
निसर्गाने भरभरून दान दिलेले उरण तालुक्यातील चिरनेर हे सुंदर गाव आहे. जंगल सत्याग्रहामुळे या गावाची नोंद जशी इतिहासात झाली आहे, तसेच येथील महागणपतीमुळे या गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिराशी येथील जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीही जोडलेल्या आहेत. महागणपती देवस्थान ही या गावाची आता मुख्य ओळख बनलेली आहे. राज्यातील प्रसिद्ध गणेशाच्या स्थानांमध्ये चिरनेरच्या महागणपतीचे एक वेगळे स्थान आहे. नवसाला पावणारा म्हणून या महागणपतीची सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळेच हजारो गणेशभक्त दररोज येथे दर्शनासाठी येत असतात.
१९३० च्या त्या काळात महात्मा गांधींनी पुकारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला देशभर प्रतिसाद मिळत होता. अनेक ठिकाणी आंदोलने होत होती, उठाव होत होते. गुजरातमधील दांडी येथे मिठाचा सत्याग्रह झाला. त्याचवेळी चिरनेरला या सत्याग्रहासाठी जंगल हे माध्यम वापरले गेले. या परिसरात राहणाऱ्या आदिवासींसह येथील आगरी समाजातील तरुणांनीही या सत्याग्रहात मोठ्या संख्येने भाग घेतला होता. निमित्त होते इंग्रज सरकारने काढलेल्या एका वटहुकूमाचे. या वटहुकूमाद्वारे येथील आदिवासींचा जंगलावरील हक्क नाकारण्यात आला होता. तेव्हा ‘आम्ही या जंगलाचे पिढ्यान् पिढ्यांचे रहिवासीच नाही तर मालक आहोत. इंग्रजांचे शासन आम्ही मानत नाही, तर त्यांचे कायदे पाळण्याचा प्रश्नच येत नाही,’ अशी भूमिका येथील आदिवासींनी घेतली.
२५ सप्टेंबर १९३० या दिवशी चिरनेरजवळील जंगलात पनवेल काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा हजार सत्याग्रही गोळा झाले. त्यात आदिवासी युवकांची संख्या मोठी होती. ‘जंगल आमच्या बापाचे, नाही कुणाच्या मालकीचे‘, ‘भारत माता की जय‘, ‘वंदे मातरम्’, ‘जंगल का कानून
तोड दिया’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी काही आदिवासी तरुणांनी कोयते व कुऱ्हाडीच्या साह्याने जंगल तोडायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे १४ सशस्त्र आणि ६ लाठीधारी पोलिसांसह पोलिस निरीक्षक राम डी. पाटील व मामलेदार के. एम. जोशी हे बंदोबस्तावर होते. पोलिसांनी या वेळी काही जणांना अटक केली. त्यांना हातकड्या घालण्यात आल्या. त्यामुळे सत्याग्रही संतप्त झाले. त्यांनी हातकड्या काढण्याची मागणी केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारास सुरुवात केली. सत्याग्रहींनी त्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. अचानक पोलिस निरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यात रघुनाथ मोरेश्वर नावी, आनंद माया पाटील, ढाकू गवत्या फोफेरकर, परशुराम रामा पाटील, आळू बेमट्या म्हात्रे, रामा बामा कोळी, हसुराम बुधाजी घरत आणि नाग्या महादू कातकरी हे आठ सत्याग्रही मृत्युमुखी पडले. या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेले सरकारी अधिकारी के. व्ही. कौंडिण्य यांनी १३ ऑक्टोबर १९३० रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, या गदारोळात एका पोलिसाच्या ‘३०३ रायफल’मधून सुटलेल्या गोळीने मामलेदार के. एम. जोशी यांचा बळी घेतला. त्याच प्रमाणे हरी नारायण तावटे, जयराम बाबाजी, नारायण पांडू कदम हे पोलिस व काशिनाथ शेवडे नावाचा गार्ड हे मृत्युमुखी पडले. या घटनेच्या चौकशीदरम्यान चिरनेर गावातील काही तरुणांना आरोपी म्हणून पोलिसांकडून पकडण्यात आले. त्यावेळी गावात पोलिस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपती मंदिरात आरोपींना कोंडून ठेवण्यात आले होते. येथील खांबांना बांधून त्यांना मारहाण करण्यात आली, पण कोणीही माफीचा साक्षीदार झाला नाही. येथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडविला. येथील वीर हुतात्म्यांचे स्मारक या मंदिराच्या शेजारीच आहे.
