विषमतेचा त्याग करून समतेचा पुरस्कार करणाऱ्या महानुभाव पंथाचा उदय संत ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी झाला. ‘तेजाने युक्त लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ’ अशी या पंथाची महती सांगितली जाते. मूळ ‘परमार्गी’ असे नाव असलेल्या या पंथास सर्वात प्रथम संत एकनाथ महाराजांनी ‘महानुभाव’ असे संबोधले, असे ज्येष्ठ अभ्यासक शं. गो. तुळपुळे नमूद करतात. सन ११९४ ते १२८२ हा चक्रधर स्वामींचा कालखंड महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि समृद्धीचा काळ मानला जातो. त्याकाळी महाराष्ट्रावर यादवांची सत्ता होती. चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले प्रत्येक स्थळ पुढे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धी पावले. त्यापैकीच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील महानुभावीय श्रीकृष्ण मंदिर हे चक्रधर स्वामींचे एक चरणांकित स्थान म्हणून ओळखले जाते.
मेहकर हे शहर पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. स्थानिक आणि पौराणिक मान्यतेनुसार, पैनगंगा नदीची निर्मिती स्वतः ब्रह्मदेवाने एका यज्ञाच्या प्रसंगी केली होती. हे शहर अजिंठा डोंगररांगांच्या जवळ आणि दक्षिण-उत्तर भारताला जोडणाऱ्या मार्गावर असल्याने येथे साधू, संत आणि प्रवासी यांची सतत ये-जा असे. याच मार्गावरून प्रवास करताना महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे मेहकर येथे आगमन झाले होते व ते दहा महिने येथे वास्तव्यास होते.
येथील वास्तव्यादरम्यान चक्रधरस्वामींनी केलेल्या अनेक लीळांचे सविस्तर वर्णन ‘लीळाचरित्रा’त आढळते. चक्रधरस्वामींच्या १३ चरणांकित स्थानांचे दर्शन या परिसरात घडते.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी या परिसरात घनदाट जंगल होते व येथे अनेक ऋषीमुनी तपश्चर्या आणि यज्ञयाग करत असत. या भागात मेघंकर नावाचा एक क्रूर राक्षस राहत असे. हा राक्षस ऋषींच्या यज्ञांत सतत विघ्न आणत असे, यज्ञकुंडे भ्रष्ट करत असे आणि प्रसंगी ऋषींना खाऊन टाकत असे. त्याच्या दहशतीमुळे धर्माचे पालन करणे कठीण झाले होते. ऋषीमुनींच्या प्रार्थनेला मान देऊन भगवान विष्णूंनी या राक्षसाचा संहार करण्यासाठी अवतार घेतला. या युद्धात देवाने आपल्या प्रसिद्ध शारंग (सारंग) धनुष्याचा वापर केला. हे युद्ध अतिशय घनघोर झाले. दैत्याच्या मायावी शक्तींचा सामना करण्यासाठी भगवंताने आपल्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव केला. या युद्धात विष्णूने ‘शारंग’ धनुष्य धारण केले होते म्हणून येथील विष्णूच्या रूपाला ‘शारंगधर’ असे नाव पडले. महानुभाव पंथाच्या स्थानिक इतिहासात आणि मंदिराच्या आवारात आजही ‘शारंगधर चावळा’ नावाचे स्थान आहे, जे या पौराणिक घटनेची साक्ष देते. या मेघंकर दैत्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन या शहराला मेहकर हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
‘लीळाचरित्रा’तील वर्णनानुसार, महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे समाज व धर्मसुधारणेसाठी भ्रमंती करत असताना शके ११८९ च्या (सन १२६७) श्रावण महिन्यात अंजनी येथून मेहकर येथील बाणेश्वराच्या मंदिराजवळ आले. त्यावेळी सायंकाळ झाली होती. बाणेश्वराच्या मंदिराच्या जगतीच्या उत्तराभिमुख दरवाजाजवळ ते आसनस्थ झाले. त्यावेळी त्यांची भेट बोणाबाईंशी झाली. त्यावेळी त्या भिक्षेला जात होत्या. त्यांच्या विनंतीवरून चक्रधरस्वामींनी येथे मुक्काम केला. मात्र, देवतेची उपकरणे चोरीला जातील, या भीतीने पुजाऱ्याने त्यांना बाणेश्वराच्या देवळात झोपण्यास मनाई केली. त्यामुळे चक्रधरस्वामी तीन दिवस या मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या भैरवाच्या मंदिरात मुक्कामी होते. तिसऱ्या दिवशी झोपेत असताना काही व्यक्तींनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांची नखे चक्रधरस्वामींच्या गळ्याला लागली. या घटनेनंतर बोणाबाईंनी केलेल्या विनंतीनुसार बाणेश्वराच्या मंदिरातील पुजाऱ्यांनी चक्रधरस्वामींना मंदिरात वास्तव्य करण्याची परवानगी दिली. या मंदिरात त्यांचे दहा महिने वास्तव्य होते.
