
‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ म्हणजे व्यासांनी रचलेल्या साहित्याच्या पलीकडे आता जगात काहीही नाही. जे आहे ते सर्व व्यासांनी उष्टवलेले आहे, अशा शब्दांत महर्षि व्यासांच्या प्रतिभेचा गौरव करण्यात येतो. पारंपरिक उल्लेखांनुसार व्यास हे ब्रह्मसूत्रे, महाभारत, पुराणे, व्यासभाष्य, भागवत, वेदव्यासस्मृती आदी ग्रंथांचे कर्ते मानले जातात. व्यासांची महती अशी की आजही जेथे काही विचार मांडला जातो, त्या पीठास व्यासपीठ असे मानले जाते. देशात महर्षी व्यासांची मोजकीच मंदिरे आहेत. त्यातील एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर यावलमध्ये स्थित आहे.
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, ‘व्यास शब्दाचा संस्कृतमधील सामान्य अर्थ विस्तार, विभाजन असा आहे. पुढे त्या–त्या ज्ञानशाखेतील ज्ञानसंग्रहाचा व्यास म्हणजे त्या ज्ञानसंग्रहाचे तपशीलवार विभाजन व वर्गीकरण करून दाखविणाऱ्या ग्रंथकारालाही व्यास म्हणू लागले असावेत. वेळोवेळी असे २८ व्यास होऊन गेल्याचा उल्लेख पुराणांत सापडतो. अशा तऱ्हेच्या व्यासग्रंथकारांमध्ये भागवतात म्हटल्याप्रमाणे महाभारताचे कर्ते कृष्णद्वैपायन व्यास हे अग्रगण्य समजले जातात.’ पारंपरिक लोकधारणेत वेदव्यास व कृष्णद्वैपायन व्यास हे एकच मानले जातात. महाभारताच्या आदिपर्वातील ६०व्या अध्यायात कृष्णद्वैपायन व्यासांची वैशिष्ट्यपूर्ण जन्मकथा सांगितली आहे. ती अशी की सत्यवती हिला यमुनाद्वीप येथे कन्यावस्थेत पराशर ऋषींपासून अपत्यप्राप्ती झाली. तेच कृष्णद्वैपायन होत.
या बाबतची कथा अशी की एकदा पराशरमुनी यमुना नदी पार करण्याकरिता नावेत बसले. ही नाव धीवरकन्या सत्यवती चालवत होती. पराशरमुनी तिच्या लावण्यावर मोहीत झाले. त्यावेळी ‘माझा कन्याभाव दूषित होऊ नये’, अशी अट सत्यवतीने घातली. पराशरांनी ती मान्य करून आपल्या तप:सामर्थ्याने
तिच्या शरीराचा मत्स्यगंध दूर करून तिला योजनसुगंधा केले, तसेच नावेभोवती दाट धुके उत्पन्न केले. येथील त्यांच्या समागमातून पुढे कृष्णद्वैपायन व्यासांचा जन्म झाला. यमुनेतील द्वीपावर जन्म म्हणून द्वैपायन व वर्णाने काळेसावळे म्हणून कृष्ण असे त्यांचे नाव पडले. त्यांनी जन्मतः आपल्या इच्छेनुसार आपल्या शरीराचा आकार वाढवला होता. जे ज्ञान कोणतेही वेदाध्ययन, व्रत, उपवास, यज्ञ आदींद्वारे प्राप्त करता येणार नाही, असे वेदांचे आणि इतिहासाचे ज्ञान त्यांना जन्मतःच प्राप्त झाले होते. (यन्नैति तपसा कश्चिन्न वेदाध्ययनेन च। न व्रतैर्नोपवासैश्च न प्रशान्त्या न मन्युना।। – आदिपर्व, ६०.४) हे व्यास पांडवांचे पितामह होते. त्यांनी पांडु, धृतराष्ट्र आणि विदुर यांना जन्म दिला होता. महाभारत युद्धाच्या वेळी व्यासांनीच संजयाला दिव्यदृष्टी दिली होती, असाही उल्लेख आहे.