चिरनेर येथील महागणपती मंदिराची स्थापना नानासाहेब तथा बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत (इ.स. १७४० ते १७६१) झाली. त्यांचे
सुभेदार रामजी महादेव फडके हे गणेशभक्त होते. ते चिरनेर येथे आले असता त्यांना गणेशाने स्वप्नदृष्टांत दिला की मी येथील तलावात आहे. तेथून काढून माझी प्रतिष्ठापना करा. त्यानुसार शोध घेतला असता तलावात ही गणेशमूर्ती सापडली. त्यानंतर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिराची उभारणी करून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक दगडी दीपमाळ आहे व त्याच्या तळाशी शिलालेख आहे. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूला एक २० फूट लांबीचा सभामंडप आहे. या सभामंडपाला पूर्वी दहा इंच रुंदीचे सहा खांब होते. जंगल सत्याग्रहातील आरोपींना पोलिसांनी याच खांबाला बांधले होते. या सभामंडपावर पूर्वी साधी कौले होती. १९९० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारात येथे सिमेंट काँक्रीटचा वापर करून नव्याने सभामंडप बांधण्यात आला. त्यामुळे आज येथे ते लाकडी खांब दिसत नाहीत.
पूर्वाभिमुख मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आकाराने काहीसे लहान आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका वज्रपीठावर
असलेली गणेशाची मूर्ती सहा फूट उंचीची व साडेतीन फूट रुंदीची भव्य व शेंदूरचर्चित आहे. म्हणूनच याला महागणपती असे नाव मिळाले आहे. ही मूर्ती तिळातिळाने वाढते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मूर्तीच्या आकाराहून येथील गर्भगृहाचा दरवाजा लहान असल्याने भाविकांची ही श्रद्धा आणखी दृढ झाली आहे. ही मूर्ती ४०० वर्षांहून जुनी असावी, असे सांगितले जाते. माघी गणेशोत्सव व संकष्ट चतुर्थीला या मूर्तीला सजवण्यात येते. त्यावर चांदीचा मुकुट चढविण्यात येतो.
मंदिराचे मुख्य शिखर घुमटाच्या आकाराचे आहे व त्यावर कळस आहे. या घुमटावर कमळाची नक्षी आहे. पावसाळ्यात या घुमटातून झिरपणारे पाणी महागणपतीच्या मूर्तीवर पडते. असे सांगितले जाते की अनेक प्रयत्न करूनही ते पाणी आजपावेतो बंद करणे शक्य झालेले नाही. मुख्य घुमटाच्या चार बाजूला चबुतरे आहेत. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे काळ्या पाषाणातील आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने भिंतींवर कलाकुसर केलेली दिसते.
महागणपतीचे स्थान जागृत समजले जाते. येथे देवाला कौल लावण्याची पद्धत आहे. माघ वैद्य चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. त्याआधी तीन दिवस येथे कीर्तन महोत्सव असतो. चतुर्थीच्या दिवशी महागणपतीची मूर्ती सजविली जाते. दुपारी जन्मोत्सव पार पडल्यावर रात्री पालखीचा कार्यक्रम असतो. चिरनेरमधील सात पाडे फिरून दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी परत मंदिरात येते. प्रत्येक मंगळवारी व संकष्ट चतुर्थीलाही येथे भाविकांची मोठी गर्दी होते. अंगारकी चतुर्थीला तर या गावाला यात्रेचे स्वरूप आलेले असते. महागणपती मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर आधुनिक दिसत असले तरी ते प्राचीन असावे, असे तेथील विविध शिल्पांवरून जाणवते.