अश्वत्थामा बळीर्व्यासो हनुमांश्च विभीषणः॥
कृपाः परशुरामश्च सप्तैतै चिरंजीविनाः ॥
सप्तैतान सस्मरेन्नित्यम मार्कण्डेयमथमथमम्
जीवेद्वर्षशतम् सोपी सर्वव्याधिविवर्जिताः ॥
या स्तोत्रात सात चिरंजीवी विभूतींचा उल्लेख आहे. त्यात अश्वत्थामा, महाबली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम यांचा समावेश आहे. त्यासोबत आठवा क्रमांक मार्कंडेय ऋषींचा असल्याची मान्यता आहे. मार्कंडेय ऋषींचे सद्य वास्तव्य उत्तराखंडात मार्कण्डेय तीर्थ स्थानी असल्याची मान्यता आहे. या ऋषींची भारतात शेकडो मंदिरे आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर सोलापूर शहरात सिद्धेश्वर पेठ येथे आहे. येथील मार्कंडेयांच्या दर्शनाने दुःख, व्याधी दूर होऊन दीर्घायुष्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
१९२४ साली नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात पद्मशाली समाजाच्या वतीने कुलदैवत मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत नारळी पौर्णिमेला मार्कंडेय ऋषींचा रथोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू आहे. मार्कण्डेय पुराणातील कथेनुसार ऋषी मृकंद व त्यांची पत्नी मनस्विनी यांच्यापोटी महादेवाच्या आशीर्वादाने सद्गुणी, नीतिमान व प्रज्ञावंत परंतु अल्पायुषी मार्कंडेयांचा जन्म झाला. उपजत बुद्धीने मार्कंडेयाने चार वेद, अठरा पुराणे व सर्व शास्त्रांचे
ज्ञान अवगत करून घेतले. परंतू सोळाव्या वर्षी त्यांचा मृत्यू होणार असल्याने आई वडील दुःखी व चिंताग्रस्त राहू लागले. मार्कंडेयाला आई वडिलांच्या दुःखाचे कारण कळले तेव्हा तो एका उंच पर्वतावर जाऊन शिवपिंडीला मिठी मारून तपस्या करू लागला. त्याच्या मृत्यूची घडी येताच यम मार्कंडेयाचे प्राण हरण करण्यासाठी पर्वतावर आले. यमाने फेकलेला फासा मार्कंडेयासहीत शिवपिंडीला वेढला गेल्याने महादेव क्रोधित झाले व त्यांनी यमाचे प्राण हरण केले. त्यामुळे त्रिखंडात हाहाकार माजला. सर्व देवांच्या विनंतीवरून महादेवाने यमाला पुनर्जीवित केले व मार्कंडेयाला अमरत्वाचे वरदान देऊन चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला.
शहरातील सिद्धेश्वर पेठ या गजबजलेल्या परिसरात रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिरास अलीकडील काळात बांधलेली तटबंदी आहे. त्यापुढे आणखी एक दुमजली तटबंदी आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वातायने आहेत. प्रवेशद्वारावर सज्जा व दोन्ही बाजूला तटबंदीच्या दर्शनी भिंतीत सिंहशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर पूर्वी नगारखाना होता.
प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या व इमारती आहेत. या इमारतीत पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय व भक्तनिवास आहे. येथे अन्नछत्र व स्वयंपाकघर देखील आहे. प्रांगणातील दोन्ही बाजूच्या इमारतींना जोडून लोखंडी तुळईची रचना आहे. त्यावर लोखंडी पत्र्याचे छत आहे. अशा तऱ्हेने प्रांगणात मोठ्या सभामंडपाची रचना करण्यात आलेली आहे. पुढे सुमारे चार फूट उंच अधिष्ठानावर अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. अंतराळात येण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत.
प्रवेशद्वारास पिरॅमिड आकारातील चार चौकोनी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास चार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत व त्या कमानींवर पद्मनक्षी आहेत.
अंतराळाचे छत स्तंभ व भिंतींवर तोललेले आहे. वितानावर काचेची मिनाकारी सजावट व छताला पितळी घंटा आहे. अंतराळात मध्यभागी जमिनीवर कासवमूर्ती व त्यापुढे चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या पाठीवर झुल व गळ्यात घुंगरमाळा कोरलेल्या आहेत. अंतराळात मेजावर पद्मपादुका व देवाचा चांदीचा मुकुट आहे. हा मुकुट दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या डोक्यावर ठेऊन आशीर्वाद दिला जातो. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. मंडारकावरील चंद्रशिळेवर किर्तीमुख आहे. प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. हे गर्भगृह बंदिस्त स्वरूपाचे आहे व त्याच्या अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावरील सुवर्ण मखरात शिवपिंडी व त्यासमोर भक्ती मुद्रेतील मार्कंडेय ऋषींची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे. गर्भगृहातून तळघरात असलेल्या ध्यान मंदिरात जाण्यासाठी भुयार सदृश पायरीमार्ग आहे. ध्यान मंदिरातील भिंतीत दोन देवकोष्टके आहेत. त्यातील एका कोष्टकात श्रीभावना ऋषी व भद्रावती देवी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत.
तळघरातून अर्धप्रदक्षिणा घालून एका द्वाराने मंदिराच्या बाहेर पडता येते किंवा पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी दुसऱ्या द्वारातून गर्भगृहासमोर निघणारा पायरीमार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गाची ही रचना अनोखी आहे. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखरावर खालील बाजूला पद्मदलमंडळ नक्षी व वर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
श्रावण पौर्णिमा हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मार्कंडेय ऋषींचा रथोत्सव साजरा केला जातो. रथोत्सवाची परंपरा सुमारे शंभर वर्षे जुनी आहे. पहिल्या वर्षी चार तासात आटोपलेली ही रथ मिरवणूक आज जवळपास २४ तास चालते. या मिरवणुकीसाठी मंदिर समितीने सुमारे १९५४ साली सागवानी लाकडात बनविलेला रथ आजही वापरला जातो. सुरूवातीला देवाच्या पादुका रथात ठेवून मिरवणून काढली जात असे. हल्ली देवाची उत्सव मूर्ती रथात ठेवून मिरवणूक काढण्यात येते. शहरातील हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात.
महाशिवरात्री, चैत्र पाडवा, श्रावण मास, दसरा, दिवाळी आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, नाटिका, नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, एकादशी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. दररोज सकाळी ६ ते रात्री ८.४५ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेता येते.