देशातील महर्षि व्यासांच्या प्रमुख मंदिरांत उत्तराखंडमधील बद्रीनाथ जवळची व्यासगुफा, वाराणसीतील रामनगर येथील व्यासमंदिर, उत्तर प्रदेशातील नैमिषारण्यातील व्यास गादी अशा काही मंदिरांचा समावेश आहेत. त्यातीलच
एक मंदिर म्हणजे यावलमधील महर्षी वेदव्यास मंदिर होय. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की महाभारत काळात सातपुड्याचे घनदाट जंगल यावलपर्यंत होते. त्या काळातील हरिता–सरिता या नद्या म्हणजे सध्याच्या हडकाई–खडकाई नद्या होत. त्यांच्या संगमातून वाहणाऱ्या सूरनदी या दक्षिणवाहिनी नदीच्या काठावर लोमेश ऋषिंचा आश्रम होता. त्यांनी एकदा महर्षि व्यासांच्या हस्ते यज्ञ करण्याचे ठरवले होते. त्याच काळात अज्ञातवासात असलेले पांडव हस्तिनापूरकडे परतत असताना लोमेश ऋषींच्या आश्रमात आले. त्यांच्या उपस्थितीत महर्षि व्यासांच्या हस्ते यज्ञ पार पडला. त्यावेळी ते येथेच काही काळ वास्तव्यास राहिले. असे सांगितले जाते की महाभारतातील काही पर्वांचे लेखन त्यांनी याच ठिकाणी केले होते.
यावल गावच्या बाहेरच्या बाजूस नदीच्या काठावर व्यासांचे हे मंदिर वसले आहे. एका छोटा पूल पार करून मंदिराच्या परिसरात प्रवेश होतो. समोरच मंदिराचे दाक्षिणात्य शैलीतील भव्य गोपुर आहे. गोपुराच्या महाद्वाराच्या दोन्ही बाजूंस माहुत स्वार असलेली दोन मोठी गजशिल्पे आहेत. महाद्वाराच्या वरच्या
भागात मंदिर नामफलकाच्या वर लक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीच्या मूर्ती आहेत. गोपुराच्या पाच स्तरीय शिखरावर विविध शिल्पे आणि कोरीव नक्षीकाम केलेले आहे. महाद्वाराच्या भव्य लाकडी दरवाजांवर महर्षी व्यास, श्रीराम, सूर्यनारायण यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
येथून काही पायऱ्या चढून मंदिराच्या निसर्गरम्य प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उंच अधिष्ठानावर व्यासांचे मंदिर स्थित आहे. १६ पायऱ्या चढून या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. येथे डावीकडे देवळीत हनुमानाचे, तर उजवीकडे शंकराचे स्थान आहे. मध्यभागी मोठे पितळी कूर्मशिल्प आहे. त्या शेजारी एका चौथऱ्यावर दंडगोलाकार पाषाण आहे. यास इच्छापूर्तीचा गोटा असे म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की हा गोटा चार बोटांनी उचलून ठेवताना जर फिरला तर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपात कोरीव नक्षीकाम केलेले १८ पांढरेशुभ्र स्तंभ आहेत. हे स्तंभ अठरा पुराणांचे प्रतिक मानले जातात. सभामंडपात दोन संगमरवरी देवळ्या आहेत. त्यातील एका देवळीत उजव्या सोंडेचा रिद्धी गणेश, तर दुसऱ्या देवळीत डाव्या सोंडेचा सिद्धी गणेश विराजमान आहे. गर्भगृहात एका शुभ्र चौथऱ्यावर महर्षी व्यासांची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. सुखासनात बसलेल्या महर्षि व्यास ऋषिंच्या हातात महाभारत ग्रंथ आहे. गर्भगृहावर उंच व वैशिष्ट्यपूर्ण शिखर आहे.
महर्षी व्यास मंदिराच्या समोर श्रीरामाचे जुने मंदिर आहे. मंदिर साधे आणि छोटे आहे. या मंदिराची रचना मध्यभागी गाभारा आणि भोवताली सभामंडप अशी आहे. आतील भिंतींवर लाकडाचा वापर करून छोटे छोटे कोनाडे तयार करण्यात आले आहेत. या मंदिराला जुन्या पद्धतीच्या लाकडी खिडक्या, दारे व छत आहेत. मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या लहानशा परंतु सुबक अशा मूर्ती आहेत. मुख्य मूर्तींच्या खालच्या बाजूला विविध देवी– देवतांच्या पंचधातूत घडविलेल्या मूर्ती मांडण्यात आल्या आहेत. मूर्तींच्या मागील मखरावर मराठा शिलेदारांच्या वेशातील प्रतिहारींची कोरीव शिल्पे आहेत.
महर्षी व्यासांच्या मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी ७ वाजता आरती होते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस म्हणजे महर्षि व्यास ऋषींचा जन्मदिवस. हा दिवस व्यासपौर्णिमा वा गुरूपौर्णिमा म्हणून येथे भव्य स्वरूपात साजरा केला जातो. जळगाव हे केळ्यांचे आगर. येथून परदेशातही मोठ्या प्रमाणावर केळ्यांची निर्यात होते. गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यास ऋषींप्रती कृतज्ञतेच्या भावनेने मंदिराचा गाभारा केळांच्या फण्यांनी सजवला जातो. हे पाहण्यासाठी येथे हजारो भाविकांची गर्दी होते. येथील राममंदिरातही रामजन्मासह विविध सणसमारंभ उत्साहाने साजरे केले जातात.