मरिमाता मंदिर

सौंदळा, ता. तेल्हारा, जि. अकोला

साथीच्या रोगांचे निवारण करणारी, उग्र प्रवृत्तीची देवता मानल्या गेलेल्या मरीमातेचे प्रसिद्ध मंदिर तेल्हारा तालुक्यातील सौंदळा या गावात आहे. प्राचीन काळापासून येथे वसलेल्या मरीमातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणाऱ्या या जागृत देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येथे येतात. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी येथे भरणाऱ्या यात्रेदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेदरम्यान नवस फेडण्यासाठी काट्यांवर लोटांगण घालण्याची, तसेच शरीरात नाडा टोचण्याची प्रथा आहे.
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, मुळात मरी म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. पूर्वी प्राणघातक असलेल्या या साथीच्या रोगाची एक देवी कल्पून ती मरीआई या नावाने पूजली जाते. ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशा नावांनी ती प्रदेशपरत्वे ओळखली जाते. मरीप्रमाणेच जरी म्हणजे तापाची साथ या रोगाच्या देवीस जरीआई म्हणतात. या जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेर असते. तिच्या पुजाऱ्यास पोतराज वा पोतुराजा म्हणतात. त्यास कडकलक्ष्मी असेही म्हणतात. ते मरीआईचा देव्हारा घेऊन गावोगाव फिरतात. पोतराज हा मरीआईचा भगत असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. मरीआईला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट टळते, अशी लोकश्रद्धा आहे.
देवीची मूर्ती शेंदूरचर्चित किंवा लाकडात घडवलेली असते. अनेक भागांमध्ये तिच्यासमोर कोंबडे, रेडा, बकरा आदी प्राण्यांचे बळी दिले जातात. तिच्या यात्रेदरम्यान अनेक भाविक नवसपूर्ती झाल्यावर शरीरात दाभण टोचून घेणे, विस्तवावरून अनवाणी चालणे आदी शरीरक्लेश करून घेतात. सौंदळा येथील मरीमातेचे हे मंदिर अत्यंत प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. कालौघात या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाले. अलिकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
सौंदळा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराभोवती उंच आवारभिंत आहे. सुमारे १५ पायऱ्या चढून या मंदिराच्या आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ येता येते. दर्शनमंडपाप्रमाणे रचना असलेल्या या दुमजली प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर चार स्तंभ आहेत. हे स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूस कक्षासनांची रचना आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भिंतीवर मयूरचित्रे काढलेली आहेत व त्यावर दीपकोष्टकांची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात चहुबाजूंनी असलेल्या आवारभिंतींमध्ये ओवऱ्यांसारखी रचना आहे. प्रांगणात मध्यभागी उंच अधिष्ठानावर देवीचे मंदिर आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराराच्या अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे सभामंडपाच्या दर्शनी भागात असलेले चार स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. आटोपशीर असलेल्या या सभामंडपाच्या पुढील भागात गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर देवीचे स्थान आहे. या वज्रपिठावर देवीच्या सात शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहेत. त्यावर डोळे, नाक व ओठ कोरलेले आहेत. या वज्रपिठाच्या मध्यभागी असलेल्या देवकोष्टकात गणपतीची प्राचीन शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या छतावर स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. या कठड्याच्या मध्यभागी गर्भगृहावर असलेल्या नक्षीदार शिखरात कमळपुष्पाच्या आकाराचे आमलक व त्यावर कळस आहेत.
जागृत देवीच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येथे येतात. येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी येथे देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी विदर्भातील अनेक भागांतील तसेच छत्तीसगड व मध्य प्रदेशसारख्या राज्यांतूनही हजारो भाविक येतात. यात्रेच्या आदल्या दिवशी गावात शेगडी मिरवणूक काढण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता गावातून देवीची मिरवणूक निघते. सकाळी १० वाजल्यासून नवसपूर्ती झालेले अनेक भाविक देवीसमोर साधे लोटांगण घालतात. नवस बोलणाऱ्या तसेच नवसाची पूर्तता झालेल्या भाविकांच्या गळ्यात माळा घातलेल्या असतात. दुपारी २ वाजल्यापासून काट्यांवरील लोटांगणास सुरूवात होते. त्यासाठी रिंगणी नावाच्या झाडाचे काटे ताकामध्ये भिजवले जातात. त्यामुळे काट्यांचा टोकदारपणा कमी होतो, असे सांगण्यात येते. हे काटे देवीच्या मंदिरासमोर पसरवले जातात. या काट्यांवर अनेक भाविक लोटांगण घालतात. लोटांगण घालणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर पाण्याचा जोरदार मारा केला जातो, तसेच वाद्येही वाजवली जातात. भाविकांचे असे म्हणणे आहे की काट्यांवर लोटांगण घातल्यानंतरही शरीरावर जखमा होत नाहीत किंवा कोणताही त्रास होत नाही. सायंकाळी ५ वाजल्यानंतर देवीचे गाडे ओढण्याच्या कार्यक्रमास सुरूवात होते. त्यासाठी सात गाडे एकमेकांना दोरीने गच्च बांधण्यात येतात. या गाड्यांमध्ये गावांतील आबाल-वृद्ध बसतात. त्यानंतर भाविक हे गाडे गावच्या सीमेपर्यंत ओढतात. पूर्वी पोतराज हे गाडे ओढत असत. आता भगताच्या नेतृत्वाखाली गाडे ओढण्यात येतात. रात्री १२ वाजता नवसांची पूर्तता झालेले अनेक भाविक एक प्रकारची तार शरीरात टोचून घेतात. या विधिला

उपयुक्त माहिती:

  • ‘नाल टोचणे’ असे म्हणतात.
  • तेल्हारा येथून १८ किमी अंतरावर
  • तेल्हारा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home