कर्जत रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या वेणगावात महालक्ष्मीचे स्वयंभू आणि प्राचीन स्थान आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचे प्रतिरूप म्हणून या देवीची ख्याती आहे. सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रगण्य नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे यांचा जन्म याच गावात झाला. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या येथील प्रतिरूपाचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांत हजारो भाविक येथे येतात.
‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथावर आधारलेल्या ‘देवी माहात्म्य’ या ग्रंथामध्ये महालक्ष्मी ही आदिमाया असल्याचे नमूद केलेले आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘सर्वांची आदी जाण। महालक्ष्मी आहे आपण। सर्व जगाची परमेश्वरी पूर्ण। त्रिगुण स्वरूपा आहे ती।।’ कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महालक्ष्मी ही मूळ प्रकृती असल्याची तिच्या भक्तांची धारणा आहे. याचा अर्थ असा की ही देवी ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवतांपैकी कुणाचीही गौण सहचारिणी नाही, तर ती साक्षात् ब्रह्मरूपिणी, विश्वाची जननी, पोषिणी आणि संहारिणी आहे.
वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिराची अख्यायिका अशी की कोल्हापूरची महालक्ष्मी एकदा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी या मार्गाने जात होती. प्रवासादरम्यान आता जेथे मंदिर आहे तेथे देवी आली असता तिच्या रथाचे चाक घसरले. पुढे काही अंतरावर याच रथाच्या एका घोड्याचा पायही घसरला. त्यामुळे देवीने येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ते स्थान या परिसरात आजही पाहावयास मिळते. दुसऱ्या कथेनुसार, दोनशे वर्षांपूर्वी गावातील एका ग्रामस्थाला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन या स्थानाबाबत सांगितले. त्यानुसार गावकऱ्यांनी शोध घेतला असता येथे देवीची स्वयंभू मूर्ती सापडली. त्यानंतर याच जागेवर देवीचे मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेली देवीची दैनंदिन पूजा–अर्चा, सांजवात आजही अव्याहत सुरू आहे. सध्या असलेले मंदिर हे १९९७ साली बांधलेले आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वेणगावच्या वेशीवर हे मंदिर आहे. अर्धगोलाकार कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर आकर्षक तुळसीवृंदावन तसेच गणपती, हनुमान व रक्षक देवता यांची मंदिरे आहेत. मुखमंडप, सभामंडप व प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी मुख्य मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात असलेल्या दोन खांबांमधून मंदिराच्या सभामंडपात येण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौथऱ्यांवर देवीचे वाहन असलेल्या वाघांची शिल्पे आहेत. सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर सिंहाचे शिल्प आहे. येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा (गुढमंडप) आहे. प्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी सभामंडपाच्या भिंतींमध्ये मोठ्या खिडक्या आहेत. याच भिंतीवर स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांची माहिती व चित्रे लावलेली आहेत.
गर्भगृहाला पारंपरिक तोरणशैलीची अर्धवर्तूळाकार कमान आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांच्या वरील भागात मध्यभागी सूर्य, चंद्र व इतर मंगलचिन्हे आहेत. गर्भगृहात जमिनीवर देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. उत्सवकाळात मूर्तीला रंगीत वस्त्र, फुले, हार, चांदीचे अलंकार व मुखवट्याने सजविले जाते. या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर ५५ फूट उंचीचे आहे. त्यावर नागरशैलीचा प्रभाव आहे. या शिखरावर अनेक देवकोष्टके व कळसाच्या प्रतिकृती आहेत. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक व त्यावर कळस आहेत.
प्रांगणात मंदिराजवळ ईशान्य दिशेला देवीच्या रथाची खूण व पश्चिमेकडे घोड्याचा पाय घसरला ती ठिकाणे आहेत. नवरात्रोत्सव हा येथील महत्त्वाचा उत्सव असतो. हे नऊ दिवस येथे मोठी यात्रा असते. या काळात येथे पूजा, सप्तशती पाठ, अभिषेक, भजन, कीर्तन व गोंधळ असे कार्यक्रम होतात. खणा–नारळाने देवीची ओटी भरण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने महिला येथे येतात. घट उद्यापनाच्या दिवशी नवचंडी होम केला जातो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा, होळी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा असे सणही येथे उत्साहाने साजरे होतात. मंदिर ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत इत्यादी सामाजिक कार्येही केली जातात.