सर्वशक्तिमान गणरायाचे रूप म्हणजे रांजणगावचा महागणपती. सर्वशक्तिमान म्हणजे एवढा की जो आपल्या २० भुजा व १० सोंडांनी वाईट गोष्टींचा नाश करतो आणि आपल्या भक्ताला तारतो. दशशुंडी अर्थात १० सोंडांचा आणि द्विदशभुज म्हणजे २० भुजा असलेला गणपतीचा हा एकमेवाद्वितीय अवतार आहे. या गणेशस्वरूपाला महोत्कट, असेही म्हटले जाते.
या अवताराची आख्यायिका अशी, त्रिपुरासुराने कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने त्रिपुरासुराला काय हवे ते माग, असे सांगितले. तेव्हा त्रिपुरासुराच्या मुखातून निघाले, ‘हे देवा मला सोने, चांदी व लोखंड यांनी समृद्ध असलेले राज्य दे आणि शंकर सोडून मला कोणीही मारू शकणार नाही, असा वर दे.’ कृपाळू गणपतीने तथास्तु म्हणत आपल्या भक्ताला वर दिला. पण, हा वर मिळाल्यानंतर त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने भूलोक व देवलोकात उच्छाद मांडला. देवांवर आक्रमण करून सर्व देवांना देवलोकातून पळवून लावले आणि स्वतः इंद्रासनावर जाऊन बसला. त्याच्या दहशतीने इंद्रासह सर्व देव हिमालयात जाऊन लपले. त्यांनी मदतीसाठी शंकराची आराधना केली.
शंकराने त्रिपुरासुराशी युद्ध केले; पण शिवशंकर पराभूत झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने शंकराने महोत्कट गणेश स्वरूपाची आराधना केली. गणपतीने प्रसन्न होऊन शंकराला आपले दशशुंडी व द्विदशभुज स्वरूप दाखवत तेजस्वी बाण दिला. उन्मत्त त्रिपुरासुराला इंद्रलोक ताब्यात घेतल्यानंतर कैलासावरही राज्य करण्याची बुद्धी झाली. त्याने शंकराकडे कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुर हा गणपतीचा निस्सीम भक्त होता, याची श्री शंकराला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे एका ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री शंकर त्रिपुरासुराच्या दरबारात पोचले. त्यावेळी त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत हे भूलोकी सर्वांचा अनन्वित छळ करीत होते. तेथील सर्व ऋषी-मुनी दहशतीखाली वावरत होते. अशा काळात ब्राह्मणरूपी शंकराने त्रिपुरासुराच्या दरबारात येऊन म्हटले, ‘हे राजा मला ६४ कला येतात आणि त्या दाखवण्यासाठी मी येथे आलो आहे.’ तेव्हा त्रिपुरासुराने सांगितले, ‘तुझी कोणतीही कला दाखव. ती मला आवडली, तर तू मागशील ते मी देईन.’
तेव्हा ब्राह्मणरूपी शंकराने त्रिपुरासुर आणि त्याच्या दोन सेनापतींना तीन विमाने तयार करून दिली. त्यांना सांगितले, ‘या विमानांतून क्षणार्धात कुठेही जाता येईल. फक्त शिवशंकरच या विमानांना रोखू शकेल. या विमानात असताना त्याने बाण मारल्यास विमानासह त्यावर आरूढ असणाऱ्याचा नाश होईल.’ त्रिपुरासुराला ही विमाने पाहून आनंद झाला होता. त्याने ब्राह्मणाला काय हवे ते मागण्यास सांगितले. तेव्हा शंकराने फक्त १० गावे मागितली आणि त्रिपुरासुराने ती हसत हसत दिलीदेखील. पुढे शंकराने कैलासाची मागणी अमान्य केल्याने त्रिपुरासुर त्या विमानात आरूढ होऊनच कैलासावर चालून गेला. शक्तीचा गर्व झालेला त्रिपुरासुर हेही विसरून गेला की, गणपतीकडे आपण काय वर मागितला आणि विमानाबाबत ब्राह्मणाने काय सांगितले. यावेळी शंकर आणि त्रिपुरासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले. अखेर श्री शंकराने महोत्कट गणपतीची प्रार्थना केली, ‘प्रणम्य शिरसा देवं’ या श्लोकाचे स्मरण केले आणि त्रिपुरासुर आरूढ असलेल्या विमानावर गणपतीने दिलेला बाण सोडला. त्या एका बाणातच विमानासह त्रिपुरासुराचा नाश झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा नाश झाला म्हणून तिला त्रिपुरारी पौर्णिमा, असे म्हणतात.
