मध्यमेश्वर म्हणजे मध्यमेचा ईश्वर. यामध्ये ‘मध्यम’ हा शब्द जगाच्या नकाशाच्या काल्पनिक मध्यरेषेवरील मध्यबिंदूसाठी वापरलेला आहे. प्राचीन समजुतीनुसार, वत्सगुल्म (आजचे वाशिम) येथील मध्यमेश्वर मंदिरातील शिवपिंडी ही लंकेपासून मेरू पर्वतापर्यंत असलेल्या जगाच्या मध्यरेषेचा मध्यबिंदू आहे. ‘वत्सगुल्म माहात्म्य’, तसेच ‘सिद्धांतशेखर’ या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. वत्सगुल्म माहात्म्याने या मंदिराचा वाशिममधील १०८ पवित्र तीर्थांत समावेश केलेला आहे. येथे प्राचीन काळी मोठे मंदिर होते, असे मानले जाते. सध्या मात्र या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधलेले मध्यमेश्वराचे मंदिर उभे आहे.
सध्याच्या बिहार राज्यातील पाटणा परिसरात इ.स. ४७६ ते इ.स. ५५० या काळात होऊन गेलेले थोर गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या ‘आर्यभटीय’ या ग्रंथामध्ये पृथ्वी दोन गोलार्धात विभागल्याचा उल्लेख आढळतो. आर्यभट्टांनी मेरू अक्ष अशा रेषेची कल्पना केली आहे. चाळीसगावमधील पाटण येथे बाराव्या शतकात जन्मलेले प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य द्वितीय (इ.स. १११४) हे त्यांच्या ‘लीलावती’ या गणितग्रंथासाठी ओळखले जातात.
‘लीलावती’ हा ज्या महाग्रंथाचा भाग आहे, त्या ‘सिद्धांतशिरोमणी’च्या ‘भूपरिधी अध्याया’त भास्कराचार्य या रेषेचे वर्णन करतात. या रेषेवर लंका, उज्जैन, पुरी, कुरुक्षेत्र आणि मेरू पर्वत ही स्थाने असल्याचे त्यांनी मांडले आहे. (यल्लंकोउज्जयिनिपुरोपरी कुरुक्षेत्रादददेशान स्पृशत । सूत्रं मेरुगतं बुधैर्निदिता सा मध्यरेखा भुव: ।।) यातील मेरू पर्वत हा पृथ्वीचा उत्तरेकडील अखेरचा बिंदू (उत्तर ध्रुव) मानण्यात आला आहे.
या प्राचीन ग्रंथांमध्ये मध्यरेषेवरील स्थानांची जी नावे दिलेली आहेत, त्यांत वत्सगुल्मचे नाव ‘सिद्धांतशेखर’ या ग्रंथामध्ये आढळते. भास्कराचार्यांच्या पूर्वी, इसवी सनाच्या अकराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ श्रीपती यांचा हा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी लंका, कुमारीनगरी (कन्याकुमारी), कांची, महिष्मती (महेश्वर, म.प्र.), स्थानेश्वर (थानेसर, हरियाणा), पुरी या स्थानांबरोबरच पानाट, सितषडास्य, पट्टशिव आणि शीतगिरी या अज्ञात स्थानांचाही उल्लेख केला आहे. याच श्लोकामध्ये त्यांनी श्रीवत्सगुल्म नगरीचाही मध्यरेषेवरील स्थानांमध्ये समावेश केलेला आहे. पुढे ‘वत्सगुल्म माहात्म्य’ या ग्रंथाने या माहितीत अधिक भर घातली आहे. हा अर्वाचीन ग्रंथ आहे. त्यात श्वेतगिरी,
पर्यली (बहुधा परळी वैद्यनाथ) या स्थानांबरोबरच वत्सगुल्मची नोंद आहे. (लंकपुरितः किल देवकन्या कांची तथा श्वेतगिरी च पर्यलिम। यद्वत्सगुल्म परिकल्प्य मध्यं तथोज्जयिन्यादिकाम उत्तर्रधकम ।।)
याच वत्सगुल्म माहात्म्यात मध्यरेषा दाखवत असलेले ठिकाण म्हणून मध्यमेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तो श्लोक असा – ‘तदुत्तरे-स्ति राजेंद्र लिंगं जनमनोहरम् । मध्यमेश्वरसंज्ञं च मध्यरेखा प्रदर्शकम् ।।’ याचा अर्थ असा की ‘हे राजेंद्रा, उत्तरेस (म्हणजे चामुंडा देवी तीर्थाच्या उत्तरेस) लोकांस सुखदायी असे शिवलिंग आहे. त्या लिंगाचे नाव मध्यमेश्वर आहे व ते मध्यरेखा दर्शविते.’ याविषयी वत्सगुल्म माहात्म्यात एक कथा आढळते. मध्यमेश्वर मंदिराच्या उत्तरेस चामुंडा देवीचे मंदिर आहे, तर ईशान्येस नीलकंठेश्वर मंदिर आहे. तेथे आलेल्या वासुकी राजाने वसिष्ठमुनींना या सर्व तीर्थांची सविस्तर माहिती देण्याचा आग्रह केला. