महालक्ष्मी मंदिर

उंब्रज नं. १, ता. जुन्नर, जि. पुणे


पुष्पावती नदीच्या तीरावर व कुकडी प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात उंब्रज गाव वसले आहे. या गावाच्या पश्चिमेकडून कुकडी व उत्तरेकडून मांडवी नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या संगमावरील नागडोहाजवळ हे श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे स्थान जुन्नर तालुक्यातील जागृत स्थान मानले जाते.

उंब्रज हे जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील धरणग्रस्त गाव. येडगाव कुकडी योजनेंतर्गत हे गाव १९७८ मध्ये पाणलोट क्षेत्रात गेल्यामुळे उंब्रजकर ग्रामस्थांची सुमारे एक हजार एकर बागायती जमीन यात गेली. याच ठिकाणी महालक्ष्मीचे हे स्थान असून ग्रामदेवता श्री मुळगंगा हिचे मंदिरही येथेच आहे. पाण्याचा वेढा असूनही आजतागायत ही मंदिरे कधी पाण्याखाली गेली नाहीत.

देवीच्या मूळ मंदिराची रचना पेशवेकालीन वाड्यांसारखी आहे. १९५४ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिराच्या सभामंडपात अनेक सागवानी लाकडी खांब आहेत. त्यावरील कोरीव नक्षीकाम खूपच सुंदर आहे. मंदिराच्या सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करताना द्वारपट्टीवर दोन भालदार-चोपदार कोरलेले दिसतात. त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन गणेशमूर्ती आहेत. पैकी एक बैठी मूर्ती असून दुसरी उभी मूर्ती आहे. मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती लोभसवाणी आहे.

मंदिराची आख्यायिका अशी, पेशवेकाळात मराठी सरदारांनी जीवाची बाजी लावून आपला प्रांत जपला. धर्म संस्कृती रक्षणासाठी मंदिरांची बांधकामे केली. अशा काही धाडसी सरदारांपैकी एक हिंगणे नावाचे सरदार नाशिकच्या चांदवड परिसराचे वतनदार होते. कोल्हापूरच्या आंबामातेचे परमभक्त असल्याने वर्षातून एकदा आवर्जून ते कोल्हापूरला देवदर्शनाला जात. कालपरत्वे दरवर्षी कोल्हापूरला जाणे त्यांना शक्य होईना. त्यांनी करवीरनिवासी महालक्ष्मीला आपल्याबरोबर आपल्या गावी येण्यास विनंती केली.देवी त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाली व तिने त्यास मी येईन, पण वाटेत वळून मागे पाहायचे नाही, असे सांगितले. पण मानवी स्वाभावानुसार, उत्सुकतेपोटी, हिंगणे यांनी उंब्रजच्या नागडोहाजवळ येताच मागे वळू पाहिले आणि देवी नागडोहात मोठ्या वेगाने हालचाल होऊन लुप्त झाली.त्यानंतर हिंगणे सरदारांनी या नागडोहाजवळ श्री महालक्ष्मीचे मंदिर बांधले व ते स्वतःच्या गावी नाशिकला गेले. हिंगणे यांनी गायकवाड गुरवांकडे या देवीची सेवा करण्याची विनवणी केली. त्यानंतर आजतागायत गायकवाड पुजारी श्री महालक्ष्मीची मनोभावे सेवा करतात.

मंदिरासह आजुबाजूचा परिसर पाणलोट क्षेत्रात गेल्यामुळे गावकऱ्यांनी दोन्ही मंदिरे नव्याने गावात बांधली आहेत. त्यामुळे देवीचे सर्व उत्सव नव्या मंदिरांमध्ये साजरे होतात. नव्याने बांधण्यात आलेली मंदिरे ही भव्य व सुंदर आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत या मंदिरात भरगच्च कार्यक्रम होतात. त्यातही दसऱ्याच्या आदल्या दिवशी होणारा नवमीचा होम हा फार मानाचा समजला जातो. खणा-नारळाने देवीची ओटी भरली जाते व देवीकडे सुख-शांती, अपत्यप्राप्तीसाठी नवस केला जातो. याच दिवशी येथे मोठी यात्रा भरते. ओझरच्या गणपतीची ही देवी बहीण असल्याची मान्यता आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशी ओझरच्या देवस्थानकडून या देवीसाठी आहेर पाठविला जातो. नवरात्रात हे गाव एका वेगळ्याच भारलेल्या भक्तिमय वातावरणात असते. भाविकांना सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते. मंदिराच्या आवारात भक्तनिवास व प्रसादाची सुविधा आहे.

उपयुक्त माहिती:

  • जुन्नरपासून २५ किमी अंतराव
  • उंब्रज गावापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते
  • मंदिर ट्रस्टतर्फे भक्तनिवास व प्रसादाची सुविधा
Back To Home