‘शिवशंकराने ज्या श्री गणेश स्वरूपाकडून विजेतेपदाचा वर मिळवला. ज्या स्वरूपाने शंकराला तो वर दिला, जे स्वरूप अत्यंत प्रसन्न आहे, जे स्वरूप साक्षात सद्गुणमूर्ती आहे आणि जो मणिपूर क्षेत्री वास करतो, अशा महान दैवताला मी वंदन करतो’ येथे स्थानमाहात्म्य सांगणारा हा एक प्राचीन संस्कृत श्लोक आहे.
महागणपतीचे ध्यान करून शिवशंकराने त्रिपुरासुरावर विजय मिळवला म्हणून त्याचा ‘त्रिपुरारिवरदे महागणपती’ असा उल्लेखही प्राचीन श्लोकांमध्ये केला जातो. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले, ते मणिपूर गाव म्हणजेच आताचे रांजणगाव. येथे स्वतः शंकराने गणरायाच्या शक्तीस्वरूप अवतारमूर्तीची प्रतिष्ठापना करीत मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम नवव्या वा दहाव्या शतकातील असल्याची नोंद आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी ४०० वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करीत सध्या अस्तित्वात असलेला सभामंडप बांधला. त्यानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी गाभारा बांधला. पेशवे काळातच येथील भव्य महाद्वाराचे बांधकाम झाले आहे. या महाद्वारावर मागच्या बाजूस काळ्या दगडांमधील अष्टविनायकाची शिल्पे अंकित आहेत.
पेशव्यांनी नव्या गाभाऱ्याची रचना करताना मंदिरात तळघराची रचना करून, तेथे जुनी मूर्ती सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आणि नव्या गाभाऱ्यात पूजेसाठी दुसरी शेंदूरचर्चित मूर्ती प्रतिष्ठापित केल्याचेही सांगितले जाते. शिंदे, होळकर आदी मराठा सरदारांनीही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हस्ते मदत केल्याची नोंद आढळते.
हे मंदिर दिसायला साधे असले तरी त्याची रचना अनन्यसाधारण आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा जेव्हा मध्यकाळ होतो, त्या वेळी सूर्याचे किरण बरोबर मूर्तीवर पडतात. सूर्यकिरणांनी उजळून निघणारे महागणपतीचे ते दुर्मीळ रूप पाहण्यासाठी भाविकांची येथे विशेष उपस्थिती असते.
सभामंडपासमोरच छोट्या चबुतऱ्यावर शिवलिंग, नंदी व मुंजाच्या प्रतिमा आहे; तर मागच्या बाजूसही शिव मंदिर आहे. आवारात इतरही छोटी छोटी मंदिरे आहेत. येथेच पेशवेकालीन पायऱ्या असलेली सुंदर बाव अर्थात बारव आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला ओवरीमध्ये महागणपतीच्या आख्यायिकांवर आधारलेली सुंदर चित्रे आहेत.
सभामंडपात गेल्यानंतर गाभाऱ्यात श्रीगणेशाची रेखीव शेंदूरचर्चित मूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या, आसन घातलेल्या या गणेशरूपाचे कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. या गणेशाला कमळाचे आसन आहे. या मूर्तीच्या खालील बाजूला तळघर आहे आणि त्यात महागणपतीची १० सोंडा व २० हात असलेली मूळ मूर्ती ठेवली असल्याचे सांगितले जाते.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक भक्ताला गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते. त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. हा गणपती नवसाला हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना अल्प दरात भक्त निवासाची सुविधा व मोफत महाप्रसाद दिला जातो. दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ही महाप्रसादाची सुविधा असते. भाविकांना पहाटे ४ ते रात्री १० पर्यंत मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेता येते.