भारतीय धर्मशास्त्रानुसार मंगळ ही युद्धाची देवता आहे व तो ब्रह्मचारी आहे. तो लाल रंगाचा असतो. त्यामुळे त्यास अंगारक असेही नाव आहे. देशात मंगळदेव ग्रहाची मंदिरे दुर्मिळ म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. त्यात उज्जैन येथील मंगलनाथ मंदिर आणि तमिळनाडूतील वैथिश्वरण कोईल यांचा अग्रक्रम लागतो. या मंदिरांप्रमाणेच अमळनेर येथील मंगळ देवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशात मंगळ देवतेची मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे. संपूर्ण खान्देशातून लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
स्कंद पुराणातील ‘अवंतिका’ खंडात मंगळाच्या व्युत्पत्तीची माहिती आहे. एकेकाळी उज्जयिनीपुरीमध्ये अंधकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याच्या पराक्रमी मुलाचे नाव कनक असे होते. एकदा या कनकाने थेट इंद्रालाच युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा इंद्राने युद्ध करून त्याचा वध केला. कनकाच्या वधानंतर अंधकासुरापासून आपले प्राण वाचण्यासाठी इंद्राने कैलास पर्वत गाठून महादेवांची प्रार्थना केली. महादेवांनी इंद्राची प्रार्थना ऐकून स्वतः अंधकासुरासोबत युद्ध सुरू केले. युद्धात शंकराने त्रिशुलाने अंधकासुरास घायाळ केले. त्यावेळी महादेवांच्या कपाळावरील घामाचा एक थेंब जमिनीवर पडला व या थेंबांमधूनच अंगारासारख्या लाल रंगाच्या मंगल ग्रहाचा जन्म झाला. या मंगळाला अंगारक, रक्ताक्ष तसेच महादेवपुत्र या नावाने ओळखले जाते.
महापुराणांपैकी एक असलेल्या ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, हिरण्यकश्यपचा भाऊ हिरण्याक्ष याने पृथ्वीला समुद्रमार्गे पाताळात नेऊन लपविली होती. भगवान विष्णूने वराह अवतारात हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला पाताळातून बाहेर काढले व समुद्राजवळ नेऊन ठेवले. त्यानंतर पृथ्वी फलदायी रूपात येऊन वराहरूपातील विष्णूंची पूजा करू लागली. पृथ्वीचे सुंदर व आकर्षक रूप पाहून विष्णू तिच्यावर मोहीत झाले. त्यातून पृथ्वीच्या गर्भातून एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला, तो मंगळ ग्रह होय. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील मंगळाची स्थिती चांगली नसल्यास तो व्यक्तीस हानीकारक ठरतो. मंगळदोषामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्याच्या शांतीसाठी साधारणतः प्रवाळ रत्न धारण करणे, दानधर्म करणे, हनुमानाची पूजा करणे यांसारखे उपाय केले जातात. मूर्तीशास्त्रात मंगळास चतुर्भूज म्हटले आहे. त्याच्या हातांत त्रिशूल, गदा, भाला व पद्म दाखविले जाते. मेंढा हे त्याचे वाहन आहे.
उज्जैन ही मंगळाची जन्मभूमी मानण्यात आली असली, तरी तेथील मंगलनाथ मंदिरात शिवपिंडीची पूजा होते. त्याच प्रमाणे तमिळनाडूतील वैथिश्वरण कोईल मंदिरही शंकरास समर्पित आहे. मूर्तीशास्त्रानुसार असलेली मंगळदेवाची मूर्ती केवळ अंमळनेर येथील मंदिरातच पाहावयास मिळते. प्राचीन असलेल्या या मंदिराचा १९३३ साली दगडूशेठ सराफ नावाच्या गृहस्थांनी जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. ते हयात असेपर्यंत म्हणजे १९४० पर्यंत या मंदिरात नियमितपणे पूजा–अर्चा होत होती. त्यांच्या निधनानंतर १२ वर्षे हे मंदिर दुर्लक्षित राहिले. एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणारे जगदीश नाथजी यांनी काही काळ या मंदिराची देखभाल केली. पण एके दिवशी अचानक ते मंदिर सोडून निघून गेले. १९९९ पासून विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर या मंदिराचे व्यवस्थापन सुरळीत झाले.
वाहनतळापासून मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर अनेक पुजा साहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत मंदिराची सुंदरशी प्रवेश कमान आहे. या कमानीवर ‘ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ अशी मोठी अक्षरे आहेत. कमानीच्या प्रवेशद्वारावर सोंडेत हार पकडलेले शुभ्र संगमरवरी गजराज आहेत. या कमानीतून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. येथून मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. या वाटेवर प्रांगणात भैरवीमाता–कालभैरव मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे दुर्मिळ असे त्रिशुलात्मक (त्रिशुळाच्या आकाराचे) मंदिर आहे.
जमिनीपासून सात ते आठ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंगळदेव ग्रह मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी मंगळ देव मंदिराची रचना आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर मंगळदेवाची शेंदुरचर्चित चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या हातांत गदा आणि त्रिशूळ आहेत. तर डावीकडील हातांमध्ये डमरू आणि कमळाचे फुल आहे. या देवाचे वाहन मेंढी आहे. मूर्तीच्या शिरावर सुवर्णमुकुट आहे. कपाळावर भंडाऱ्याचे लेपन व गंध, कोरीव भुवया आणि शांत मुद्रेतील ही मूर्ती सुंदर भासते. मंगळ देव मूर्तीच्या उजवीकडे पंचमुखी हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती व भूमाता देवी यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरासमोर मंडपात मंगळाची बाधा असणाऱ्या वा इतर काही समस्या असलेले भाविक अभिषेक करतात. या मंडपाशेजारी अनघालक्ष्मी माता व श्रीदत्त यांचे कमंडलुच्या आकारातील सुंदर मंदिर आहे. मंगळदेव मंदिरात दर मंगळवारी पंचामृत अभिषेक होतो. दर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकूमार्चन होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी व दर पौर्णिमेला येथे सत्यनारायणाची पूजा होते. दर पौर्णिमेस गायत्री महायज्ञ होतो. रोज सूर्योदय आणि सूर्यास्तास अग्निहोत्र पूजा होते. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेस तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध दशमीला मंगळग्रह जन्मोत्सव व नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या निमित्ताने नवचंडी आणि शतचंडी हे महायाग केले जातात. यावेळी देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते व ५६ भोगाचे नेवैद्य दाखविले जातात. दर मंगळवारी सुमारे एक लाख भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात भाविकांना राहण्यासाठी अद्ययावत् भक्तनिवास व महाप्रसादाची व्यवस्था आहे.