महादेव मंदिर

रावळगुंडवाडी, ता. जत, जि. सांगली

जत भागाचे उल्लेख रामायणमहाभारत काळापासून पेशवाईच्या काळापर्यंत आढळतात. असे सांगितले जाते की हा परिसर रामायणातील दंडकारण्याचा भाग होता. तसेच महाभारतातील बकासुराच्या कथेशी निगडित असलेली एकचक्रा नगरी म्हणजेच आजचे जत होय. येथील रावळगुंडवाडी हे गावही ऐतिहासिक आहे. या पंचक्रोशीतील अनेक गावांचे महादेव हे आराध्य दैवत आहे. येथील महादेव मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू जागृत आहे.

रावळगुंडवाडी या गावाचा इतिहास असा की सुमारे साडेतीनशेचारशे वर्षांपूर्वी हा सर्व परिसर जंगलाने वेढलेला होता. हा भाग जत संस्थानच्या अंतर्गत येत होता. जत नजीकच्या डफळापूर येथील सटवाजीराव चव्हाणडफळे या पाटलाने .. १६८०च्या सुमारास तीन हजार मोहरांच्या खंडणीच्या बदल्यात विजापूरचा आदिलशाही सुलतान सिकंदरशहा याच्याकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवली. आदिलशाहीत त्याला सहा हजारी मनसबदारी मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एकाच वर्षाने, ३१ मार्च १६८१ रोजी सटवाजीराव याला आदिलशहाने वजीर असा किताब दिला जतची जहागिरी दिली. याच कालखंडात डफळे यांच्या पदरी राऊळ नावाचा एक सेनापती होता

त्यांच्याबाबतची आख्यायिका अशी की राऊळ हा अत्यंत शूर असा योद्धा होता. एकदा तो या परिसरात शिकारीला आला होता. त्यावेळी त्याची आणि वाघाची झुंज झाली. त्यात त्याने वाघाला मारले त्याचे कान शेपटी कापून स्वतःजवळ ठेवली. परंतु नंतर वाघाच्या या शिकारीचे श्रेय निपाणीच्या एका सरदाराने घेतले. आपणच वाघाला मारले असे त्याने जत संस्थानच्या राजास सांगितले. त्यावर खुश होऊन राजाने त्याचा सत्कार करण्याचे ठरवले. ते समजल्यावर सेनापती राऊळ याने राजास आपल्याकडील वाघाचे कान शेपूट दाखवले. खरी गोष्ट समोर आल्यानंतर राजाने राऊळ यास हा भाग इनाम म्हणून दिला. त्याने येथे वस्ती वसवली आणि त्याच्या नावावरून या गावास राऊळगुंडवाडी असे नाव पडले

या गावातील महादेवाचे शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत अशी कहाणी सांगतात की या भागातील एका शेतकऱ्याच्या गायी चरण्यासाठी येथील रानात जात असत. त्यातील एक गाय दूध देईना झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने चौकशी केली. तेव्हा त्याला आढळले की ती गाय नेहमी रानातील एका वारूळाजवळ पान्हा सोडत असे. त्याने ती बाब गावातील काही लोकांना सांगितली. त्यांनी उत्सुकतेने त्या वारूळाजवळ उत्खनन केले, तेव्हा त्यांना येथे हे शिवलिंग सापडले. या ठिकाणी कालांतराने एक छोटे देऊळ बांधण्यात आले. आजही महादेव मंदिराजवळ हे स्वयंभू लिंग असलेले देऊळ आहे. असे सांगण्यात येते की यानंतर काही काळाने येथील काही लोक काशीयात्रेस गेले. त्यांनी तेथून येताना सोबत एक शिवलिंग आणले. त्यासाठी वेगळे मंदिर उभारून त्यात आषाढ शुद्ध प्रतिपदेस या शिवलिंगाची विधिवत् प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच हे महादेव मंदिर होय.

रावळगुंडवाडी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एक प्राचीन दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या पुढील बाजुस मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक शंकराचे लहानसे मंदिर आहे. या मंदिराला असलेले शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूळ मंदिराच्या शिखराची प्रतिकृती असलेल्या या शिखरावर अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत.

सभामंडप गर्भगृह अशी या दगडी बांधणीच्या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सुमारे तीन ते चार फूट रुंदीच्या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप बंदिस्त (गूढमंडप) स्वरुपाचा आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका लहानशा चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. या लिंगावर महादेवाचा पितळी मुखवटा त्यावर पितळी नागाने छत्र धरलेले आहे. गर्भगृहावर चार थरांचे उंच शिखर आहे. हे शिखर मूळ मंदिरावर नंतरच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते

महादेव मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून तीन दिवस जत्रा असते. यावेळी मुचंडी, कलमडी, शेड्याळ, मलकनखेरहट्टी, वळसंग, अमराणी, रामतीर्थ, कोट्टलगी, जत, नागेवाडी या गावांच्या पालख्या येथे येतात. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा यात्रासोहळा पार पाडला जातो. याच प्रमाणे या देवाची पालखी दर तीन वर्षांनी श्रावण महिन्यात जमखंडीजवळ कृष्णानदीवर वाजतगाजत नेतात. त्या ठिकाणी देवाचा स्नानसोहळा होतो त्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आणली जाते.

उपयुक्त माहिती

  • जत येथून १७ किमी, तर सांगलीपासून १०५ किमी अंतरावर
  • जत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home