या मंदिरानजीकच बोणाबाईंची गुंफा होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी बोणाबाई या गुंफेत मातीपासून गोकुळ व वृंदावन तयार करत होत्या. त्यावेळी ‘हे काय करत आहात,’ अशी पृच्छा चक्रधर स्वामींनी केली. त्यावेळी गोकुळाष्टमीच्या उत्सवाची तयारी सुरू असल्याचे उत्तर बोणाबाईंनी दिले. त्यावर ‘गोकुळाष्टमी अशी करायची असते का,’ असे म्हणत चक्रधरस्वामींनी बोणाबाईंना देवकीची वेशभूषा करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी बालकृष्णाच्या रूपात बोणाबाईंना दर्शन दिल्याचे‘लीळाचरित्रा’त नमूद आहे. (उत्तरार्ध खंड : लीळा क्रमांक ३४० ‘बोणाबाईसी देवकीपणें श्रीकृष्ण दर्शन’)
एके दिवशी एका चोराने बोणाबाईंच्या गुंफेत प्रवेश केला. त्याने सर्व सामान एका गाठोड्यात बांधले. तेवढ्यात बोणाबाईंनी गुंफेचा दरवाजा घट्ट लावून घेत मदतीसाठी ‘धावा वा मौन्यदेव हो: नागवलो: चोरू: चोरू:’, असे मोठ्याने ओरडू लागल्या. त्यावेळी चक्रधरस्वामी गुंफेजवळ उभे राहून खाकरले. चोराने मागे वळून पाहिले असता चक्रधरस्वामींची विशाळरूप धारण केलेली मूर्ती त्याच्या दृष्टीस पडली. त्यामुळे घाबरलेल्या चोराने सामानाचे गाठोडे तेथेच टाकून पळ काढला, असेही‘लीळाचरित्रा’त नमूद आहे. (उत्तरार्ध खंड : लीळा क्रमांक ३४१ ‘चोरु दंडीला’)
महानुभावीय श्रीकृष्ण मंदिराचे स्वरूप छोटेखानीच आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान मंदिरासमोर मंडप बांधण्यात आला आहे. सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. आतील खोलीत असलेल्या गर्भगृहात मागील बाजूला कमलपुष्पावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाची बासरीवादन करतानाची विलोभनीय मूर्ती आहे. येथे चक्रधरस्वामींचे ‘अवस्थान’ व ‘वसतीस्थान’ आहे. प्रदक्षिणा मार्गावर एका कोपऱ्यात ‘विशेष’ आहे. (परमेश्वराच्या अवताराने ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले किंवा विश्रांती घेतली, त्या स्थितीला किंवा ठिकाणाला अवस्थान असे म्हटले जाते.) या मंदिराला मागील बाजूनेही दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच ‘मौन्यरूप धारण स्थान’ (भैरवी अवस्थान) आहे. चक्रधरस्वामींच्या काळात येथे भैरवाचे मंदिर होते. याच मंदिरात त्यांनी तीन दिवस मुक्काम केला होता. येथेही श्रीकृष्णाची मूर्ती आहे. येथे खिडकी अवलोकन स्थानही आहे.
मौनरूप धारण स्थानी दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर काही पावलांवर, ‘श्रीचरणक्षालन स्थान’ आहे. येथे बोणाबाईंनी चक्रधरस्वामींचे चरणप्रक्षालन केले होते.
येथून काही पावलांवर ‘विशालरूपधारण स्थान’ आहे. येथेच चक्रधरस्वामींनी चोराला विशालरूप दाखवले होते. या स्थानापासून काही अंतरावरील ‘चोर नागविणे स्थान’ आहे. गाठोडे टाकून पळून जाताना चोराचे कापड येथे पडले होते. मंदिराच्या परिसरात एका खोलीच्या ठिकाणी पूर्वी बोणाबाईंची गुंफा होती. येथेच चक्रधरस्वामींनी त्यांना श्रीकृष्ण दर्शन घडवले होते, तसेच बोणाबाईंच्या पूजेचा स्वीकार केला होता. या खोलीतच ‘आरोगणा (भोजन) स्थान’ व ‘मादणे स्थान’ आहे. मंदिरापासून काही अंतरावर ‘लोंबता श्रीचरण स्थान’ आहे. येथेच चक्रधरस्वामी आणि बोणाबाईंची प्रथम भेट झाली होती.
महानुभाव पंथाचे असंख्य अनुयायी महानुभावीय श्रीकृष्ण मंदिरात मनोभावे दर्शन घेतात तसेच येथील सर्व १३ स्थानांना भेट देतात. महानुभावीय श्रीकृष्ण मंदिराचे विश्वस्त मंडळ व गावातील सर्वज्ञ युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी या मंदिरात गोकुळाष्टमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ‘लीळाचरित्रा’तील श्रीकृष्ण जन्माच्या आणि चक्रधर स्वामींच्या लीलांचे वाचन केले जाते. हा ‘ज्ञानयज्ञ’ मानला जातो. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा जन्म सोहळा, पाळणा आणि आरती केली जाते. यावेळी भाविकांना महाप्रसादाचेही वितरण करण्यात येते.