महादजी शिंदे छत्री

वानवडी, पुणे

मराठा साम्राज्याचे महान सेनानी महादजी शिंदे यांचे स्मारक, त्यांची समाधी, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, शिवालय हा सगळा परिसर शिंदे छत्री म्हणून ओळखला जातो. ही ऐतिहासिक वास्तु पुणे शहरातील वानवडी येथील बहिरोबा नाल्याच्या काठावर आहे. आपल्या मृत्यूआधी काही दिवस म्हणजे १७९४ मध्ये महादजी शिंदे यांनी वानवडी येथे महादेवाचे मंदिर बांधले. त्याच वर्षी महादजींचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर या महादेव मंदिरासमोरच महादजींचे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाच्या बाजुलाच महादजींची समाधी आहे. (समाधीला त्यावेळी छत्री असे संबोधण्याचा प्रघात होता) ब्रिटिश आणि राजस्थानी स्थापत्यशैलीचा मिलाफ या स्मारकाच्या उभारणीत दिसतो. महादजींनी बांधलेले येथील शिव मंदिर हा वास्तुकलेचा अप्रतिम कलाकुसर असलेला नमुना मानला जातो. छत्री परिसरात प्रवेश करताच समोर मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोर शिंदे छत्रीचे प्रवेशद्वार आहे. छत्री परिसरात प्रवेश करताना प्रवेशशुल्क द्यावे लागते. त्यासाठी प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ट्रस्टचे तिकीटघर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुंदर व प्रशस्त दुमजली स्मारक दिसतो. या स्मारकाला लागूनच मागच्या बाजुला महदजींनी बांधलेले शिवमंदिर आहे. स्मारकाच्या सभामंडपात शिंदे घराण्यातील वंशजांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यात महादजी शिंदे यांचेही छायाचित्र आहे. सभामंडपाचे काम देखण्या काळ्या-पांढऱ्या संगमरवरी दगडांत करण्यात आले आहे. गोलाकार नक्षीदार कमानींनी त्याचे सौंदर्य वाढले आहे. सभामंडपाच्या छतावर आतील बाजुने फुलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तसेच, काचेची झुंबरेही लावली आहेत. हा दुमजली सभामंडप राजस्थानी शैलीत तयार करण्यात आला आहे. भिंतींवरही वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. सभामंडपात महादेव मंदिराच्या गाभाऱ्यासमोर संगमरवरात तयार केलेला नंदी आहे. गाभाऱ्याच्या नक्षीदार कोरीव काम केलेल्या दरवाजांवर दोन्ही बाजूंना सुंदर मूर्ती आहेत. गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या मागे महादजी शिंदे यांचे शिल्प आहे. या शिल्पाची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली. शिंदे यांच्या शिल्पाच्या डाव्या बाजूला छोटे देवघर आहे. गाभाऱ्यातही भित्तीचित्रे काढलेली आहेत. सुबक नक्षीकाम केलेल्या भिंतींवर असलेल्या अनेक खिडक्यांमुळे बाहेरूनही हा सभामंडप देखणा दिसतो. सभामंडपाच्या वरील भागात, तसेच बाजूने ऋषी-मुनींची शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मागील बाजूने गोलाकार जिना आहे.

सभामंडपाच्या मागील बाजूला महादेवाचे मंदिर आहे. नक्षीदार घुमट, दगडांवर केलेले कोरीव काम यांमुळे हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना ठरते. मंदिराच्या मागील भिंतीवर देवाची मूर्ती, फुले कोरलेली आहेत. मंदिराचा मुख्य कळस सुंदर आहे आणि त्याच्या चारही बाजूंना लहान कळस आहेत. महादेव मंदिराच्या मागील बाजूला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरासमोर रामाची मूर्ती आहे आणि तिची स्थापना १९१९ मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते.

महादजींची समाधी दगडी चौथऱ्यावर आहे. या समाधीला नक्षीदार घुमट आहे. (छत्रीच्या आकाराचा) छोटी चौकोनी इमारत स्वरूपात असलेली ही समाधी बंदच असते. दरवाजातून आतील समाधीचे दर्शन होते. तेथेच महादजींचा मुखवटा व घोड्याचे एक शिल्प आहे. महादेव मंदिरात दररोज पूजा व आरती केली जाते. महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी गर्दी असते. महादजी शिंदे यांची ३ डिसेंबरला जयंती व १२ फेब्रुवारीला पुण्यतिथी असते. या दिवशी मंदिरात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना येथील मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पुणे रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्था
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : मंदिर सेवक : ९३७२८५४२८६
Back To Home