मराठेशाहीच्या काळातील जहागिरीचे स्थान असलेले पिलिव हे गाव येथील भुईकोट किल्ल्यामुळे ओळखले जाते. त्याच प्रमाणे येथील महालक्ष्मीच्या पुरातन मंदिरामुळेही हे गाव सुप्रसिद्ध आहे. पिलीवची महालक्ष्मी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवीस येथे प्रेमाने लखाबाई असे संबोधले जाते. लखाबाईचे येथील मूळ स्थान गावानजीकच्या एका छोट्या टेकडीवर आहे. असे सांगितले जाते की सुमारे अडिचशे वर्षांपूर्वी टेकडीखाली असलेले हे देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. येथे भरणारी यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे.
महालक्ष्मी ही आदिमाया आहे. ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथावर आधारलेल्या ‘देवी माहात्म्या’तील आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महालक्ष्मी ही मूळ प्रकृती असल्याची तिच्या भक्तांची धारणा आहे. याचा अर्थ असा की ही देवी ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवतांपैकी कुणाचीही गौण सहचारिणी नाही. तर ती साक्षात् ब्रह्मरूपिणी, विश्वाची जननी, पोषिणी आणि संहारिणी आहे. साडेतीन शक्तिपीठांतील एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापूरातील महालक्ष्मीचे मंदिर होय. येथील देवी अंबाबाई या नावानेही ओळखली जाते. हीच देवी पिलीवमध्ये लखाबाई म्हणूनही पूजली जाते.
पिलीव येथील टेकडीवर मूळ स्थान असलेली ही देवी टेकडीच्या पायथ्याशी कशी आली यासंदर्भातील एक आख्यायिका येथे सांगण्यात येते. त्यानुसार, पूर्वी पिलीवमध्ये अशी प्रथा होती की दर पौर्णिमेला महिलांनी लखाबाईचे दर्शन घेण्यासाठी या टेकडीवर जायचे. परंतु गर्भवती, आजारी वा वृद्ध महिलांना टेकडी चढून जाणे अवघड जाई. त्यामुळे गावातील महिलांनी एकदा देवीला साकडे घातले. तेव्हा देवी आपल्या भक्तांच्या सोयीकरीता टेकडीच्या पायथ्याशी एका शिळेच्या रूपात प्रकट झाली. ग्रामस्थांनी मिळून येथे मंदिर उभारले. हे मंदिर अठराव्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्या काळात येथे अक्कलकोट संस्थानशी संबंधित असलेल्या भोसले घराण्याची सत्ता होती. त्यांचा भुईकोट किल्ला आजही पिलीवमध्ये उभा आहे.
या मंदिराभोवती असणाऱ्या आवारभिंतीत किल्ल्याप्रमाणे भासणारे दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या महिरपी कमानीच्या वरील बाजूला हस्त व त्यावर बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वारापासून काही पायऱ्या चढून जमिनीपासून उंचावर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. फरसबंदी असलेल्या प्रांगणात उजवीकडे एक दीपस्तंभ आहे. तर डावीकडे आवारभिंतीच्या आतील बाजूला दगडी बांधकामातील ओवऱ्या आहेत. यापैकी एका ओवरीमध्ये प्राचीन जात्याचे दोन भाग आहेत. पारंपरिक जात्यांच्या तुलनेत त्यांचा आकार व वजन जास्त आहे. असे सांगितले जाते की पूर्वी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा चुना आणि अन्य बांधकाम साहित्याचे चूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे.
खुला सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. भाविकांच्या सोयीसाठी सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहात एका कमी उंचीच्या वज्रपिठावर देवीची शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या कपाळावर गंध, डोळे, नाक व तोंडाची रचना दिसते. या तांदळा मूर्तीच्या शेजारी काळ्या पाषाणातील कोरीव शस्त्रधारी चतुर्भूज मूर्तीही आहे. वस्त्रालंकार ल्यालेली ही मूर्ती सुंदर भासते. उत्सवकाळात या दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुखवटे लावले जातात.
या मंदिराच्या आवार भिंतीजवळ एका शेडमध्ये उत्सवकाळात देवीची ज्यावरून पालखी निघते तो मोठा रथ ठेवलेला आहे. संपूर्ण लाकडी बनावटीच्या या रथाची रचना मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराप्रमाणे याला स्तंभ, वज्रपिठ व वरील बाजूस पाच शिखरे आहेत. पिलीव येथील कै. कर्मवीर धोंडी आबाजी पाटील यांनी स्वखर्चाने इ.स. १९७७ मध्ये हा रथ बनवून मंदिरासाठी दिला होता. तेव्हापासून आजतागायत याच रथावरून देवीची मिरवणूक निघते.
पायथ्याशी असलेल्या या मंदिराच्या मागील बाजूने डोंगरावर असलेल्या देवीच्या मूळ स्थानाकडे जाणारी वाट आहे. या मार्गावर दोन कमानी आहेत. पायरी मार्गाने सुमारे १० ते १५ मिनिटांत या मंदिरापर्यत पोहचता येते. येथे असलेल्या लहानशा मंदिरात देवीचे दोन तांदळे आहेत. टेकडीवर असलेल्या देवीचे दर्शन घेऊन मग पायथ्याच्या देवीचे दर्शन घेण्याचा येथे दंडक आहे. येथे येणाऱ्या भाविकांकडून हा दर्शनक्रम पाळला जातो. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे ज्यांना टेकडीवर जाता येत नसेल ते भाविक मात्र पायथ्याशी असलेल्या मंदिरातील महालक्ष्मीचे दर्शन घेतात.
दर पौर्णिमेला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येथे किमान दहा ते पंधरा हजार भाविक येत असल्याची माहिती पुजाऱ्यांकडून सांगितली जाते. येथे नवरात्र उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी माघ महिन्यात भरणारी देवीची यात्रा हा या मंदिरातील सर्वात महत्वाचा उत्सव ठरतो. माघ पौर्णिमेपासून महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी परराज्यातूनही महालक्ष्मीचे भक्तगण येत असतात. इतर कोणत्याही यात्रेप्रमाणेच येथेही देवीची पालखी निघते. त्याची सुरुवात मेटकरी वाड्यातून होते. महालक्ष्मी देवीचा लाकडी रथ सजवून विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. ‘महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं’, ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रथ मार्गक्रमण करतो. गावच्या मुख्य पेठेतून पायघड्या घालत व फटाक्याच्या आतषबाजीत रीतीरीवाजाप्रमाणे एक किलोमीटरच्या परिसरात फिरून ही मिरवणूक पुन्हा महालक्ष्मी मंदिराकडे येते.
यात्रा काळात येथे कुस्त्यांचा जंगी फड रंगतो. बैलगाडी शर्यत होते. येथे शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध अवजारांचे, जनावरांचे आणि शेतीमालाचे प्रदर्शन भरते. या यात्रेस किमान दोन ते अडीच लाख भाविक उपस्थिती लावतात, असे सांगितले जाते.