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी सांगितले की पूर्वी ऋषींना आणि सामान्य लोकांना ग्रह, तारे, नक्षत्र, राशी या कोणत्याच गोष्टींचे ज्ञान नव्हते. तेव्हा ऋषींनी ब्रह्मदेवाकडे कालज्ञान आत्मसात करण्याची इच्छा प्रकट केली. ब्रह्मदेवाने त्यांना वेदांग ज्योतिषाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून सारे ज्ञान प्राप्त होण्यास मदत मिळेल. त्यानंतर वेदांग ज्योतिषाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून ऋषींनी नारद संहितेसारखे ज्योतिषग्रंथ तयार केले. यामुळे त्यांना सूर्य-चंद्र उदयास्ताचे, ग्रहणांचे तसेच आयुप्रमाणाचे ज्ञान लाभले. याचवेळी देशांतराचे ज्ञान मिळावे यासाठी श्रीलंकेपासून मेरू पर्वतापर्यंत एक रेखा त्यांनी कल्पिली. त्यावरून भूगोल ज्ञान आणि ग्रहांचे गणित करता येणे शक्य झाले. लंकापुरी, देवकन्या, कांची, श्वेतगिरी, पर्यली, तसेच वत्सगुल्म, उज्जयिनी अशा भागांतून ही रेखा जाते. वत्सगुल्म हा या रेषेचा मध्यबिंदू मानून तेथे मध्यमेश्वराचे लिंग स्थापन करण्यात आले.
इतिहास अभ्यासक सचिन दीक्षित यांनी ‘सेंटर फॉर हिस्ट्री, आर्किऑलॉजी, एपिग्राफी अँड न्यूमिसमॅटिक्स’ (सीएचएईएन) ही संस्था आणि मुंबईतील साठ्ये महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या परिषदेत २०१८ रोजी ‘मध्यरेखा अँड मध्यमेश्वर ऑफ वाशिम’ हा संशोधन लेख सादर केला होता. त्या लेखानुसार, येथील मध्यमेश्वराचे प्राचीन मंदिर कालौघात नष्ट झाले होते. वत्सगुल्म माहात्म्यात हे मंदिर चंडिका मंदिराच्या उत्तरेस असल्याचे म्हटले आहे. परंतु मुळात चंडिका मंदिर हे वाशिम शहराच्या परिघावर आहे व त्याच्या उत्तरेस महादेवाची अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे मध्यमेश्वर मंदिर नेमके कोणते हे ओळखणे अवघड झाले होते. पुढे १९६१ मध्ये येथील ‘पांढरीचे टेकाड’ भागात उत्खनन करण्यात आले. त्यात प्राचीन मंदिराचे काही अवशेष सापडले. हे अवशेष त्यातील शिल्पांकन शैलीवरून अकराव्या-बाराव्या शतकातील असावेत, असा अभ्यासकांचा कयास आहे. या ठिकाणी प्राचीन मध्यमेश्वर मंदिर असल्याचे मानून तेथे नवीन मंदिर उभारण्यात आले.
वाशिमच्या भरवस्तीत हे मंदिर वसलेले आहे. येथील बाळासाहेब धनागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या मंदिराची पुनर्स्थापना केली. मोठा सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपास मध्यभागी ग्रील लावलेले स्टीलचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत. सभामंडपात जमिनीवर संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. गर्भगृहाच्या भिंतींनाही आतून बाहेरून संगमरवरी फरशा लावलेल्या आहेत. महिरपी कमानदार प्रवेशद्वारातून गर्भगृहात प्रवेश होतो. आत मध्यभागी मध्यमेश्वराची प्राचीन शिवपिंडी विराजमान आहे. पिंडीभोवती संगमरवरी पाषाणाची शाळुंका बसवलेली आहे. पिंडीच्या लिंगावर पितळी नागाने फणा धरलेला आहे, तर समोरच्या बाजूस छोटासा दगडी नंदी विराजमान आहे. २६ जून १९६१ साली करवीर पीठाचे जगदगुरू शंकराचार्य यांच्या हस्ते येथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. गर्भगृहावर खालच्या बाजूस चौकोनाकार पायऱ्यांसारखी रचना आहे. त्यावर उरुशृंग शैलीचा आभास निर्माण करणारे शिखर उभे आहे. त्यावर गोलाकार आमलक आणि कळस आहे. या मंदिराच्या आवारात हनुमानाची देवळी आहे.
भरवस्तीत असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. येथे श्रावणी सोमवार, तसेच महाशिवरात्रीस मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. धार्मिकतेबरोबरच हे मंदिर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचे असल्यामुळे हे स्थान पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आवर्जून येतात.