नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंपैकी येथील महागणपती मंदिर एक महत्त्वाची वास्तू मानली जाते. असे सांगितले जाते की शहराच्या नावावरून या देवस्थानाला ‘सिन्नरचा महागणपती’ हे नाव मिळाले. सुमारे १७ फूट उंचीची ही मूर्ती येथील वास्तुशिल्पकार व चित्रकार असलेले रंगनाथ गंगाराम लोखंडे यांनी १९४७ मध्ये स्वखर्चातून साकारली होती.
सिन्नर हे यादव काळात राजधानीचे शहर होते. याच काळात सिन्नर शहरात १२ ज्योतिर्लिंगे उभारली गेली. त्यामध्ये गोंदेश्वर, मुक्तेश्वर, पाताळेश्वर, संगमेश्वर, नागेश्वर, पंचमुखेश्वर, ऐश्वर्येश्वर, ब्रह्मेश्वर, विठ्ठलेश्वर, सिद्धेश्वर, विश्वकर्मा पांचाळेश्वर आणि चितळेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. त्यात गोंदेश्वर व ऐश्वर्येश्वर यांसारखी अतिप्राचीन हेमाडपंती मंदिरे शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण समजली जातात. या मंदिरांमुळे सिन्नर शहराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
सिन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘सिन्नरचा महागणपती’ मंदिरातील गणेशाची बैठी मूर्ती सिमेंट, वाळू, स्टील व विटांचा वापर करून तयार केलेली आहे. संपूर्ण लाल रंगातील या मूर्तीचे केवळ दागिने व मुकुट सोनेरी रंगात आहेत. बाजारपेठेतील भैरवनाथ मंदिरासमोर हे महागणपतीचे स्थान आहे.
असे सांगितले जाते की सिन्नरमधील एक चित्रकार (पेंटर) रंगनाथ लोखंडे यांच्या घरात मातीची मोठी गणेशमूर्ती होती. नवीन घर बांधावयास घेतल्यानंतर त्यांना नाईलाजाने त्या मूर्तीचे विसर्जन करावे लागले होते. अनेक वर्षांपासून असलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे लागल्याने ते अस्वस्थ झाले. त्याचदरम्यान, १९४७ मध्ये एक साथीचा आजार या परिसरात वेगाने फैलावत होता. त्यावेळी गावकऱ्यांनी भैरवनाथ मंदिरासाठी जोता बांधायचा नवस केला. साथ आटोक्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवसपूर्तीसाठी गावकऱ्यांनी जोता बांधण्याचे निश्चित केले. रंगनाथ लोखंडे यांना त्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या घरात होती तशीच मूर्ती भैरवनाथ मंदिराच्या आवारात स्वखर्चाने घडवीन, असा संकल्प केला. भैरवनाथ मंदिराचा जोता बांधून होताच त्यांनी संकल्पानुसार गणेशमूर्तीच्या कामास आरंभ केला. आधी लोखंडी सांगाडा तयार करून त्यावर दगड-विटांचे बांधकाम केले. ही मूर्ती बनविण्यासाठी त्यांना १३५० रुपये खर्च व २ वर्षांचा कालावधी लागला होता.
सर्वप्रथम सिमेंटच्या चौकोनी चौथऱ्यावर रंगनाथ लोखंडे यांनी ही मूर्ती तयार केली. त्यानंतर अनेक वर्षे ऊन, वारा व पाऊस झेलत ही मूर्ती उघड्यावर होती. ७० वर्षांहूनही अधिक काळ लोटला असला तरी अजूनही ती सुस्थितीत आहे. काही वर्षांपूर्वी या मूर्तीवर छप्पर बांधण्यात आल्याने ऊन व पावसापासून तिचे संरक्षण होत आहे.
१९६२ मध्ये ‘एअर इंडिया’ या विमान कंपनीने या मूर्तीचे छायाचित्र आपल्या दिनदर्शिकेवर प्रसिद्ध केल्याने देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिन्नरच्या महागणपतीला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे हा महागणपती खऱ्या अर्थाने जगभर पोचला. ‘सारडा उद्योग समूहा’नेही आपल्या दिनदर्शिकेत या महागणपतीला स्थान दिले होते. तेव्हापासून येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये वाढ झाली. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या गणपतीच्या मूर्तीभोवती फुलांची सजावट करून रोषणाई केली जाते. या मंदिर परिसरात सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर आहे. याशिवाय शैनेश्वर, दक्षिणमुखी मारुती व महादेव यांची मंदिरे आहेत. काही वर्षांपूर्वी या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हा प्रशस्त परिसर सिन्नरकरांसाठी धार्मिक व पर्यटनाचे केंद्र बनले आहे.