकिक रूपावर देवही भाळले होते.

एके दिवशी महादेवाने विष्णूकडे मोहिनीरूप दाखवण्याचा हट्ट धरला. विष्णूने त्याला नकार दिला. मात्र काही केल्या महादेव ऐकेना. अखेर विष्णूने महादेवासाठी पुन्हा मोहिनी रूप धारण केले. मोहिनीचे ते रूप पाहून महादेव तिच्यावर मोहित झाले. त्यावेळी मोहिनीने पार्वतीच्या देहात प्रवेश केला. पार्वतीचे मोहिनीसारखे रूप पाहून महादेवाने तिलाम्हाळसाअसे नाव दिले. जेव्हा महादेव मोहिनीरूपाला पाहून तिच्याकडे आकर्षित झाले, त्यावेळी मोहिनीने महादेवास आश्वासन दिले, की भविष्यात जेव्हा तुम्ही मार्तंडभैरव रूपात (खंडोबा) पृथ्वीवर अवतार घ्याल, तेव्हा मी म्हाळसा रूपाने अवतार घेऊन तुमची पत्नी होईन.

नेवासे बुद्रुक येथे तिमशेठ या नावाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते. तिमशेठ महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या घरी म्हाळसाईने जन्म घ्यावा, असे महादेवाने तिला सुचवले. एके दिवशी तिमशेठ पूजाविधीत तल्लीन असताना त्याच्यासमोर देवी पार्वती प्रकट झाली. पार्वतीने तिमशेठला डोळे मिटण्यास सांगितले. त्याने डोळे मिटल्यावर पार्वतीने बाळरूप धारण केले. तिमशेठने या मुलीचे नावम्हाळसाअसे ठेवले. ती उपवर झाल्यावर एका रात्री महादेवाने तिमशेठ यांच्या स्वप्नात येऊन म्हाळसाचा खंडोबासोबत विवाह लावण्यास सांगितले. महादेवाने सांगितल्यानुसार पौष पौर्णिमेला खंडोबा म्हाळसाचा विवाह सध्याच्या सातारा जिल्ह्यातील पाली येथे पार पडला होता. हे सर्व विष्णूच्या ज्या मोहिनी रूपामुळे घडले ते मोहिनी रूप अनेक ठिकाणी म्हाळसा देवी म्हणून पूजले जाते. त्यातीलच देवीचे एक महत्त्वाचे प्रसिद्ध ठिकाण पिंपळवाड येथे आहे.

पिंपळवाड गावाच्या सीमेवर म्हाळसा देवीचे मंदिर आहे. कमानीयुक्त प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात एक लहानसे हनुमान मंदिर अनेक प्राचीन मूर्तींचे अवशेष आहेत. मुख्य मंदिरासमोर एक हवनकुंड आहे. सभामंडप, अंतराळ प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीशा उंच जगतीवर असलेल्या या मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या एका उंच चौथऱ्यावर संगमरवरी नंदीची मूर्ती आहे. येथून एका कमानीकृती दरवाजातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात प्रदक्षिणामार्ग सोडून मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. येथे एका उंच वज्रपिठावर देवीच्या चांदीच्या पादुका आहेत. त्यापुढे म्हाळसादेवीची मूर्ती आहे. साडीचोळी नेसवलेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकूट आहे. मूर्तीच्या मागील भिंतीवर दोन वाघांची शिल्पे देवीवर चांदीचे छत्र आहे

नवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. नवविवाहित जोडपी या वेळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य ओटी घेऊन येतात. या उत्सवादरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे या संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पौष पौर्णिमेला खंडोबा म्हाळसा यांचा विवाह पार पडला होता. त्या दिवशीही येथे उत्सव साजरा केला जातो

उपयुक्त माहिती

  • चाळीसगाव येथून २१ किमी, तर जळगाव येथून १२८ किमी मार्गावर
  • चाळीसगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : वसंत देशमुख, मो. ८३७८८९०६१७,
  • राहुल देशमुख, मो. ९७६३९५५४१८
Back To Home